अपर व्होल्टा : आफ्रिकेच्या पश्चिमभागी ९० ३०’ ते १५० उ. अक्षांश व ५० पश्चिम ते २० पू. रेखांश यांदरम्यान वसलेला देश. क्षेत्रफळ २,७४,२०० चौ. किमी. व लोकसंख्या ५४,८५,९८१ (१९७०). त्याच्या पश्चिमेस, वायव्येस व उत्तरेस माली, ईशान्येस व पूर्वेस नायजर, दक्षिणेस आयव्हरी कोस्ट, घाना आणि टोगो व आग्नेयीस दाहोमी हे देश आहेत.
भूवर्णन : ह्या देशाची भृपृष्ठरचना पठारी असून प्रदेशाची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे थोडीशी वाढत गेली आहे. झिजेमुळे उंचसखल झालेले हे पठार स्फटिकमय खडकांचे तयार झाले आहे. पश्चिमेकडे त्यावर वालुकाश्माचे थर असून उत्तरेकडे व ईशान्येस ग्रॅनाइटचे घुमटाकृती भाग आहेत. जमिनीवर लोहयुक्त तांबड्या घट्ट खडकांचा खर आहे. मध्यवर्ती प्रदेशाची उंची जास्त असल्यामुळे तेथे दोन जलविभाजक प्रदेश निर्माण झाले आहेत. ईशान्य व पूर्व क्षेत्रांतील पाणी नायजर नदीला मिळते. पश्चिम क्षेत्रातील कोम्वे, श्वेत व्होल्टा, तांबडी व्होल्टा व काळी व्होल्टा इ. नद्यांचे पाणी दक्षिणेकडे घानामध्ये वाहत जाऊन व्होल्टा नदीला मिळते. या नद्या जलमार्गास निरूपयोगी आहेत. त्या कधी कोरड्या पडतात तर कधी पुराने दुथडी भरून वाहतात. पर्जन्याचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे कमीकमी होत जाते. दक्षिण भागात वार्षिक सरासरी पर्जन्य ११५ सेंमी. तर उत्तरेकडे २५ सेंमी. आहे. मान्सून प्रदेशांप्रमाणे पाऊस उन्हाळ्यातच पडतो हिवाळा बिनपावसाचा असतो. वार्षिक सरासरी तापमान ३७ ·७० से. असते. जुलै-ऑगस्ट महिन्यांत पाऊस पडल्यामुळे तपमान थोडे कमी होते. हिवाळ्यात सहारातून कोरडे वारे येतात. या वाऱ्यांना ‘हरमॅटन’ म्हणतात. त्यांच्या कोरडेपणामुळे आद्रतेचे प्रमाण कमी होते. या प्रदेशात तृणभक्षक व मांसभक्षक प्राणी विपुलतेने आढळतात. गायीगुरे, गाढवे, घोडे, शेळ्यामेंढ्या इ. पाळीव तसेच गॅझेल व इतर जातींची हरिणे, माकडे, हत्ती व हिप्पोपोटॅमस इ. तृणभक्षक प्राणी आणि या प्राण्यांवर उपजीविका करणारे मांसभक्षक प्राणी आहेत. पूर्वी या प्राण्यांची अनिर्बंध शिकार होत असे आता परवाना लागतो. येथे अनेक प्रकारचे पक्षी आहेत. डास, त्से त्से माशी, टोळ, वाळवी इत्यादिकांमुळे बरीच हानी होते. नद्यांत सुसरी व भरपूर मासे सापडतात. पूर्व भागात वाळवंटी व गवताळ प्रदेश असून अन्य भागांत सॅव्हानासारखी गवताळ वनस्पती आहे. अधूनमधून गोरखचिंच (बाओबाब), तेल्याताड व बाभूळ हे प्रमुख वृक्ष दिसून येतात. बाभळीपासून डिंक मिळतो. कमी पर्जन्याच्या प्रदेशात काटेरी झाडेझुडपे व गवत हीच वनस्पती उगवते. दक्षिणेकडील भागात गवत व विरळ अरण्ये असून जसेजसे उत्तरेकडे जावे तसतशी ही अरण्ये अधिक विरळ होऊ लागतात. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांना छत्रीसारखा आकार आलेला असतो. येथे जांभ्या दगडाची, पिवळसर, वाळूमिश्रित व मळईची—अशी विविध प्रकारची जमीन आहे. मँगॅनीज, सोने, बॉक्साइट, तांबे, लोखंड, हिरे वगैरे खनिजे या देशात सापडतात. तथापि खाणी मोठ्या प्रमाणात चालविल्या जात नाहीत.
