ॲकँथोसेफाला : विशिष्ट संरचनेचे हे कृमिरूप परजीवी (दुसऱ्या प्राण्यांवर उपजीविका करणारे) प्राणी प्रौढ दशेत पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या आंत्रात (आतड्यात) असतात. ॲकँथोसेफाला या स्वतंत्र प्राणिसंघात यांचा समावेश केलेला आहे.प्रौढ कृमींची लांबी सु. १-२ मिमी. ते ५० सेंमी. (सरासरीने १-२ सेंमी.) असते. शरीर काहीसे चपटे असून लांब किंवा आखूड होऊ शकते. देहभित्तीची बाह्यत्वचा बहुकेंद्रकी (कोशिका भित्तींनी म्हणजे पेशींच्या भित्तींनी वेगळ्या न झालेल्या अनेक केंद्रके असणाऱ्या जीवद्रव्याच्या स्तराने वा पुंजाने बनलेली) असून तिच्या स्रावापासून तयार झालेल्या पातळ उपत्वचेने (त्वचेच्या बाह्य स्तराने) शरीर झाकलेले असते. बाह्यत्वचेच्या खाली वर्तुळ स्नायूंचे आणि त्याच्या खाली अनुदैर्ध्य (लांब) स्नायूंचे आवरण असते. याच्या आत द्रवाने भरलेली देहगुहा (शरीरभित्ती आणि आतली इंद्रिये यांच्यामध्ये असणारी पोकळी) असते. पुढच्या टोकाशी शुंड (सोंड) असून त्यावर अंकुश (आकडे) असतात. पोषकाच्या (ज्या प्राण्यापासून परजीवी प्राणी अन्न आणि आसरा मिळवितो त्याच्या) आंत्राला चिकटण्याकरिता त्यांचा उपयोग होतो. शुंड, स्नायूंनी शुंडावरणात (सोंडेच्या पिशवीत) ओढून घेता येतो किंवा पिशवीसारख्या दोन अवयवांच्या (लेम्निस्कसांच्या) साहाय्याने आवरणाबाहेर काढता येतो. आहारनाल नसतो पोषकाच्या आंत्रातले अन्न शोषून घेतले जाते. परिवहनांगे (सगळ्या शरीरात रक्त फिरविणारी इंद्रिये) व श्वसनांगे (श्वासोच्छ्वासाची इंद्रिये) नसतात. पक्ष्माभिका (हालचाल करणारे केसांसारखे बारीक तंतू) असलेले दोन शाखित वृक्कक (निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकणारी नळीसारखी इंद्रिये) उत्सर्जनाचे कार्य करतात. शुंडावरणावर असलेल्या तंत्रिका गुच्छिकेपासून (तंत्रिकांवर म्हणजे मज्जातंतूवर असणाऱ्या तंत्रिका कोशिकांच्या पुंजापासून) शुंडाला आणि मागच्या बाजूला तंत्रिका जातात. नरात ६—८ संश्लेष-ग्रंथी (एक प्रकारचा चिकट पदार्थ उत्पन्न करणारा कोशिकासमूह) असतात.
नर आणि मादी भिन्न असतात. नराच्या शुंडावरणापासून मागच्या टोकापर्यंत गेलेल्या एका बंधनीवर (दोन रचना जोडणाऱ्या मजबूत तंतुमय पट्ट्यावर) वृषणांची (शुक्राणुजनक ग्रंथींची) जोडी असते. यांच्यापासून
निघणाऱ्या एका वाहिनीतून शुक्राणू शरीराच्या मागच्या टोकाशी असणाऱ्या घंटेसारख्या स्यूनात (पिशवीसारख्या पोकळीत) जाऊन बाहेर पडतात. नराप्रमाणेच मादीमध्ये बंधनी असून तिच्यावर अंडाणू उत्पन्न होतात अंडाशय नसतो. अंडाणू देहगुहेत जातात व तेथे त्यांचे निषेचन (शुक्राणूंशी संयोग) होते. निषेचित अंड्याभोवती तीन कलांचे (पातळ पटलांचे) आवरण उत्पन्न होते व अंड्यात भ्रूण तयार होतो. या सुमारास अंडी मादीच्या शरीराबाहेर पडून पोषकाच्या आंत्रात जातात व त्याच्या विष्ठेबरोबर बाहेर पडतात. मध्यस्थ पोषकाच्या खाण्यात ही आली, तर त्याच्या शरीरात भ्रूण वाढून डिंभ (काही प्राण्यांच्या विकासातील प्रथम स्वतंत्र अवस्था) तयार होतात. मध्यस्थ पोषक (प्राथमिक पोषक आणि अंतिम पोषक या दोहोंच्या मध्ये येणारा पोषक) अंतिम पोषकाच्या खाण्यात आल्यावरच अंतिम पोषकाच्या शरीरात डिंभापासून पौढ दशा तयार होऊन जीवनचक्र (पक्वदशा प्राप्त होईपर्यंत एखाद्या प्राण्याच्या जीवनक्रमातील विविध अवस्था) पूर्ण होते.
ॲकँथोसेफालाच्या सुमारे ३०० जाती असून त्या माशांपासून सस्तन प्राण्यांपर्यंत विविध पृष्ठवंशींच्या शरीरात परजीवी असतात. भूचर पोषकांच्या शरीरातील परजीवींचे डिंभ कीटकांत आणि जलचरांच्या परजीवींचे क्रस्टेशियन (कवचधारी) प्राण्यांत असतात. मॅक्रॅकँथोर्हिंकस हिरुडिनेशियस हा परजीवी डुकरात नेहमी व माणसात क्वचित आढळतो.
कर्वे, ज. नी.