ॲडम्स, जॉन कूच : (५ जून १८१९-२१ जानेवारी १८९२). या ब्रिटिश ज्योतिर्विदांचा जन्म इंग्‍लंडमध्ये लेनिस्ट गावी झाला. विद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रजापतीच्या (युरेनसच्या) गतीमध्ये काही विसंगती आहे असे त्यांना आढळले. १८४३ साली त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची सीनियर रँग्‍लर ही पदवी व पहिले स्मिथ पारितोषिक पटकावले. लगेच त्याच विद्यापीठात फेलो म्हणून त्यांची नेमणूक झाली.

प्रजापतीच्या गति-विसंगतीसंबंधी त्यांचे संशोधन चालू होतेच. या विसंगतीचे कारण प्रजापतीच्या जवळचा एकादा अज्ञात ग्रहच असावा, असे प्रतिपादन करणारा ‘द न्यू प्लॅनेट’ हा आपला प्रबंध त्यांनी १८४५ च्या ऑक्टोबरमध्ये रॉयल ॲस्ट्रॉनॉमर यांच्याकडे पाठविला. त्यात त्यांनी प्रजापतीपासून त्याचे २ पर्यंत अचूक स्थानही दर्शविले होते, पण हा प्रबंध लवकर पाहिला गेला नाही. तेवढ्यात लव्हेऱ्ये या फ्रेंच ज्योतिर्विदांनीही विसंगतीचे कारण अज्ञात ग्रहच असावा असे प्रसिद्धही केले. हे संशोधन कोणाचे, याबद्दल वाद निर्माण झाला, पण अखेर नव्या ग्रहाच्या संशोधनाचे श्रेय दोघांनाही देण्यात आले. या दोघांनी गणिताने वर्तविलेल्या जागीच नेमका हा नवा ग्रह बर्लिन येथील वेधशाळेतून आपण पाहिला, असे ज्योतिर्विद गॉल यांनी २३ सप्टेंबर १८४६ रोजी प्रसिद्ध केले. याला ‘नेपच्यून’ हे नाव देण्यात आले. भारतीय ज्योतिषशास्त्रात त्याला ‘वरुण’ ही संज्ञा दिलेली आहे. ॲडम्स यांच्या या संशोधनानिमित्त केंब्रिज विद्यापीठाने १८४८ मध्ये ज्योतिषविषयक प्रबंधासाठी त्यांच्या नावाने ‘ॲडम्स पारितोषिक’ सुरू केले.

ॲडम्स यांच्या या संशोधनाप्रमाणेच त्यांचे पृथ्वीचे चुंबकत्व, नोव्हेंबरमधील लिओनीड उल्कावृष्टी, मध्यम चंद्राच्या वेगातील दीर्घकालीन सूक्ष्म वाढ इ. संशोधनेसुद्धा महत्त्वाची आहेत.

रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने १८५१ मध्ये त्यांची सोसायटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली व १८६६ मध्ये सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला. मध्यंतरी १८५८ मध्ये केंब्रिज विद्यापीठात ज्योतिषशास्त्र व भूमिती या विषयांच्या प्राध्यापकपदी व नंतर दोनच वर्षांनी केंब्रिज वेधशाळेच्या संचालकपदावरही त्यांची नेमणूक झाली. येथेच कार्य करीत असता ते मृत्यू पावले.

मोडक, वि. वि.