ॲडम्स शिखर : श्रीलंकेमधील एक शिखर. ‘श्री पाद शिखर’ असेही ह्यास म्हणतात. ‘प्रेक्षणीय स्थलांचा मुकुटमणी’ अशी त्याची ख्याती असून हे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन व मुसलमान यांच्या यात्रेचे स्थान आहे. हे कोलंबोच्या पूर्वेस सु. ७२ किमी. आहे. शिखरावर जाण्यास रत्‍नपूर शहराकडून पाऊलवाटेने जाता येते परंतु कोलंबोपासून १७५ किमी.वरील हॅटन स्थानकापासून मस्केलियामार्गे डोंगर चढणे सोपे आहे. २,२४३ मी. उंचीच्या या शंक्वाकृती टेकडीचा माथा सपाट, ११६ मी. लांब व ३८ मी. रुंदीचा आहे. या माथ्यावर पावलाचा आकार दर्शविणारा सु. १·६२ मी. लांब, ०·७६ मी. रुंद व ०·०७ ते ०·१४ मी. खोल खड्डा आहे. हिंदू ही शिवाच्या पायाची खूण मानतात स्वर्गातून बाहेर घालविल्यानंतर आदम ह्या ठिकाणी एका पायावर उभा राहून तपश्चर्या करीत होता असे मुसलमान मानतात बौद्धधर्मीयांच्या मते हे बुद्धाचे पाऊल आहे आणि ख्रिस्ती लोक पौर्वात्य प्रेषित सेंट टॉमस ह्याच्या पायाची ती खूण मानतात. ह्या सर्व धार्मिक समजुतींमुळे ते एक मोठे यात्रेचे ठिकाण झाले आहे. येथे एक देऊळ बांधलेले आहे. सध्या ते बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात असून सर्व व्यवस्था तेच पाहतात. डिसेंबर ते मार्च हे येथील यात्रेस उत्तम दिवस असून यात्रेकरू शक्य तो संध्याकाळी डोंगर चढण्यास सुरुवात करतात. शिखरावरील पहाटेची गंभीर शांतता, तालिश वृक्षांच्या रक्तवर्ण फुलांचा सडा, सूर्योदयाचा देखावा ह्यांचा ते अनुभव घेतात. सूर्योदयाच्या सुमारास पश्चिमेस असलेल्या ढगांवर बऱ्याच वेळा या शिखराची गर्द निळी छाया पडते. हे येथील खास वैशिष्ट्य होय.

देशपांडे, सु. र.