इतिहास : नवाश्मयुगातील काही हत्यारे या देशात सापडली आहेत. बोबो, लोबी आणि गौरौंसी ह्या येथील मूळ जमाती समजल्या जातात. चौदाव्या शतकात दक्षिणेकडून उत्तम घोडेस्वारांची मोसी ही जमात येथे आली व त्यांनी येथे राज्य स्थापन केले . हे राजे स्वत:ला ‘मोरो नाबा’ (महान स्वामी) म्हणवीत असत. या घराण्यातील ४६ राजांनी आतापर्यंत या प्रदेशावर राज्य केले आहे. उत्तरेकडून सोंघाई व फुलानी या मुस्लीम टोळीवाल्यांकडून झालेल्या अनेक हल्ल्यांना या मोसीनी दाद दिली नाही. फ्रेंच सैनिकांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस या प्रदेशात प्रवेश केला. १८९७ मध्ये हा संपूर्ण प्रदेश फ्रान्सचा संरक्षित प्रदेश झाला. फ्रेंच वेस्ट सूदान म्हणूनच हा भाग ओळखला जात असे. १९०४ मध्ये निर्मिलेल्या अपर-सेनेगाल-नायजर या मोठ्या प्रदेशातून १९१९ मध्ये अपर व्होल्टा वेगळे केले गेले. १९३२ मध्ये त्याचे पुन्हा आयव्हरी कोस्ट, सूदान व नायजर या तीन प्रदेशांत वाटप करण्यात आले, पण १९४७ मध्ये अपर व्होल्टाचे एकत्रीकरण करण्यात येऊन त्यास फ्रेंचांनी संघराज्याच्या ‘सागरपार वसाहती’ चा दर्जा दिला. त्याच वेळी त्याला स्वत:चे विधिमंडळ देण्यात आले. या राज्यास फ्रेंच राष्ट्रकुलातील स्वायत्त राज्याचा दर्जा १९५८ मध्ये देण्यात आला. ५ ऑगष्ट १०६० ला अप्पर व्होल्टा स्वतंत्र प्रजासत्ताक राज्य झाले. ते फ्रेंच राष्ट्रकुलातच राहिले. काळी, श्वेत व तांबडी व्होल्टा या नद्या देशाच्या जीवनवाहिन्या म्हणून देशासाठी या तीन रंगांचा ध्वज निवडण्यात आला. मॉरिस यामेओगो हे या प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष होते. त्याच वर्षी अपर व्होल्टा संयुक्त राष्ट्रांचे सभासद-राष्ट्र झाले.
राजकीय स्थिती : देशाच्या संविधानानुसार राष्ट्राध्याची व संविधानानुसार विधिमंडळाची दर पाच वर्षांनी सार्वत्रिक प्रौढ मतदानाने निवडणूक होते. राष्ट्राध्यक्ष स्वत:ला जबाबदार असलेले १२ मंत्री नेमतो. विधिमंडळ एकसदनी असून त्याचे ७५ सभासद असतात. संविधानानुसार राष्ट्राध्यक्षास राज्यकारभारविषयक व कायदेविषयक बरेच अधिकार आहेत. राष्ट्राध्यक्ष मॉरिस यामेओगो पदच्युत करून व संविधान गुंडाळून ठेवून जनरल लामिझाना हे १९६६ मध्ये सत्ताधीश झाले. १९७० साली नवे संविधान मान्य होऊन निवडणुका झाल्या. लामिझाना हे अध्यक्ष झाले. शासनव्यवस्थेसाठी देशाची ३९ जिल्ह्यांत विभागणी केलेली आहे व न्यायदाना- साठी प्रत्येक जिल्ह्यात मुलकी न्यायालय, जस्टिस ऑफ पीस व ट्रायब्युनल आहे शिवाय देशात उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालय आहे.
