प्रार्थनासमाज : एकोणिसाव्या शतकात धर्मसुधारणेच्या हेतूने स्थापन झालेली एक चळवळ. प्रार्थनासमाजाचे स्वरूप लक्षात येण्यासाठी परमहंससभेची ओळख करून घेणे अगत्याचे आहे. पाश्चात्त्यांचे राज्य या देशात स्थिरावल्यानंतर त्यांच्या धर्माचा, संस्कृतीचा व ज्ञानाचा संबंध सतत वाढतच गेला. हिंदू धर्मांवर ख्रिस्ती मिशनऱ्यांचे वैचारिक हल्ले होऊ लागले. अनेक सुशिक्षितांवर नव्या शिक्षणाचा प्रभाव पडून हिंदू धर्माच्या परंपरेवरील त्यांची श्रद्धा ढळू लागली, परंपरेची बंधने शिथिल होऊ लागली. काही विचारी सुशिक्षितांना भारतीय समाजातील मूर्तिपूजा, बहुदेवतावाद, जातिभेद व इतर परंपरागत अनिष्ट चालीरीती यांच्या दुष्परिणामाची जाणीव होऊ लागली. बायबलमधील चमत्कारिक व अप्रमाण वाटणाऱ्या बाबीदेखील विचारवंतांच्या लक्षात आल्या. यामुळे धर्मांतराचा उपलब्ध मार्ग न धरता, येथील धर्माची व सर्व समाजाची नव्या कालानुरूप सुधारणा करावी, असा विचार ⇨दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४-८२), राम बाळकृष्ण जयकर, भिकोबा चव्हाण, तुकाराम तात्या, आत्माराम पांडुरंग तर्खडकर इ. नव्या सुशिक्षितांच्या मनात आला. बंगालमध्ये ⇨ राजा राममोहन रॉय यांनी १८२८ साली ⇨ ब्राह्मोसमाजाची कलकत्ता येथे स्थापना केली व धर्मसुधारणेच्या चळवळीस प्रोत्साहन दिले त्याचीही पार्श्वभूमी परमहंससभेच्या मागे होतीच. परंतु सभेच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे कारण ठरलेली घटना म्हणजे ⇨ ईश्वरचंद्र विद्यासागर व राम बाळकृष्ण यांची भेट. या भेटीतून परस्पर विचारविनिमय झाला. दादोबा पांडुरंग यांनी परमहंससभेची स्थापना १८४८ मध्ये केली. धर्मंविवेचन (१८६८) व पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८०) ही परमहंससभेचे विचार सांगणारी दोन पुस्तके दादोबा पांडुरंग यांनी तयार केली. एकेश्वरवादाचा पुरस्कार करून परमहंससभेत सुरुवातीस व शेवटी प्रार्थना केली जाई. रोटीबंदीचे बंधन तोडणे व जातिभेद मोडणे हे त्यांचे प्रमुख उद्देश समजले जात. परमहंससभेचे पहिले व शेवटचे अध्यक्ष राम बाळकृष्ण हेच होते. ह्या सभेचे कार्य गुप्त पद्धतीने चाले. सभा नावारूपास आल्यावर समाजात एकदम प्रकट व्हावयाचे, असे त्यांनी ठरवले होते. परंतु मध्यंतरी त्यांच्या सभासदांची यादी कुणी पळवल्यामुळे सभेची मंडळी घाबरली व सभेचे अस्तित्व संपले. १८६० मध्ये परमहंससभेची समाप्ती झाली. प्रतिकूल परिस्थितीतही आपली मते ठामपणे मांडण्याची हिंमत सभासदांमध्ये नव्हती. परंपरावाद्यांच्या पुढे त्यांचा पराभव झाला.
तरीपण परमहंससभेने प्रवर्तित केलेली तत्त्वे व धर्मसुधारणेची दिलेली दृष्टी वाया गेली नाही. दादोबा पांडुरंग यांनी सुरत येथे १८४४ मध्ये दुर्गाराम मनसाराम मेहता यांच्या साहाय्याने स्थापन केलेली ‘मानवधर्मसभा’ व परमहंससभा यांची तत्त्वे व उद्देश एकच होते. एक ईश्वर, एक धर्म, मानवाची एकता, माणसाची योग्यता जातीवरून न ठरवता ती गुणांवरून ठरवावी, विवेकाला अनुसरून कर्मे व भक्ती करावी, शिक्षणाचा प्रसार करावा ही मानवधर्मसभेची उद्दिष्टे परमहंससभेचीही होती. परमहंससभेतूनच पुढे प्रार्थनासमाज निघाला. या समाजाच्या संस्थापनेत व संवर्धनात परमहंससभेच्या कित्येक सभासदांचा फार महत्त्वाचा भाग होता.
प्रार्थनासमाज ह्या स्वतंत्र नावाने परमहंससभेचे मुख्यतः पुढील कारणांमुळे दुसरे पुनरुत्थान झाले. १८६४ साली ब्राह्मोसमाजाचे बंगालमधील प्रवक्ते ⇨ केवशचंद्र सेन यांची मुंबई व पुणे येथे जाहीर व्याख्याने झाली. या व्याख्यानांमुळे चळवळीस नवी प्रेरणा मिळाली. दादोबा पांडुरंग यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थनासमाजाची स्थापना झाली. पुणे, नगर, सातारा इ. ठिकाणी प्रार्थनासमाजाच्या शाखा निघाल्या.
