अपाच्छेदन व पानझड : उच्च दर्जाच्या (वाहिनीवंत—द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहिन्या असलेल्या) वनस्पतींचे भिन्न भाग आपोआप गळून पडताना आढळतात या घटनेस ‘अपाच्छेदन’ व ठराविक ऋतुमानात पाने गळून पडतात त्यास ‘पानझड’ म्हणतात. काहीचे फक्त फुलातील भाग व छदे तर काहींचे त्याशिवाय इतरही जुने भाग (पाने, फळे, साल, फांद्या इ.) ऋतुमानाप्रमाणे किंवा काही आंतरिक घटनेमुळे अकाली गळून पडतात व पुन्हा नवीन येतात. हे भाग कधी सुकून किंवा कुजून पडेपर्यंत झाडावरच राहतात, उदा., बहुतेक सर्व वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ⇨ओषधी ववाहिनीवंत अबीजी वनस्पती किंवा कधी आतील विशिष्ट प्रक्रियेमुळे सुटे होऊन सुकण्यापूर्वी बाहेरील धक्का लागून किंवा वाऱ्याने सहज गळून पडतात. या प्रक्रियेला ‘अपाच्छेदन’ म्हणतात. बहुतेक प्रकटबीज [→ वनस्पती, प्रकटबीज उपविभाग] व द्विदलिकित फुलझाडांची [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] पाने मृत होण्यापूर्वी त्यांच्या तळाशी असलेल्या ऊतकांच्या (समान रचना व कार्य असलेल्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांच्या) रचनेत बदल होऊन ती गळून पडतात याला ‘पानगळ’ असेही म्हणतात. उष्णकटिबंधात अनेक झाडांची पाने उन्हाळ्याच्या आरंभी (उदा., गुलमोहोर, वड, सीताफळ इ.) व समशीतोष्ण प्रदेशात क़डक थंडीपूर्वी झडतात. पानांतून बाष्परूपाने होणारा पाण्याचा व्यय त्यामुळे अल्पकाळ टळतो असे दिसते.
भिन्न वनस्पतींच्या पानझडीपूर्वी होणाऱ्या अपाच्छेदनाच्या तपशिलात फरक असला तरी एका बाबतीत सर्वांत साम्य असते. सर्वांच्या पूर्ण वाढ झालेल्या पानांच्या आधारस्थळी इतर ऊतकांहून भिन्न संरचनेचा अरुंद आडवा प्रदेश निर्माण होतो त्याला ‘अपाच्छेदन-कटिबंध’ म्हणतात व यामध्ये प्रथमत: एक ‘अपाच्छेदन-स्तर ’ स्पष्टपणे दिसतो यामुळेच पाने विभक्त्त होतात. पान पडून गेल्यावर ह्या स्तराखालचा जी ऊतके उघडी पडतात त्यांचे संरक्षण अपाच्छेदन-कटिबंधातील किंवा त्याच्या आसपास नव्याने निर्माण होणाऱ्या प्राथमिक किंवा द्वितीयक संरक्षक ऊतकांमुळे होते.
अपाच्छेदन-कटिबंधातील वाहक वृंद (वाहक ऊतकांचे जुडगे) अरुंद असतात ⇨दृढोतक दुर्बल किंवा त्यांचा व ⇨स्थूलकोनोतकांचा पूर्ण अभाव आणि ⇨मृदूतकात दाट परिकल (कोशिकेतील प्रकलाच्या म्हणजे केंद्रकाच्या व्यतिरिक्त्त असलेले जीवद्रव्य) असतो. अपाच्छेदन स्तरातील कोशिका आकाराने लहान असून त्यांतील परिकल दाट व त्यांमध्ये अनेक स्टार्चचे कण असतात तसेच त्यातील व त्या खालच्या थरातील वाहक वृंदांचा प्राथमिक भाग चोंदून गेलेला असून फक्त द्वितीयक घटकांतून पाणी मिळते व त्यामुळे ते न सुकता टिकून राहते. पाने प्रत्यक्ष गळून पडण्यापूर्वी या स्तरातील कोशिकावरणांमध्ये बराच फरक घडून त्यांचा परस्परसंबंध तुटतो व पानांना फक्त्त वाहक वृंदांचा आधार शिल्लक राहतो यानंतर वारा किंवा गुरुत्वाकर्षण यांपुढे तो आधार अपुरा पडून पाने गळून पडतात. यानंतर अपाच्छेदन कटिबंधातील किंवा त्याजवळच्या कोशिकास्तरात फरक पडून ⇨त्वक्षायुक्त थर किंवा ⇨परित्वचा निर्माण होते त्यामुळे उघड्या भागाचे संरक्षण होते.
जेव्हा निरनिराळ्या वनस्पतीत त्यांचे भिन्नभिन्न भाग आपोआप गळून पडतात त्या वेळी हीच प्रक्रिया थोड्याफार फरकाने घडून येते. परागण (परागसिंचन) व फलनक्रिया चुकल्याने कोवळी लहान फळे गळून पडणे हे सहाजिक आहे. कृत्रिम पद्धतीने (रसायनांचे फवारे मारून) पाने गळण्याची क्रिया पुढे ढकलणे किंवा जवळ आणणे, तसेच शोभेच्या वनस्पतींच्या बाबतीत फळे लवकर पाडून टाकणे शक्य झाले आहे. अपाच्छेदना -च्या प्रक्रियेने वनस्पती स्वत: आपल्या जखमा बऱ्या करतात, स्वत:ची छाटणी करतात, फळे व बियांचा किंवा काही प्रजोत्पादक (नवीन वनस्पती निर्माण करणाऱ्या) भागांचा प्रसार करतात, तसेच साली व पाने यांतून टाकाऊ पदार्थांचे विसर्जन करतात.
पहा : हॉर्मोने ऊतके, वनस्पतींतील.
संदर्भ : 1. Brooke, A. J. The living Plant, Chicago, 1964.
2. Eames, A. J. MacDaniels, L. H. An Introduction to Plant Anatomy, Tokyo, 1953.
परांडेकर, शं. आ.
“