आर्थिक स्थिती : अपर व्होल्टा १९६० पर्यंत औद्योगिक दृष्ट्या मागासलेलाच होता आर्थिक विकासास स्वातंत्र्यप्राप्तीनंतर थोडीफार सुरुवात झाली आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित असून हा देश मुख्यत्वे कृषिप्रधानच आहे. ज्वारी, बाजरी, ड्युरा, याम, शीनट, कसाव्हा, मका, भूईमूग, तांदूळ, कापूस, कॉफी, सीसल, बेनीसीड इ. पिके येथे होतात. एकूण जमिनीच्या फक्त ६ टक्के जमीन लागवडीखाली आहे तेथेच केंद्रित झालेल्या व वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पैसे देणाऱ्या पिकांऐवजी अन्नपिकांवरच भर द्यावा लागतो. तांदूळ, कापूस व भुईमुगाचे उत्पादन अलीकडे वाढत आहे. शीनट या कवची फळांपासून लोणी तयार करून निर्यात केले जाते. कापूस, कॉफी, वनस्पती-तूप, ताडाचे तेल, भुईमूग व जनावरे यांचे प्रमाण निर्यातीत जास्त असते. शेतीची पद्धत जुनीच आहे. शेतीबरोबरच गवताळ प्रदेशात पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. ईशान्य अपर व्होल्टामध्ये झेबू जातीच्या गुरांची संख्या जास्त असून निर्यातीत या जनावरांचे प्रमाण जास्त आहे. त्से त्से या विषारी माश्यांपासून बाधा होऊ शकणार नाही अशा लोंबी व न्दमा जातीची गुरे वाढविण्यात येत आहेत. शेती, पशुपालन, ताडाचे तेल तयार करणे, वनस्पती-तूप व खाणकाम हेच येथील लोकांचे प्रमुख व्यवसाय होत. बोबो-ड्यूलॅसोला तेल, पेंड साबण यांचे कारखाने, तांदूळ सडण्याच्या व लाकूड कापण्याच्या गिरण्या आणि कापूस व कापड इ. उद्योग आहेत. भरतकाम, ब्राँझकाम व कातडीकाम इ. हस्तव्यवसाय देशात सर्वत्र चालतात. शक्तिसाधनांचा अभाव व दळणवळणांची अपुरी साधने व मार्ग हेच आर्थिक विकासांतील प्रमुख अडथळे होत. अलीकडे या देशाने पंचवार्षिक योजना आखलेल्या आहेत. १९६८ पासून १८६ दशलक्ष किवॉ. तास वीज उत्पन्न होऊ लागली आहे. नव्यानेच स्वतंत्र झालेल्या आफ्रिकन राष्ट्रांनी ‘इन्व्हेस्टमेंट फंड फॉर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट’ (FIDES) नामक संघटना स्थापन केलेली आहे या संघटनेद्वारा रस्ते, बंदरे, शिक्षण व अन्य आर्थिक विकासासाठी कर्ज पुरविले जाते. अपर व्होल्टा या संघटनेचा सभासद आहे.
अपर व्होल्टाचा परदेशी व्यापार प्रामुख्याने फ्रान्स, इंग्लंड. अमेरिका, घाना, आयव्हरी कोस्ट, माली इ. देशांशी चालतो. कापूस, कॉफी, ताडाचे तेल, वनस्पती तूप, भुईमूग व जनावरे येथून निर्यात होतात. कोळसा, यंत्रसामग्री, औषधे, खाद्यान्ने तेले, मोटारी आणि कापड इ. पदार्थांची आयात होते.
देशात १९७१ मध्ये १,४०५ कोटी फ्रँक किंमतीची आयात व ४४१ कोटी किंमतीची निर्यात झाली. १९७१ मध्ये फ्रान्समधून ४४%, आयव्हरी कोस्टमधून ११%, मालीमधून ५% आयात व आयव्हरी कोस्टला ३८%, घानाला १०% व फ्रान्सला २२% निर्यात झाली. निर्यातीत मख्यत: प्राणी ३६%, कापूस १९%, मांस ६%, गळितधान्ये २२% होते. CFA फ्रँक हे येथील नाणे असून १ डॉलर = २५५·८ CFA फ्रँक हा त्याचा विनिमय-दर आहे. बचत-बँकेशिवाय इतर व्यापारी बँका नाहीत. १९६८ मध्ये बचत-बँकेतील खातेदारांची संख्या फक्त १८,७३३ होती. १९७१ चा अर्थसंकल्प CFA फ्रँक ९,५७,२०,००,०० चा होता.
