कावळा : काक-कुलातील (कोर्व्हिडी कुलातील) हा पक्षी सर्वांना माहीत आहे. रान सोडून मनुष्याच्या सहवासाला येऊन राहिलेले जे प्राणी आहेत, त्यांपैकीच कावळा हा एक आहे. मनुष्याचा तो कायमचा सोबती झालेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसाबरोबरच त्याचे सगळे व्यवहार चालू असतात.

गावकावळा

कावळ्याच्या बऱ्याच जाती असून त्या जगाच्या वेगवेगळ्या भागांत आढळतात. फक्त दक्षिण अमेरिकेत कावळा आढळत नाही. भारतात नेहमी दिसणाऱ्या कावळ्यांत दोन जाती आढळतात, एक गावकावळा आणि दुसरा ⇨ डोमकावळा. गावकावळ्याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस स्प्लेंडेन्स व डोमकावळ्याचे कोर्व्हस मॅक्रोऱ्हिंकस असे आहे.

गावकावळा पारव्यापेक्षा थोडा मोठा असून त्याची लांबी सु. ४६ सेंमी. असते. शरीराचा रंग सामान्यतः काळा असून त्यात जांभळ्या, निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या छटा असतात. मानेच्या भोवती करड्या किंवा भस्मी रंगाचा रुंद पट्‌टा असतो; मानेचा काटा, पाठीचा पुढचा भाग आणि छाती यांचादेखील रंग करडा असतो. चोच मजबूत असून भक्ष्य फाडण्याकरिता उपयोगी पडते. चोच आणि पाय काळ्या रंगाचे असतात. डोळे गडद तपकिरी रंगाचे असतात. दृष्टी तीक्ष्ण असते. आवाज मोठा आणि कर्कश असतो. आकार आणि रंग यांच्यामुळे तो सहज ओळखता येतो.

भारताच्या मैदानी प्रदेशात गावकावळा सगळीकडे आढळतोच, पण १,२२० मी. उंचीवर असलेल्या सर्व भागांतदेखील तो दिसून येतो. सर्वत्र आढळणारा आणि ठळकपणे नजरेत भरणारा हा पक्षी आहे, या बाबतीत त्याच्याशी स्पर्धा करणारा आणखी एकच पक्षी असून तो म्हणजे मैना किंवा साळुंकी होय. १,२२० मी. पेक्षा जास्त उंच (१,८३०–२,१३५ मी.) असणाऱ्या प्रदेशात देखील गावकावळा आढळून येतो, परंतु त्याचे तेथील अस्तित्व डळमळीत असते. इतक्या उंचीवरचे कमी तापमान त्याला सोसत नसावे हे त्याचे कारण असू शकेल किंवा या जागी आढळणाऱ्या डोमकावळ्यांपुढे त्याचे काही चालत नसल्यामुळे त्याला तेथे राहणे अशक्य होत असावे.

कावळा संघचारी (गटागटाने राहणारा) पक्षी आहे. थवे करून राहण्याची त्यांची ही सवय प्रामुख्याने रात्रीची विश्रांती घेण्याच्या वेळी दिसून यते. एखाद्या ठिकाणी दाटीने असलेल्या मोठ्या झाडांवर संध्याकाळी शेकडो कावळे जमतात. तिन्हीसांजा होण्याच्या आधीच त्यांचे थवेच्या थवे या झाडांकडे जात असलेले दिसतात. झाडांवर बसल्यावर ओरडून ते विलक्षण गोंगाट करतात पण जसजशी रात्र होत जाते तसतसे त्यांचे ओरडणे कमीकमी होत जाऊन अखेर बंद पडते, ते झोपी जातात. पहाट होते न होते तोच त्यांचे ओरडणे पुन्हा सुरू होते व त्यांचे थवे झाडांवरून बाहेर पडून अन्न शोधण्याच्या मार्गाला लागतात.

माणसाच्या सहवासामुळे तो चांगलाच धीट झालेला असून खोड्या आणि चोरी करण्यात प्रवीण बनलेला आहे. तो उद्धट तर आहेच पण त्याच्या इतका खट्याळ आणि दुष्ट पक्षी दुसरा एखादा असेल असे वाटत नाही.

