अणुव्रते : जैन धर्मात पाच महाव्रते व पाच अणुव्रते (लहुव्रते) अशी दोन प्रकारची व्रते आहेत. गृहस्थाश्रमी श्रावकांसाठी स्थूलमानाने आचरावयाची सोपी अणुव्रते आहेत. कारण श्रमणांच्या महाव्रतांसाठी सर्वस्वत्याग आवश्यक आहे. अणुव्रते श्रावकधर्मात अपरिहार्य म्हणून ‘मूलगुणरूप’ म्हटली आहेत, ती अशी: (१) प्राणातिपात-विरमण म्हणजे अहिंसा, (२) मृषावाद-विरमण म्हणजे सत्य, (३) अदत्तादानविरमण म्हणजे अचौर्य, (४) स्वदार-संतोष म्हणजे स्वस्त्रीसंतोष आणि (५) इच्छा-परिमाण म्हणजे आवश्यक गरजेपुरत्या वस्तूंव्यतिरिक्त इतरांचा त्याग.

संदर्भ : मेहता, मोहनलाल, जैन आचार, वाराणसी, १९६६.

सुर्वे, भा. ग.