प्रार्थनासमाज ही प्रारंभापासूनच आध्यात्मिक चळवळ ठरते. हा समाज ब्रह्मवादी आहे परंतु मायावादी नाही. या चळवळीस पुढे ⇨ म. गो. रानडे, ⇨ रा. गो. भांडारकर आदी पदवीधर विद्वानांचा लाभ झाला. उपासना व प्रवचने यांना तुकारामादी अनेक साधुसंतांच्या अभंगांची जोड देण्यात आली. रानडे यांनी यूरोपमधील ⇨ मार्टिन ल्यूथरची धर्मसुधारणा व भागवत धर्म यांमधील साम्य विशद केले. भांडारकरांनी प्रार्थनासमाज हा अनिर्देश्य, अव्यक्त, अचिंत्य व कूटस्थ अशा निर्गुण ईश्वराची प्रार्थना करीत नाही, तर तो सत्य, ज्ञान व आनंदस्वरूपी सगुण ईश्वराची उपासना करतो, असे स्पष्ट केले. प्रार्थनासमाजाची तत्त्वे रानड्यांनीच निश्चित केली.
समाजाच्या प्रार्थनामंदिरात होणाऱ्या सार्वजनिक उपासनेत साधारणतः पुढीलप्रमाणे सहा भाग असतात : (१) उद्बोधन, (२) स्तवन, (३) ध्यान व प्रार्थना, (४) उपदेश, (५) प्रार्थना व (६) आरती. प्रतिवर्षी एकदा वार्षिकोत्सव साजरा केला जातो. प्रार्थनासमाजाचा कोणीही एकमेव संस्थापक नाही.
प्रार्थनासमाजाची धर्मतत्त्वे : (१) परमेश्वराने हे सर्व ब्रह्मांड निर्माण केले. तोच एक खरा ईश्वर. तो नित्य, ज्ञानस्वरूप, अनंत, कल्याणनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकमेवाद्वितीय, सर्वांचा नियंता, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, कृपानिधी, परमपवित्र व पतितपावन असा आहे. (२) केवळ त्याच्याच उपासनेच्या योगे इहलोकी व परलोकी शुभ प्राप्त होते. (३) त्याच्या ठायी पूज्यबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याचे मानसिक भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे, हीच त्याची खरी उपासना. (४) प्रतिमा व इतर सृष्ट पदार्थ यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे. (५) परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही आणि कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही. (६) सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेदभाव न राखता परस्परांशी त्यांनी बंधुभावाने वागावे, हे ईश्वरास प्रिय आहे.
रानडे-भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, द्वा. गो. वैद्य, विठ्ठल रामजी शिंदे वगैरेंच्या व्याख्यानांचे व प्रवचनांचे जे संग्रह उपलब्ध आहेत, त्यांवरून प्रार्थनासमाजाची ओळख पटते. उपनिषदे, इतर सर्व धर्मग्रंथांतील पारमार्थिक व नैतिक सिद्धांत प्रार्थनासमाज मानतो. साधकाला मध्यस्थाशिवाय म्हणजे पुरोहिताशिवाय अंतःप्रेरणेतून व स्वानुभवातून सत्याचे ज्ञान होऊ शकते. विवेकबुद्धीने धर्म व नीतितत्त्वे समजू शकतात. आत्मपरीक्षण आणि आत्मनिवेदनप्रधान असा हा प्रवृत्तिमार्ग आहे. सर्वांगीण सामाजिक सुधारणेचा पाया सद्धर्म व सदाचरणावर आधारित असावा, यावर प्रार्थनासमाज भर देतो.
प्रार्थना संगीत, प्रार्थनासमाजाचा इतिहास इ. मराठी तसेच स्पिरिच्युअल पॉवर हाउस यासारखे इंग्रजी ग्रंथ समाजाने प्रसिद्ध केले. सुबोध-पत्रिका हे नियतकालिक बरीच वर्षे समाजाने चालविले होते. प्रार्थनासमाजावर ब्राह्मोसमाजाचा फार मोठा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील रानडे-भांडारकर यांच्यासारख्या स्वतंत्र प्रज्ञावंतांच्या व्यक्तिमत्त्वाचाही प्रभाव त्याच्यावर जाणवतो. भागवत धर्माचा कळस म्हणून ज्याचा उल्लेख होतो, तो संत ⇨ तुकाराम हा मुख्यत्वे प्रार्थनासमाजाचा मार्गदर्शक मानला जातो.
पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण, अस्पृश्यतानिवारण वगैरे बहुतेक सर्व सामाजिक सुधारणांचा प्रार्थनासमाजाने पुरस्कार केला. ⇨ विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थनासमाजाचा विचार बहुजनसमाजापर्यंत नेला.
पंढरपूर व विलेपार्ले येथील बालकाश्रम राममोहन हायस्कूल प्रार्थनासमाज हायस्कूल, विलेपार्ले सर चंदावरकर मराठी शाळा वगैरे दर्जेदार शैक्षणिक संस्था व विविध प्रकारची समाजकल्याणपर कार्ये चालविण्यात प्रार्थनासमाजाने यश मिळविले आहे. मुंबई, पुणे, वाई, खार येथील या समाजाच्या शाखा यथाशक्ती समाजसेवा करीत आहेत. अंधश्रद्धा व धर्मभोळेपणा नाहीसा करण्याच्या दृष्टीने प्रार्थनासमाजाने अनन्यसाधारण कार्य केले आहे.
संदर्भ : वैद्य, द्वा. गो. प्रार्थनासमाजाचा इतिहास, मुंबई, १९२७.
चव्हाण, रा. ना.