अप्पर व्होल्टाला समुद्रकिनारा नाही. येथील रस्त्यांची एकूण लांबी १६,६६२ किमी. असून त्यांपैकी ५,९८९ किमी. लांबीचे पक्के रस्ते आहेत. आयव्हरी कोस्ट, घाना, टोगो व दाहोमी राज्यांतील बंदरांशी अपर व्होल्टा पक्क्या रस्त्यांनी जोडलेले आहे. माली राज्यातील बामाकोस बोबो-ड्यूलॅसोहून रस्ता जातो तर नायजर राज्यातील न्योमेस वागाडूगूहून रस्ता आहे. टॅक्सी, ट्रक व बसेसची एकूण संख्या ४,६०० आहे. लोहमार्गांची एकूण लांबी ३०० किमी. आहे. आबीजान—नायजर हा लोहमार्ग आयव्हरी कोस्टमधील आबीजान बंदरातून निघून अपर व्होल्टाच्या बोबो-ड्यूलॅसोपर्यंत आला होता. युद्धानंतर हा फाटा वागाडूगू – पर्यंत वाढविला गेला आहे. देशात तीस विमानतळ असून बोबो-ड्यूलॅसो येथील विमानतळ आंतरराष्ट्रीय आहे. टपाल, तार व दूरध्वनीची व्यवस्था सरकारकडेच असून १९६९ मध्ये १,३०९ दूरध्वनियंत्रे होती. रेडिओंची संख्या १५,००० आहे. टपालकचेऱ्याची एकूण संख्या ४० आहे. अपर व्होल्टामध्ये दोन वर्तमानपत्रे प्रसिद्ध होतात व त्यांचा दैनिक खप केवळ ५०० प्रती आहे.
लोक व समाजजीवन : पसरट चेहरा व हनुवटी, रुंद व आखूड नाक, जाड ओठ, उंच कपाळ, काळा वर्ण व मजबूत शरीर ही येथील निर्गो लोकांची वैशिष्ट्ये सांगता येतील. मोसी जमातीचे लोक संख्येने जास्त असून (एकूण लोकसंख्येच्या ३९ टक्के) बोबो, सॅमो, लोबी, गौरौंसी, गोरमँटेश व डागरी इ. वन्य जमातींचे लोकही अपर व्होल्टात राहतात. याशिवाय उत्तरेकडून फुलानी, तुआरेग व होसा हे इस्लाम धर्माचे लोक येथे आलेले असून त्यांचा प्रमुख उद्योग व्यापार हा आहे. देशातील ८५ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. लोकसंख्येची घनता सरासरीने दर चौ. किमी.ला १६ आहे. फ्रान्स व व्हिएटनाम यांमधून अनेक फ्रेंच लोक येऊन येथे स्थायिक झालेले आहेत. यूरोपीय लोक बहुतेक शहरांतूनच राहतात. देशातील पुष्कळसे लोक मजुरीसाठी आयव्हरी कोस्ट व घानामध्ये गेले आहेत. एकूण लोकसंख्येच्या ५ टक्के लोक धर्माने ख्रिश्चन, १९ टक्के लोक मुसलमान व ७६ टक्के लोक अद्याप धर्माबाबात प्राथमिक अवस्थेत म्हणजेच ‘जडप्राणवादी’ आहेत. सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्ट्या अजूनही हे लोक बरेच मागासलेले आहेत. लोकराहणी अतिशय साधी आहे. मांस, मासे, ज्वारी, बाजारी, भुईमूग, ताडाचे तेल, कसाव्हा इ. पदार्थांचा यांच्या अन्नात समावेश असतो. कित्येक लोक अजूनही अर्धनग्नावस्थेत राहतात. फ्रान्स–इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी काही लोक जात असले तरी शैक्षणिक प्रगती बरीच व्हावयाची आहे. देशात १९६८-६९ मध्ये प्राथमिक शाळांमधून ९९,८२७ विद्यार्थी व २,२९२ शिक्षक होते. माध्यमिक शाळांतील विद्यार्थी-संख्या ८,११७ व तांत्रिक शाळांतील विद्यार्थी-संख्या १,२९८ होती शिक्षक-प्रशिक्षण-महाविद्यालत १,११४ विद्यार्थी होते आणि माध्यमिक, तांत्रिक व शिक्षक-प्रशिक्षण मिळून एकूण शिक्षकांची संख्या ५७३ होती.
