अरुंधती केश : पाश्चात्त्य नाव ‘कोमा बेरनाइसेस’ (कोमा = केस, बेरनाइस = ईजिप्तची एक राणी). उत्तर खगोलार्धातला हा तारकासमूह जूनमध्ये रात्री ८-९ च्या सुमारास पृथ्वीवरील २० उ. अक्षांशाच्या आसपासच्या ठिकाणी खःस्वस्तिकी (निरीक्षकाच्या डोक्यावरच्या खगोलावरील बिंदूशी) येतो. हस्ताच्या बराच उत्तरेस, सप्तर्षीतील वसिष्ठ ताऱ्‍याच्या बराच दक्षिणेस आणि स्वाती ताऱ्‍याच्या पश्चिमेस हा समूह आहे. यातील सर्वच तारे कमी तेजस्वी असल्यामुळे तो नुसत्या डोळ्यांनी ओळखणे कठीण आहे. आकाशगंगेचा उत्तर कदंब (ध्रुवबिंदू) या समूहात येतो. इ. स. पू. तिसऱ्‍या शतकात कॅलिमाकस व एराटॉस्थीनीझ यांनी या तारकासमूहाचा उल्लेख केला आहे. यात मोठ्या दुर्बिणीने बऱ्‍याच अभ्रिका, युग्मतारे व तारकागुच्छ दिसतात. टॉलेमी यांनी तयार केलेल्या तारकासमूहांच्या यादीत हा समूह नाही, पण ट्यूको ब्राए यांच्या यादीत आहे.

 

भारतीय ज्योतिषशास्त्रात अरुंधती या नावाने ओळखण्यात येणारा तारा सप्तर्षीतील वसिष्ठ ताऱ्याजवळ आहे. त्याचे इंग्रजी नाव ‘ॲलकोर’ असून त्याची प्रत ४ ·०२ आहे [⟶ प्रत]. अरुंधती केश या तारकासमूहापासून अरुंधती तारा बराच दूर आहे.

 

कोळेकर, वा. मो.