अहमदाबाद : गुजरात राज्याची सांस्कृतिक राजधानी. शहरगटाची लोकसंख्या १७,४१,५२२ (१९७१). हे मुंबईच्या उत्तरेस पश्चिम रेल्वेने ४९२ किमी. आहे. आशापल्ली (आधुनिक आशावल) ही भिल्लांची राजधानी राजा कर्ण याने अकराव्या शतकात जिंकून तिच्या शेजारीत कर्णावती नगरीची स्थापना केली या दोन नगरीच्या अवशेषांवर पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात सुलतान अहमदशाहाने सध्याचे अहमदाबाद वसविले. पंधराव्या शतकात जगातील अत्यंत सुंदर, संपन्न आणि सुरक्षित शहरांपैकी अहमदाबाद हे एक होते, असे तत्कालीन प्रवाशांनी लिहिले आहे. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात येथे अंदाधुंदी माजली होती पण अकबराने जिंकून घेतल्यावर शहराला पुन्हा ऊर्जितावस्था आली. ऐन वैभवाच्या काळात येथे नऊ लाख वस्ती असून कित्येक कोट्याधीश व्यापारी होते. येथील सोनेचांदी व अन्य धातूंची कारागिरी, जरी-रेशमी व सुती कामाचे कसब व लाकडी कोरीव काम विख्यात होते. औरंगजेबानंतरच्या काळात शहराची स्थिती खालावली. १८१७ पर्यंत येथे मराठ्यांचा अंमल होता. नंतर ब्रिटिश राजवटीत स्थिती सुधारत गेली, उद्योगधंद्यांचा हळूहळू पुन्हा जम बसला, कलाकौशल्याची कामे पुन्हा होऊ लागली आणि काही वर्षांनी कापडगिरण्या सुरू झाल्यावर मुंबईच्या खालोखाल अहमदाबादेस महत्त्व आले. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात महात्मा गांधींचा साबरमती आश्रम शहराच्या उपनगरात स्थापन झाल्याने त्याला देशाच्या राजकीय व सामाजिक राजधानीचे महत्त्व आले होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार राज्ये आली (१९६०) तेव्हा अहमदाबाद गुजरातची राजधानी झाली आणि आसमंतात खनिज तेलाचा शोध लागल्यावर तिच्या भावी वैभवाची निश्चिती झाली. जुने अहमदाबाद साबरमती नदीच्या पश्चिम तीरावर, समुद्रसपाटीपासून अवध्या ५५ मी. उंचीवर असल्यामुळे त्याला कधीकधी महापुराचा तडाखा बसतो. नगरीचा जुना कोट ४·५ ते ६ मी. उंचीचा असून, त्याच्या १४ वेशींपैकी नगरसुधारणेत काही पाडून टाकण्यात आल्या. जुन्या वस्तीची रचना ‘पोळ’ किंवा बोळ पद्धतीची होती. ‘भद्र’ ही आतील तटबंदीमधील वस्ती जुन्या शहराची कल्पना देते. नव्या शहराचा विस्तार चौफेर झाला असून त्यात औद्योगिक परिसरांखेरीज एलिस ब्रिज, शाहीबाग अशी आधुनिक उपनगरेही आहेत. शहरातील जमिनीच्या निकडीमुळे ऐतिहासिक कांकरिया तलाव बुजवला जाणार आहे. औद्योगिक केंद्र या दृष्टीने ७५ कापडगिरण्यांशिवाय सुती, रेशमी व कृत्रिम धागे, होजिअरी, लोखंड-पोलाद-घडण, रसायने, औषधे इ. विविध उत्पादनांचे कारखाने अहमदाबादेत असून, व्यापारी उलाढालींची भारतातील ही एक प्रमुख बाजारपेठ आहे. १९३० पासून येथे विद्येची विशेष प्रगती झाली असून शिक्षणक्षेत्राचा व्याप सर्व प्रकारे वाढलेला आहे. गुजराती भाषा व संस्कृतीचे आणि विद्यापीठीय शिक्षणाचे हे केंद्र आहे. कापडावर विणकाम, भरतकाम व रंगकाम, कातीव व कोरीव लाकूडकाम, उत्कृष्ट मातीची भांडी या जुन्या कलांप्रमाणेच आधुनिक कलांचाही येथे उत्तम विकास होत आहे. प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळांत पंधराव्या शतकातील जुम्मा मसजिद व शाह आलमची कबर, सोळाव्या शतकातील राणी सिप्रीची मसजिद व जाळीदार गवाक्षांची सिदी सय्यद मसजिद, झुलते मनोरे, शाहीबाग, तीन दरवाजा वेस, स्वामीनारायण मंदिर, दादा हरी व माता भवानी बाव, सरखेज येथील महमद बेगडाची कबर, बालवाटिका ही उल्लेखनीय आहेत. गुजरातेतील जैनधर्मीयांचे हे मुख्य शहर असून येथे १२५ वर जैन-मंदिरे व वास्तू आहेत. एकोणिसाव्या शतकात बांधले गेलेले जैन हाथीसिंग मंदिर हे अर्वाचीन जैन-मंदिरस्थापत्याचे उदाहरण मानले जाते. महात्मा गांधींचा साबरमती आश्रम तर आंतरराष्ट्रीय स्मारक व यात्रास्थानच झाला आहे. शहराच्या उत्तरेस २५ किमी. वर गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. लोहमार्ग, रस्ते व विमानमार्ग यांचे अहमदाबाद हे पश्चिम भारतातील महत्त्वाचे केंद्र आहे. पर्यटकांसाठी धर्मशाळा व देशी-विदेशी पद्धतीचे पथिकाश्रम या सर्व सोयी आहेत.

ओक, शा. नि