ॲनॅक्सिमँडर : (इ.स.पू. सु. ६१०–५४६). ग्रीक तत्त्वज्ञ. आयोनियन शहर मायलीटस (सध्याच्या तुर्कस्तानात) येथे जन्म. मायलेशियन तत्त्वज्ञानशाखेचा प्रणेता. थेलीझचा हा शिष्य समजला जातो. भूगोल व खगोलशास्त्राचा हा अभ्यासक होता. विश्वाची उत्पत्ती आणि पृथ्वी व तिच्यावरील प्राणी यांविषयीची आपली मते त्याने प्रकट केली आहेत. ज्ञात असलेल्या पृथ्वीचा नकाशा काढणारा हा पहिला भूगोलज्ञ. सूर्याच्या छायेवरून वेळ दाखविणारे घड्याळ प्रथम याने बनविले. भूमितीमधील नॉमॉन आकृतिसदृश उपकरणाचे गणित व खगोलशास्त्रातील महत्त्व याने दाखवून दिले. उत्तरायण, दक्षिणायन काढण्यासाठीही याने त्याचा उपयोग केला. सूर्याचा भासमान वार्षिक भ्रमणमार्ग आणि खगोलाचे विषुववृत्त यांमधील कोन याने प्रथम शोधला. विश्व गोलाकर असून पृथ्वी त्याच्या केंद्राशी अधांतरी आहे, आपल्याला अर्धाच खगोल दिसत असल्याने सूर्य-चंद्र मावळलेले दिसतात, असे ॲनॅक्सिमँडरनेच ठामपणे सांगितले. मानव मत्स्यांपासून बनला, असे त्याचे मत होते या दृष्टीने उत्क्रांतिवाद मीमांसेची ही सुरुवात होय. विश्वाची उत्पत्ती एका अमर्याद शक्तीपासून (‘बाउंडलेस समथिंग’) झाली असे तो मानतो. ही अमर्याद शक्ती निराकार, निर्गुण, अविनाशी, अनिर्बंध व दैवी असून पृथ्वी, वायू, अग्नी व पाणी या मूलभूत द्रव्यांमधील परस्परविरोधी गुणांच्या योगाने विविध पदार्थांची उत्पत्ती झाली जेथून ते उत्पन्न होतात तेथेच ते जातात आणि हे अनंत काळपर्यंत चालणार, असे त्याचे मत होते. याच तत्त्वानुसार पृथ्वीची उत्पत्ती झाल्याचे तो सांगतो. ही त्याची कल्पना विश्वोत्पत्तीच्या सध्याच्या तेजोमेघ-मीमांसेचा आरंभच होय.

पहा : ग्रीक तत्त्वज्ञान.

शाह, र. रू.