ग्रहपथप्रकाश : (झोडिॲकल लाइट). सूर्योदयापूर्वी थोडा वेळ, सूर्य ज्या ठिकाणी उगवणार असतो त्या ठिकाणी पूर्वेस किंवा सूर्यास्तानंतर सूर्य ज्या ठिकाणी मावळतो त्या ठिकाणी पश्चिमेस क्षितिजावर अंधुक प्रकाश दिसतो, त्याला ग्रहपथप्रकाश म्हणतात. हा क्षितिजापाशी सु. २५ ते ३० अंश रुंद असून वरच्या बाजूस निमुळत्या उंच सोंगटीच्या आकाराचा दिसतो. हा साधारणपणे क्रांतिवृत्ताच्या (पृथ्वीच्या कक्षेची पातळी खगोलास ज्या वर्तुळात छेदते त्या वर्तुळाच्या) दिशेनेच असतो. याची व्याप्ती वरील बाजूस ७५ ते ८० अंशांपर्यंत असते. विशेषतः क्रांतिवृत्त जेव्हा क्षितिजाला जास्तीत जास्त लंब असेल तेव्हा याचे स्वरूप चांगले दिसते. त्यामुळे जास्त अक्षांशावरील प्रदेशात जेथे संधिप्रकाश जास्त वेळ टिकतो तेथे या प्रकाशाचा प्रभाव पडत नाही. अशा ठिकाणी सूर्यास्तानंतर मार्चमध्ये व सूर्योदयापूर्वी सप्टेंबरमध्ये त्यातल्या त्यात हा बरा दिसतो. उष्ण कटिबंधाच्या प्रदेशांत हवा स्वच्छ आणि आकाश अगदी निरभ्र असेल तेव्हा हा आविष्कार वर्षातून कोणत्याही दिवशी दिसू शकतो. रात्री चंद्र नसताना पृथ्वीवर जो प्रकाश असतो त्यातील ३o टक्के प्रकाश ग्रहपथप्रकाशाचा असतो.

क्रांतिवृत्ताच्या आसपास ग्रहपथात सूर्याभोवती भ्रमण करणारे अब्जावधी आंतरग्रहीय कण असतात. यात धूमकेतूंमधून बाहेर पडलेले व लघुग्रहांच्या (मंगळ व गुरू यांच्या कक्षांच्या दरम्यानच्या पट्ट्यात असलेल्या छोट्या ग्रहांच्या) टकरींनी निर्माण झालेले किंवा लघुग्रह फुटल्यामुळे निर्माण झालेले कणही असण्याची शक्यता आहे. अशा सूक्ष्मकणांवरून परावर्तित झालेल्या किंवा विवर्तित (अपारदर्शक कणाच्या कडेवरून जाताना होणारा दिशाबदल) झालेल्या सूर्यप्रकाशामुळेच हा ग्रहपथप्रकाश निर्माण होतो, असे या प्रकाशाचा घेतलेला वर्णपट सूर्याच्या वर्णपटासारखाच असतो यावरून सिद्ध होते. सूर्यकुलात असलेल्या मुक्त इलेक्ट्रॉनांमुळे होणारे सूर्यप्रकाशाचे विवर्तन हेसुद्धा काही अंशी ग्रहपथप्रकाशाच्या निर्मितीस कारणीभूत होत असावे. सूर्याच्या किरिटाचाच (सूर्यबिंबाभोवतालच्या तेजस्वी भागाचाच) हा विस्तार आहे, असेही एक मत आहे. या कणांचे परावर्तन गुणोत्तर (पडलेला व परावर्तित झालेला प्रकाश यांचे गुणोत्तर) चंद्रपृष्ठाएवढेच असते. एक मिमी. व्यासाचे कण एकमेकांपासून ८ किमी. अंतरावर इतस्ततः असल्यावर जी परावर्तित व विवर्तित प्रकाशाची तीव्रता होईल, त्या तीव्रतेचा हा प्रकाश असतो. हे कण फार लहान असूनही चालणार नाही. धूलिकणांहून ते मोठेच असले पाहिजेत. व्हॅन डी हूल्स्ट यांनी या कणांची त्रिज्या सामान्यतः o·३५ मिमी. पेक्षा कमी असते, असे दाखविले आहे.

असाच पण आणखी अंधुक असलेला प्रकाश सूर्याच्या बरोबर विरुद्ध अंगासही क्षितिजावर दिसतो, याला प्रतिप्रकाश म्हणतात. ‘गेगेनशाइन’ या जर्मन नावानेसुद्धा हा ओळखला जातो. मात्र प्रतिप्रकाश क्षितिजापाशी सु. १० अंशच रुंदीचा असून ग्रहपथप्रकाशाप्रमाणेच सोंगटीसारखा वर निमुळता होतो. तसेच याची उंचीसुद्धा कमी असते. याची तीव्रता ग्रहपथप्रकाशाच्या फक्त एक दशांश असते.

प्रतिप्रकाशाची कारणमीमांसा विवाद्य आहे. या संबंधात पुढील तीन कल्पना मांडल्या जातात.

(१) प्रतिप्रकाश म्हणजे ग्रहपथप्रकाशाच्या तेजस्वी कणांत होणारी एक स्थानिक वाढ आहे. अपसूर्यबिंदूजवळच्या (सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असलेल्या बिंदूजवळच्या) कणांवरून पौर्णिमेच्या चंद्रावरून होते तसे परावर्तन होत असावे. (२) अपसूर्यबिंदूजवळ जो ग्रहपथप्रकाशाचा तेजस्वीपणा वाढलेला दिसतो त्याचे कारण सूर्य-पृथ्वी यांचे दोलना-बिंदूजवळ (भासमान आंदोलन होणाऱ्या बिंदूजवळ) झालेला कणांचा संचय हे असावे. हा दोलना-बिंदू सूर्य-पृथ्वी अंतराच्या o·o१ इतक्या अंतरावर पृथ्वीपासून जवळ व त्यांना जोडणाऱ्या रेषेवर आहे. (३) प्रतिप्रकाश हा एक निराळाच आविष्कार असावा. सूर्याच्या विरुद्ध दिशेला धूमकेतूच्या पिसाऱ्यासारखा वायुरूप पिसारा पसरलेला आहे. या वायुरूप पुच्छाचे प्रारण (बाहेर पडणारे किरण) म्हणजे प्रतिप्रकाश होय.

तिसऱ्या कल्पनेला असून पुरेसा वेधांचा आधार नसला, तरी ती अधिकाधिक मान्य होण्याची शक्यता आहे.

गोखले, मो. ना.