ॲकँथेसी : (वासक कुल). एंग्लर व प्रांट्ल यांच्या वर्गीकरणाप्रमाणे फुलझाडांपैकी ⇨आवृतबीज वनस्पतीं पैकी द्विदलिकित वर्गातील ट्युबिफ्लोरी या गणातील एक प्रगत कुल म्हणून याचा उल्लेख करतात. ग्रीक शब्द ‘ॲकँथा’ म्हणजे काटा व त्यामुळे मूळ वंशाचे नाव ॲकँथस म्हणजे काटेरी बऱ्याच जातींमध्ये पाने, उपपर्णे व छदे (क्वचित खोडही) काटेरी असल्याने ‘ॲकँथेसी’ हे कुलनाम सार्थ ठरते. ह्यात सु. २४० वंश व २,२०० जाती समाविष्ट असून त्यांचा प्रसार उष्णकटिबंधातील प्रदेशांत सर्वत्र आहे. यातील वनस्पती वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), लहान ⇨ओषधी, क्षुपे (झुडपे), क्वचित वृक्ष व काही वेली असून काही पाणथळ व काही रुक्ष ठिकाणी वाढतात. पाने साधी, समोरासमोर असून त्यात सिस्टोलिथचे (कॅल्शियम कार्बोनेट व जैव पदार्थ यांनी बनलेले) स्फटिक आढळतात. खोडांची पेरी फुगीर, कांडी व पेरी कधी काटेरी फुलोरा द्विशाखवल्लरी तुळशीप्रमाणे पुंजा वल्लरी किंवा मंजरी, क्वचित एकपुष्पी [→ पुष्पबंध] फुले सच्छद, द्विलिंगी संदले व प्रदले ४-५ पण जुळलेली, साधारणतः ओष्ठाकृती केसरदले चार दीर्घद्वयी, किंवा दोन क्वचित केसरतंतू अपिप्रदललग्न व सुटे परागकणांच्या वैशिष्ट्यामुळे कुलांच्या वर्गीकरणास उपयुक्त किंजपुट ऊर्ध्वस्थ. बीजे दोन अथवा अधिक, कठीण उंचवट्यावर (परिवाहक) आधारलेली असतात [→ फूल]. महत्त्वाच्या व उपयुक्त वनस्पती : ⇨थन्बर्जिया, चिमणी, कोळसुंदा, कोरांटी, कारवी, अडुळसा, किरात, अबोली, तालीमखाना, गजकर्णी इत्यादी. यांतील काही शोभेकरिता, काही औषधांकरिता व काही इतर उपयोगांकरिता वापरतात. या कुलाचे बिग्नोनिएसी, स्क्रोफ्युलॅरिएसी, लॅबिएटी व व्हर्बिनेसी या कुलांशी जवळचे नाते आहे.
पाटील, शा. दा.