अँडोरा : पिरेनीज पर्वताच्या दक्षिण उतारावरील, यूरोपातील अत्यंत लहान राज्य. पू. रेखांश १०३५’ ते १०४८’ व उ. अक्षांश ४२०२६’ ते ४२०३९’. लोकसंख्या सु. २३,०९२ (१९७३). याच्या उत्तरेस फ्रान्सचे आर्येझ व पिरेनीज ओरिएंटल्स प्रांत व दक्षिणेस स्पेनचा लेरीदा प्रांत आहे. याची दक्षिणोत्तर लांबी ३१ किमी. आणि पूर्वपश्चिम रुंदी २० किमी. असून क्षेत्रफळ ४६४ चौ. किमी. (पाँडिचेरीपेक्षा थोडे कमी) आहे. अँडोरा ला व्हेल्या ही राजधानी आहे.
भूवर्णन : हा देश डोंगराळ व खोल दऱ्याखोऱ्यांचा असून यात मैदानी प्रदेश जवळजवळ नाहीच. दक्षिणोत्तर वाहणाऱ्या व्हॅलीराने व तिच्या उपनद्यांनी यात भरच टाकली आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची ९०० मी. ते ३,००० मी. असून सर्वांत उंच पर्वतशिखर कोमा पेद्रोसा याची उंची ३,१०० मी. आहे. अँडोराचा हिवाळा कडक असून उन्हाळ्यातही बहुतेक ठिकाणी थंड हवामान असते. उत्तरेकडील रस्ते नोव्हेंबर ते मेपर्यंत बर्फाच्छादित असतात. अस्वल, लांडगा, कोल्हा, ‘मार्टेन इझार्ड’ नावाचा मृग, ससा इ. प्राणी गिधाड, गरुड आदी पक्षी ओक, अक्रोड, चेस्टनट, ऑलिव्ह वगैरे वृक्ष व नदीनाल्यांत विपुल मासे आहेत.
इतिहास व राज्यव्यवस्था : शार्लमेनला मूरांच्या विरुद्ध मदत केल्यामुळे त्याने अँडोराच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली, असे काही इतिहासकारक मानतात. कालांतराने स्पेनमधील उर्गेलचा बिशप व फ्रान्समधील फ्वॉयचे काऊंट यांच्यात अँडोरावरील आधिपत्यासंबंधी वाद चालू झाला. १२७८च्या तहाने तडजोड होऊन अँडोराचे प्रशासन उभयतांच्या प्रतिनिधींमार्फत चालू लागले. पुढे फ्वॉयच्या काऊंटचा अधिकार फ्रान्सच्या बादशहाकडे व नंतर फ्रान्सच्या अध्यक्षाकडे गेला.
उभयतांनी नेमलेल्या प्रतिनिधींच्या देखरेखीखाली १८६८च्या संविधानानुसार येथील शासन चालते. या प्रतिनिधींचे कार्यालय अनुक्रमे उर्गेल व पेरपीन्यां येथे आहे. अँडोराच्या कुटुंबप्रमुखांनी दर चार वर्षांनी निवडलेल्या २४ सभासदांचे विधिमंडळ असून त्याचे सभासद प्रमुख व दुय्यम प्रशासकांची नेमणूक करतात. दिवाणी व फौजदारी न्यायालयांमधील न्यायाधीशांची नेमणूक दोन्ही प्रतिनिधींमार्फत समप्रमाणात होते. दर दोन वर्षांनी अँडोरा फ्रान्सला ९६० फ्रँक व उर्गेलच्या बिशपला ४६० पेसेटा खंडणी देतो.
आर्थिक व सामाजिक स्थिती : अँडोरात दळणवळण व वाहतूक सुलभ नाही. फ्रान्स व स्पेनशी वाहतूक पक्क्या सडकेने चालते, पण फ्रान्सकडील रस्ता वर्षाकाठी तीनचार महिने बर्फामुळे बंद असतो. पुष्कळ भागात केवळ पायरस्तेच आहेत. स्पेन व फ्रान्सचे एकेक पोस्ट ऑफिस अँडोरात असून उभय देश येथील पोस्टाची तिकिटे काढतात. दोन्ही देशांची नाणी येथे चालतात. अँडोराचे एक व फ्रान्सच्या नियंत्रणाखालील दुसरे अशी दोन नभोवाणी केंद्रे येथे आहेत.
अँडोराचे नागरिक उद्योगी, आतिथ्यशील व आनंदी असून वंशाने कँटेलन व धर्माने रोमन कॅथलिक आहेत. ते कँटेलेन भाषा बोलतात. लोक मुख्यतः मेंढपाळ व शेतकरी आहेत. कमी पाऊस, उंचसखलतेमुळे शेतीयोग्य अल्पजमीन, क्वचित पावसाळ्यातील पूर इत्यादींमुळे येथील शेती कष्टप्रद आहे. येथील धनदायी पीक तंबाखू असून राय, बार्ली यांसारखी धान्ये व जनावरांसाठी गवत ही पिके होतात. ऑलिव्ह व द्राक्षांचे उत्पादनही बरेच आहे. देशात सर्वत्र मेंढ्या, बकऱ्या व गुरे पाळली जातात. येथील खेचरे किंमती असतात. येथे दाट जंगले असून अँडोरा नावही मूरिश भाषेतील ‘अल्डारा’– म्हणजे दाट जंगल –या शब्दावरून पडले असावे. या प्रदेशातील खनिज संपत्तीचे संशोधन फारसे झालेले नाही. मात्र येथे शिसे व लोखंडाच्या लहान खाणी, गंधकयुक्त गरम झरे आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यटन व्यवसाय देशाला फायदेशीर झाला आहे.
ओक, द. ह.