गावकावळा सर्वभक्षक आहे. मनुष्य जे जे खातो ते सगळे हा खातोच पण मनुष्य जे खाणार नाही असे अनेक पदार्थदेखील याला चालतात. डोळा चुकवून तो हळूच घरात शिरतो व एखाद्या खाण्याचा पदार्थ चटकन उचलून पसार होतो, पण तो सदैव जागरूक असतो. संकटाचा यत्किंचित जरी संशय आला तरी तो उडून जातो. त्याला हाकलण्याचा आपण किती जरी प्रयत्न केला, तरी हुलकावण्या दाखवीत तो लांब जाऊन बसतो व आपली पाठ फिरल्याबरोबर घरात शिरण्याचा पुन्हा प्रयत्न करतो. तो कमालीचा लोचट आहे. खाण्यासारखी एखादी वस्तू कोठे दिसते आहे की काय याची तो सारखी टेहळणी करीत असतो व संधी मिळताच ती वस्तू पळवितो किंवा ती मिळविण्याकरिता नाना प्रकारच्या युक्त्या योजतो. लहान पक्ष्यांच्या घरट्यांवर पाळत ठेवून त्यांची अंडी अथवा पिल्ले खाणे हा तर त्याचा नेहमीचाच उद्योग असतो. शेतात पिके तयार झाली म्हणजे कावळ्यांचे थवेच्या थवे कणसांवर हल्ला चढवून त्यांतले दाणे खातात व बरीच नासधूस करतात.

कावळे माणसालाच उपद्रव देतात असे नव्हे; घुबड किंवा घार या पक्ष्यांवर हल्ला करून त्यांच्याशी झोंबाझोंबी करायला ते मागेपुढे पहात नाहीत. कधीकधी काही उद्योग नसला म्हणजे तो इतर प्राण्यांना विनाकारण त्रास देतो. कुत्री आणि मांजरे यांना देखील त्रास द्यायला तो सोडीत नाही. सरडे आणि बेडूक यांना चोचेने टोचून त्यांचे हाल करून तो ठार मारतो व नंतर ते मेलेले प्राणी खाणे तर दूरच राहीले पण त्यांच्याकडे ढुंकून देखील पहात नाही. केवळ करमणुकीखातर तो या गोष्टी करीत असावा, असे वाटते.

गावकावळ्याचा एक दोन बाबतींत माणसाला थोडासा उपयोग होतो. शहरातून, गावातून किंवा खेड्यातून निरनिराळ्या कारणांमुळे घाण साठते ती घाण (निदान बरीचशी) खाऊन नाहीशी करण्याचे काम हा पक्षी करतो. रस्त्यावर पडलेल्या इतर घाणीबरोबरच शेंबूड, थुंकी किंवा कफाचे बेडके तो खाऊन फस्त करतो. वैदू लोक कावळे मारून खातात.

निर्लज्ज, उद्धट, दुष्ट पण बुद्धिवान असलेल्या या पक्ष्यावर मात करणारा एक पक्षी आहेच व तो कोकीळ होय. कावळ्याला फसवून कोकीळ आपली अंडी त्याच्या घरट्यात घालतो एवढेच नव्हे तर त्या अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या पिल्लांचे संगोपनदेखील करायला लावतो.

गावकावळ्याचा विणीचा हंगाम महाराष्ट्रात एप्रिल ते जून असतो. इतर राज्यांत तो थोडा मागेपुढे होतो. कावळा आपले घरटे झाडावर उंच ठिकाणी फांद्यांच्या दुबेळक्यात बांधतो. नर आणि मादी दोघेही ते बांधण्याचे काम करतात. घरटे काटक्याकुटक्यांचेच केलेले असल्यामुळे अगदीच ओबडधोबड दिसते. घरट्याच्या मध्यभागी वाटीसारखा खोलगट भाग असून त्याला लोकरीचे धागे, चिंध्या, काथ्या वगैरेंचे अस्तर असते. या खोलगट भागात मादी ४-५ अंडी घालते. त्यांचा रंग फिक्कट हिरवा निळा असून त्यावर तपकिरी रंगाचे लहान मोठे ठिपके किंवा रेषा असतात. अंडी उबविण्याचे व पिल्लांना भरविण्याचे काम नर व मादी आळीपाळीने करतात. आपल्या पिल्लांबरोबरच कोकिळाच्या पिल्लांना देखील खाऊ घालून कावळा त्यांना वाढवीत असतो.

कावळ्याविषयी भारतीय समाजात काही चमत्कारिक समजुती रूढ आहेत. मृताचा आत्मा कावळ्याच्या शरीरात वास करतो अशी हिंदूंची समजूत आहे; म्हणून मृताच्या क्रियेच्या दहाव्या दिवशी पिंडदानाच्या वेळी भाताच्या पिंडाला कावळ्याने स्पर्श केला म्हणजे तो मृतात्म्याला पोहोचतो असे समजतात. कावळ्याचे मैथुन पाहिले तर सहा महिन्यांत मृत्यू येतो अशीही एक समजूत आहे. कावळा हजार वर्षे जगतो, त्याला एकाच डोळ्याने दिसते वगैरे चुकीच्या समजुतीदेखील प्रचलित आहेत.

कर्वे, ज. नी.