असोलीण : (शिरूळ हिं. असर लॅ. ग्रेविया मायक्रोकॉस, कुल—टिलिएसी). या लहान वृक्षाचा प्रसार कोकण, उत्तर कारवार, कर्नाटक, पश्चिम द्वीपकल्प, खासी टेकड्या, बांगला देश, ब्रह्मदेश, श्रीलंका इ. ठिकाणी सदापर्णी जंगलात आहे. कोवळ्या भागांवर तारकाकृती केस असतात. पाने साधी मोठी, सोपपर्ण (उपपर्णे असलेली), कागदासारखी पातळ व चिवट, गुळगुळीत, अंडाकृती, काहीशी दातेरी, तळाशी तिरपी, गोलसर किंवा निमुळती व तीन मुख्य शिरांची असतात. फुले पिवळी, लहान, २ किंवा ३ एकत्र, अनेक छंदांनी वेढलेली, टोकाकडील परिमंजरीत मे-ऑक्टोबरात येतात [ → फूल, पुष्पगंध]. सामान्य लक्षणे व संरचना ⇨टिलिएसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे. अश्मगर्मी (आठळीयुक्त) फळ गोलसर, वाटाण्याएवढे व एकाच कप्प्याचे. किरमिजी व सुरकुतलेले असून खाद्य असते. खोडापासून बळकट धागा मिळतो. पाने सिगारच्या वेष्टनासाठी उपयोगात आणतात. अपचन, विषमज्वर, आमांश, उपदंशामुळे तोंडात आलेले व्रण, देवी, इसब, कंडू इत्यादींवर ही वनस्पती गुणकारी आहे.

जमदाडे, ज. वि