अंकाई-टंकाई : नासिक जिल्ह्याच्या येवले तालुक्यातील ऐतिहासिक स्थान मनमाडच्या दक्षिणेस १४ किमी. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर आणि येवला-मालेगाव रस्त्यावर अंकाई (अनकाई) गाव आहे. गावाजवळ अंकाई-टंकाई किल्ले आहेत. पायथ्यापासून सु. ३२८ मी. उंच असलेल्या टेकडीचा माथा १·६ किमी. परिघाचा आणि अवघड कड्यांचा असून त्यावर अंकाई किल्ला आहे. सात तटांच्या बिकट वाटेतून वर जावे लागते. टंकाईची बांधणी भांडागारपद्धतीची आहे. शहाजहानचा सेनापती खानखानानने १६३५ मध्ये आलकापालका व अंकाई – टंकाई घेतल्याचा उल्लेख मिळतो. दक्षिणेकडील गोदावरीचे खोरे व उत्तरेकडील गिरणेचे खोरे, खानदेश या मूलखांवर नजर ठेवण्यासाठी अंकाई-टंकाई उपयुक्त असत. अंकाईवर तीन मंदिरे आणि ब्राह्मणी लेणी असून टंकाईच्या दक्षिण बाजूस सात जैन लेणी आहेत. अप्रतिम कोरीव काम असलेली ही लेणी सध्या भग्नावस्थेत आहेत.

शाह, र. रू.