चेंडूफळ : (क. शिवलिंग मर लॅ.पार्किया बायग्लँड्युलोजा कुल-लेग्युमिनोजी). साधारणपणे गुलमोहरासारखा दिसणारा व जलद वाढणारा हा शिंबावंत (शेंगा येणारा), १६ मी. उंच व पानझडी वृक्ष बाभूळ व  शिरीष  यांच्या उपकुलातील (मिमोजॉइडी) असल्याने त्यांच्याशी काही लक्षणांत हा समान आहे. याचे मूलस्थान मलाया व आफ्रिका असून भारतात बागेतून व रस्त्यांच्या दुतर्फा सावलीकरिता व शोभेकरिता लावलेला आढळतो. याची साल पांढरी व पाने संयुक्त, पिसासारखी आणि एकाआड एक असतात. दलांच्या २० – ४० जोड्या आणि दलकांच्या ६० – १०० जोड्या असतात. देठावरच्या दोन प्रपिंडामुळे (ग्रंथींमुळे) जातिवाचक लॅटिन नाव पडले आहे. आफ्रिकी प्रवासी मुंगो पार्क यांचे नाव वृक्षाच्या वंशाला (पार्किया) दिले आहे. याचे फुलोरे गोल चेंडूसारखे असल्याने त्यावरून मराठी नाव पडले आहे ते ३·५ सेंमी. व्यासाचे असून लांब देठावर लोंबतात. प्रथम ते पिंगट मखमलीसारखे व नंतर डिसेंबरात त्यावरची लहान फुले उमलल्यावर पांढरे दिसतात. फुलांची संरचना लेग्युमिनोजी  कुलात (मिमोजॉइडी उपकुलात) वर्णिल्याप्रमाणे असते. शिंबा (शेंगा) ३० सेंमी. लांब असून नवीन उत्पत्ती बियांपासून होते. फळांत थोडा गोड, पांढरा व खाद्य मगज (गर) असतो. बिया ५ – ८, चपट्या, तपकिरी व कठीण असतात. प. आफ्रिकेतील याच्या दोन जातींत (पा. बायग्लोबोजा   पा. फिलिकॉइडिया ) मोठ्या, गोड आणि पौष्टिक शिंबा असतात. चेंडूफळांच्या परागांपासून उत्तेजक पेय बनवितात. मलायात कोवळी रोपे खातात. साल स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी) व कातडी कमाविण्यास उपयुक्त असते लाकूड कठीण व चांगले असते ते किरकोळ सुतारकामास वापरतात.

पार्किया बायग्लोबोजा (पा. आफ्रिकाना) हा उष्ण कटिबंधीय प. आफ्रिकेतील वृक्ष तेथे फार उपयोगात आहे. फळे गोड, खाद्य व लोकप्रिय बिया मसाल्यात व भाजून कॉफीप्रमाणे (काफे द सूदान) वापरतात. त्यांपासून वड्या व कालवण करतात. गँबियात साल दाढदुखीवर खात्रीचे औषध म्हणून आणि कातड्यांना तांबडा रंग आणण्यास व कमाविण्यास वापरतात. लाकूड चेंडूफळाच्या लाकडाप्रमाणे उपयुक्त असते. आसामात आढळणारा पा. रॉक्सबर्घाय   (खोरियल) हा वृक्षही अनेक दृष्ट्या उपयुक्त असल्याचे आढळले आहे. मलायातही तो आढळतो व मलायी लोक त्याचा (शेंगा, साल, लाकूड, औषधी इत्यादींचा) उपयोग करतात.  

परांडेकर, शं. आ.