ॲनेलिडांचे जीवाश्म : ॲनेलिडांची शरीरे सर्वस्वी किंवा जवळजवळ सर्वस्वी, मऊ पदार्थांची बनलेली असल्यामुळे यांचे जीवाश्म (अवशेष) विरळाच आढळतात व आढळतात ते बहुतेक पॉलिकीटांचे असतात. पॉलिकीटांपैकी कित्येक त्यांच्याच स्रावाने तयार झालेल्या व कॅल्शियम कार्बोनेटाच्या किंवा कायटिनाच्या किंवा वाळूचे कण एकत्र जुळवून तयार झालेल्या नळ्यांत राहतात. नळ्या सुट्या किंवा एखाद्या बाह्य परक्या वस्तूला चिकटलेल्या असतात. अशा नळ्यांचे कधीकधी विपुल जीवाश्म आढळतात. कित्येक पॉलिकीटा नळ्यांत राहत नाहीत, पण त्यांच्यापैकी कित्येकांना लहान कायटिनमय जबडे असतात व त्यांचे जीवाश्म कधीकधी विपुल प्रमाणात ऑर्डोव्हिसियन व सिल्युरियन कालीन (सु. ४९ ते ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकांत आढळतात.

जीवाश्मी ॲनेलिडांपैकी प्रमुख गोत्र म्हणजे सर्प्युला होय. या गोत्राच्या प्राण्यांची नळी कॅल्शियम कार्बोनेटाची असून ती सामान्यतः किंचित वक्र, लांब व गोलसर किंवा चापट गोलसर असते व ती एका टोकास बंद असते. नळीच्या पृष्ठाचा काही भाग एखाद्या बाह्य वस्तूस चिकटलेला असतो. गोत्राचा आयुःकाल सिल्युरियन काळापासून आधुनिक कालापर्यंत आहे.

ॲनेलिडांचे सर्वांत जुने जीवाश्म म्हणजे कँब्रियन (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालातले होत. पण त्याच्या आधीच्या कालातही ते अस्तित्वात असावेत, असे मानण्यास जागा आहे.

समुद्राच्या तळाशी असलेल्या चिखलाच्या पृष्ठावरून सरपटत व सरकत जाणाऱ्या कृमींच्या वाटचालीच्या खुणा, त्यांच्या शरीरांचे चिखलात उठलेले ठसे, त्यांनी चिखलात पोखरलेली भोके किंवा त्यांच्या विष्ठेचे पुंजके इत्यादींसारखे हुबेहूब दिसणारे जीवाश्मही वारंवार आढळतात. पण ते कृमींचेच असतील असे नाही. अशा प्रकारचे जीवाश्म कँब्रियन काळाच्या पूर्वीच्या खडकांतही आढळलेले आहेत.

ठाकूर, अ. ना.

संदर्भ : 1. Hickman, C. P. Integrated Principle of Zoology, Saint Louis, 1966. 2. Shipley, A. E. Harmer, S. F. Ed The Cambridge

Natural History, New Delhi, 1968.