अनेकदेवतावाद : या वैविध्यपूर्ण विश्वाचे व जीवनाचे नियंत्रण करणाऱ्या चैतन्यमय अशा शक्ती वा व्यक्ती म्हणजे महासामर्थ्यशाली देवता आहेत व त्या अनेक म्हणजे पुष्कळ आहेत त्यांच्या कृपेने माणसांचे हित होते व अवकृपेने अहित होते त्यांची कृपा भक्तीने वा पूजेने संपादन करता येते व त्यांची उपेक्षा केल्याने वा त्यांचे नियम उल्लंघिल्याने अवकृपा होते, अशी श्रध्दा वा अशा श्रद्धेचे समर्थन म्हणजे अनेकदेवतावाद होय.
धर्मविचारांच्या विकासात एकदेवतावाद हा अनेकदेवतावादाच्या वरची पायरी आहे, असे समजतात. परंतु अँड्र लँग ह्या मानवशास्त्रज्ञाचे असे मत आहे, की मुळात माणसाला विश्वाचे शासन चालविणाऱ्या एकाच अधिपतीची कल्पना सुचली विश्वाचे शासन म्हणजे सुव्यवस्था राखण्याकरिता, एकाच शास्त्याची कल्पना अधिक सुसंगत ठरते. प्रथम एकेका देवतेची पूजा करणारा एकेक प्राथमिक समाज पृथक्पणे अस्तित्वात आला. हे एकदेवतावादी समाज जेव्हा निरनिराळ्या कारणांमुळे एकत्रित आले, तेव्हा त्यांच्या देवताही एकत्र गोळा झाल्या व ते अनेक समाज मिळून झालेल्या एका समाजात अनेकदेवतावाद मान्यता पावला. हे मत विवाद्य आहे.
प्राचीन चिनी, ईजिप्शियन, बॅबिलोनियन, ग्रीक, रोमन, हिंदू इ. लोकांचे धर्म हे अनेकदेवतावादी धर्म होत. विश्वातील सूर्य, आकाश, वायू, पृथ्वी, समुद्र, पर्जन्य इ. विशाल दृश्ये पाहून व त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव पाहून, त्यांच्यात माणसाने चैतन्यमय व नियंत्रक अशा शक्तींची वा व्यक्तींची कल्पना केली, असे दिसते. ह्या कल्पना भावनात्मक प्रतिक्रियेतून निर्माण होतात. त्याच्या आर्थिक, राजकीय व सामाजिक जीवनात निर्माण होणाऱ्या संस्कारांचाही प्रभाव त्या भावनात्मक प्रतिक्रियेवर असतो. गणराज्याची माणसे देवतांची कार्यस्थाने गणराज्यातील स्थानांप्रमाणे कल्पितात, तर राजसत्तेतील माणसे एका देवतेला राजाच्या स्थानी कल्पून, बाकीच्या देवता सहायक वा दुय्यम स्थानी कल्पितात. देवतांचे आहार-विहार हे माणसाच्या स्वतःच्या आहार-विहारांप्रमाणेच कल्पिलेले असतात. हिंदूधर्म अनेकदेवतावादी आहे. परंतु द्वैतवादाप्रमाणेच विष्णू वा शिव यांपैकी एक देवता प्रमुख व बाकीच्या इंद्र, वरूण, गणेश इ. देवता सहायक व मुख्य देवतेच्या आधीन मानल्या आहेत. अद्वैतवादाप्रमाणे एक परमात्मा हीच मुख्य देवता असून, अन्य सर्व शिव, विष्णू, बह्मा, इंद्र, वरुण इ. देवता, परमात्म्याच्याय भिन्न भिन्न विभूती वा अविर्भाव होत, असे मानले आहे.
पहा : एकदेवतावाद ईश्वरवाद.
जोशी, लक्ष्मणशास्त्री