अँथोफिलाइट : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी [→ स्फटिकविज्ञान] पण विरळाच आढळतात. सामान्यत: पत्रित (पापुद्र्यासारख्या) किंवा तंतुमय राशीच्या स्वरूपात आढळते. कठिनता ५·५-६. वि.गु. २·८५-३·२. रंग करडा, तपकिरी वा हिरवट. चमक काचेसारखी. दुधी काचेप्रमाणे पारभासी. रा. सं. (Mg, Fe)7 (Si8O22) (OH)2. ⇨अँफिबोल गटातले, आर्कीयन कालीन रूपांतरिक (बदललेल्या) खडकांत क्वचित आढळणारे खनिज. रंग लवंगेसारखा असल्यामुळे लवंगेच्या लॅटिन नावावरून ‘अँथोफिलाइट’ हे नाव दिले गेले. याचा, विशेषतः याच्या ॲमोसाइट नावाच्या बरेच लोह असणार्या व दक्षिण आफ्रिकेत सापडणाऱ्या जातीचा, ॲस्बेस्टस म्हणून उपयोग होतो.
ठाकूर, अ. ना.