होराकोण : कोणताही खस्थ पदार्थ आणि खगोलीय ध्रुवबिंदू यांच्यामधून जाणाऱ्या खगोलावरील बृहद्वर्तुळाला होरावृत्त म्हणतातआणि होरावृत्तापासून निरीक्षकाच्या याम्योत्तर वृत्तापर्यंतचे पश्चिमेकडे मोजलेले कोनीय अंतर म्हणजे होराकोण होय. याम्योत्तर वृत्त व ताऱ्याचे होरावृत्त यांच्यामधील ध्रुवापाशी होणाऱ्या कोणालाही होराकोण म्हणतात. होराकोण ०° ते ३६०? पर्यंत पश्चिमेकडे मोजतात. होराकोण कालाच्या कल्पनेशी निगडित आहे. होराकोण तास, मिनिट व सेकंद या कोनीय एककांतही मोजतात. नाक्षत्रकाल हा वसंतसंपाताचा होराकोणच असतो[→संपात]. होराकोण म्हणजे नाक्षत्रकाल वजा विषुवांश होय[→विषुवांश]. या समीकरणावरूनही होराकोणाचा खगोलातील संबंध लक्षात येईल. एखाद्या ताऱ्याने याम्योत्तरवृत्त ओलांडल्यानंतर किती काळ झाला आहे, हे होराकोणावरून समजते. निरीक्षकाच्या याम्योत्तरवृत्ताचा होराकोण शून्य अंश असतो. छायेवरून वेळ कळणारी घड्याळे (सूर्य-छाया घड्याळ) असतात. ही घड्याळे जी वेळ दाखवितात, ती म्हणजेसूर्याचा होराकोण होय. सागरी प्रवासात एखाद्या ठिकाणाचे रेखांश होराकोणावरून समजतात. 

 

पहा : अक्षांश व रेखांश क्रांति–१ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति विषुवांश सूर्यछाया घड्याळ. 

ठाकूर, अ. ना.