अँड्रूज, चार्ल्स फ्रीअर : (१२ फेब्रुवारी १८७१ – ४ एप्रिल १९४०). भारतीय जनतेच्या सेवेस वाहून घेणारे एक थोर इंग्‍लिश गृहस्थ. न्यूकासल अपॉन टाईन येथे जन्म. त्यांचे शिक्षण बर्मिंगहॅम येथील किंग एडवर्ड स्कूल व केंब्रिज येथील पेंब्रोक कॉलेजमध्ये झाले. काही काळ अध्यापनाचे कार्य केल्यानंतर १९०४ साली ते

‘केंब्रिज ब्रदरहूड मिशन’चे प्रतिनिधी म्हणून भारतात आले. तेव्हापासून त्यांनी आपले आयुष्य भारतीय जनतेच्या सेवेत घालविले.

दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना तेथील गलिच्छ वस्तीतील लोकांची, विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन, त्यांनी सेवा केली. नंतर १९१३ साली ते रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये राहण्यास गेले. टागोरांमुळे त्यांना ग्रामोद्धार-कार्याबद्दल आस्था निर्माण झाली. १९१५ साली फिजी बेटावरील करारबद्ध कर्मचाऱ्यांच्या दुःखनिवारणार्थ त्यांनी अविरत प्रयत्‍न केले व ही पद्धत नाहीशी करण्यात यश मिळविले. त्यामुळे लोकांनी त्यांना ‘दीनबंधू’ ही पदवी दिली. केन्या व गुयाना येथील भारतीय लोकांची परिस्थिती सुधारण्याकरिताही त्यांनी प्रयत्‍न केला. ओरिसामधील महापूर (१९२७), बिहार-बलुचिस्तानमधील भूकंप (१९३४-३५) यांसारख्या प्रसंगी ते गरीब, अनाथ, रोगी व संकटग्रस्त लोकांच्या मदतीस धावून गेले.

दक्षिण आफ्रिकेतील व भारतातील सत्याग्रहात प्रत्यक्ष भाग घेऊन त्यांनी महात्मा गांधींना सहकार्य दिले होते. ‘इंडियन ट्रेन युनियन’शी तर त्यांचा सुरुवातीपासूनच निकटचा संबंध होता. बातमीदार, लेखक, संपादक व गांधीजींचे मित्र म्हणूनही ते लोकांना परिचित आहेत. त्यांनी सुमारे पंधरा ग्रंथांचे लेखन व चार ग्रंथांचे संपादन केलेले आहे.

संदर्भ : Roy Chaudhury, P. C. C. F. Andrews-His Life and Times, Bombay, 1971.

माडगूळकर, अं. दि.