मोसी जमातीचे लोक चेहऱ्यावर मुद्दाम व्रण करून घेतात. येथील लोकांच्या डोक्यावरील केस लहान असतात. मोसी जमातीत बहुपत्नीकत्वाची चाल आहे. विवाह लावतेवेळी धर्मगुरू काही मंत्र म्हणतो व कसाव्हाचे पीठ वधूवरांवर उधळतो. टोळीतील लोक विवाहप्रसंगी वाद्ये वाजवून समूहनाच करतात. दाट अरण्यांमध्ये असलेली यांची घरे मधमाशांच्या पोळ्यांसारखी दिसतात. सभोवताली मातीच्या उंच भिंती असतात प्रवेशद्वाराजवळ कुटुंबप्रमुखाचे घर असते व आतील भागात त्यांच्या प्रत्येक पत्नीसाठी स्वतंत्र घर असते. यांची ही घरेदेखील वर्तुळाकार असतात आणि त्यावर गवत व पालापाचोळा वापरून केलेले शंकू-आकाराचे छप्पर असते. मोठ्या शहरांमध्ये आधुनिक पद्धतीची घरे बांधली जात आहेत. सार्वजनिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीने फारशी प्रगती झालेली नाही. अजूनही जंगली वनस्पती, फळे, मुळे यांचा औषधासाठी उपयोग केला जातो. फारच थोडे लोक डॉक्टरचा सल्ला घेतात. मेनिंजायटीसवर येथील लोक कागा या सुपारीसारख्या फळाचा वापर करतात. सर्पदंशावर एक प्रकारची वाळलेली मुळी उगाळून लावतात. एका विशिष्ट प्रकारच्या तांबड्या फळामुळे तर सर्वच रोग बरे होतात, असा येथील लोकांचा समज आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन मुख्य रुग्णालये, आरोग्यकेंद्रे व प्रसूतिगृह असते. फिरता दवाखाना दूरच्या खेड्यापर्यंतही जाऊन पोचतो. निद्रानाश व कुष्ठरोग हे रोग बरेच कह्यात आले आहेत. वेळ सांगण्यासाठी बरेच लोक सूर्याचाच उपयोग करतात. यांच्या खाद्यपदार्थांत बरीच विविधता असते. शहरांतील बाजारांतून हे लोक धनुष्यबाण, बाटल्या, भांडी, आगपेट्या, कपडे, खाद्यपदार्थ, मोटारीच्या टायरपासून तयार केलेले जोडे वगैरे वस्तू विकत घेतात.
सरकारी कामकाजासाठी फ्रेंच भाषेचाच वापर केला जातो. फुलानी, बंबारा, मोसी, हौसा, फोन, अरबी व इतर अनेक आफ्रिकन बोलीभाषांचा वापर केला जातो. कला, क्रीडा व साहित्याच्या दृष्टीने फारशी प्रगती दिसून येत नाही.
महत्वाची स्थळे : ⇨वागाडूगू हे राजधानीचे व सर्वांत मोठे शहर होय. व्यापारी व राजकीय दृष्टीने हे शहर महत्त्वाचे आहे. ⇨बोबो-ड्यूलॅसो हे दुसरे प्रमुख व्यापारी शहर आहे. कूडूगू (लोकसंख्या २५,२०३) हे शेतमालाचे केंद्र असून याच्या जवळ क्रोमियम व मँगॅनीजचे साठे आहेत. वाहीगूया (लोकसंख्या ११,०३७) हे शीनट व कापसाचे केंद्र असून येथे वेधशाळा आहे. बानफोरा येथे भात व फळांसाठी प्रायोगिक केंद्रे आहेत. काया (१०,३०४) व डेडूगू (३,८३८) ही व्यापारकेंद्रे आहेत. याशिवाय व्होल्टा नदीकाठी एक राष्ट्रीय उद्यान असून लोक शिकारीसाठी येथे जातात.
संदर्भ : 1. Gunther, J. Inside Africa, London, 1955.
2. Mountjoy, A. B. Embleton, Clifford, Africa A Geographical Study, London, 1965.
पाठक, अ. नी.
“