माळवा : (१) मध्य भारतातील प्रसिद्ध सुपीक पठारी प्रदेश. राजकीय दृष्ट्या हा प्रदेश राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत विभागला गेला आहे. प्राकृतिक दृष्ट्या माळवा हा सातपुडा पर्वताच्या मुख्य श्रेणीपासून उत्तरेस वाहणाऱ्या चंबळ नदी पाणलोटाचा पठारी प्रदेश म्हणता येईल. याच्या दक्षिणेस सातपुडा पर्वत असून पूर्वेस भोपाळ ते चंदेरीपर्यंतची याच पर्वताची पुराणात उल्लेखिलेली कुलाचल पर्वतरांग, पश्चिम भागात अमझर ते चितोड अशी विंध्याचलाचीच आणखी एक रांग व उत्तर भागात चितोड ते चंदेरी अशी मुंकुदबारी किंवा मुकुंदबारा डोंगररांग आहे. मात्र वेगवेगळ्या काळात माळवा प्रांतात कमीअधिक प्रदेश समाविष्ट होऊन त्याची व्याप्ती बदलत राहिली. मुसलमानी अमदानीत दक्षिणेकडे निमाड जिल्ह्याचा भाग, पश्चिमेकडे मेवाडचा काही प्रांत, उत्तरेकडे बुंदी व कोटा यांपैकी भाग व आग्नेयीकडे गढमंडलापर्यंतचा भाग माळव्यातच मोडत असे. प्राचीन काळी कुंतल म्हणजे हल्लीचा मंदसोरचा परिसर, बागर म्हणजे बांसवाड्याचा परिसर, रथ म्हणजे झाबुआ-जोबाट विलिनीकरणापूर्वीच्या संस्थानाचा मुलूख सोंडवाडा म्हणजे मेहिदपूरच्या आसपासच्या प्रदेश, उमातवाडा म्हणजे पूर्वीची राजगढ, नरसिंहगढ संस्थाने व खीचीवाडा म्हणजे पूर्वीचे राघोगढ संस्थान, हे माळव्याचे सहा भाग मानलेले दिसून येतात. भूरचनेनुसार माळव्याचे चार विभाग पडतात: माळव्याचे पठार, विंध्य पर्वत, नर्मदा नदीचे खोरे व सातपुडा पर्वत. कर्कवृत्त यांच्या जवळजवळ मध्यातून जाते. या नोंदीत फक्त माळव्याच्या पठारी भागाचे विवरण केले आहे.

माळवा पठाराच्या स्वाभाविक सीमा म्हणजे उत्तरेकडे मुकुंदबारा डोंगररांग, पूर्वेस सागरचे पठार, दक्षिणेस विंध्य पर्वत व पश्चिमेला विंध्य पर्वतातूनच फुटलेली व पुढे अरवलीला मिळणारी डोंगराची रांग या होत. पठाराची सस.पासूनची उंची सु. ५०० ते ६०० मी. असून पठारावर पूर्व-पश्चिम बेटवा, चंबळ व मही या नद्यांच्या खोऱ्यांचे वरचे भाग येतात. माळव्याचे पठात मुख्यतः बेसाल्टचे क्रिटेशस काळात बनलेले असून त्यात सर्वत्र लाटेसारखी सौम्य उंच सखलपणा असलेली मैदाने आणि लहानलहान टेकड्या व छोट्या डोंगररांगा दिसतात. हा प्रदेश सुपीक असून येथील काळी जमीन प्रसिद्ध आहे. या प्रदेशात सु. ७० सेंमी. पाऊस पडतो गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, अफू ही मुख्य पिके भरपूर येतात. माळवी गव्हाची गणना भारतातील सर्वोत्कृष्ट गव्हांत होते. चंबळ (चर्मण्वती) ही इतिहासकाळापासून प्रसिद्ध असलेली मुख्य नदी आता गांधीसागर तलावामुळे विशेष प्रसिद्ध झाली  आहे. क्षिप्रा, मोठी व छोटी कालीसिंध आणि पार्वती ह्या माळव्यातील इतर प्रमुख नद्या होत.

येथील मूळचे लोक राजस्थानी भाषेची माळवी किंवा रांगडी बोली बोलतात. बुंदेलखंडी, बाघेलखंडी, हळवी, गोंडी, भिलाली ह्या प्रादेशिक भाषा होत. स्त्री पुरूषांचा पोषाखही पुष्कळसा राजस्थानी लोकांसारखाच असतो. स्त्रियांच्या वस्त्रप्रावरणांत गडद लाल व पिवळा हे रंग प्रकर्षाने दिसतात. माळवा प्रामुख्याने कृषिप्रधान असला, तरी अलीकडे उद्योगधंद्याचीही वाढ झपाट्याने होत असून इंदूर, उज्‍जैन, नागदा, रतलाम, ही त्या दृष्टीने महत्त्वाची व वाढती शहरे आहेत. देवास, धार, महू, मंदसोर, विदिशा, सारंगपूर, चंदेरी इ. इतर माळवी शहरेही प्रसिद्ध आहेत. बाघची लेणी, सांचीचा स्तूप, मांडूचा किल्ला इ. माळव्यातील ऐतिहासिक वास्तू प्रेक्षणीय आहेत. प्राचीन काळी माळवा सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत प्रांत होता. साहित्य, संगीत, वास्तुकला, शिल्प व चित्रादी कलांना राजाश्रय होता. कालिदास, शुद्रक इ. संस्कृत कवी व नाटककार, केशवदास, बिहारी, कुंभनदास, हरिदासस्वामी, छत्रसाल हे हिंदी कवी तसेच बाजबहाद्‌दूरसारखे संगीतज्ञ प्रसिद्ध आहेत. आजही माळव्यातील हिंदी-मराठी साहित्यिक आपापल्या क्षेत्रात महत्त्वाची निर्मिती करीत आहेत. राजकवी रा. अ. काळेले यांना आजच्या श्रेष्ठ मराठी कवीत मानाचे स्थान असून वि. सी. सरवटे यांचा मराठी साहित्य समालोचन ग्रंथ मान्यता पावला आहे. विलायतखाँ, रईसखाँ, हे माळव्यातील होत. कुमार गंधर्व यांनी माळव्यातील लोकगीतांना भारतीय संगीतामध्ये उच्‍च स्थान प्राप्त करून दिले आहे. वसंतपंचमी, महाशिवरात्र, हुताशनी, जन्माष्टमी, रक्षाबंधन, दसरा, दिवाळी हे सण माळव्यात विशेष उत्साहाने साजरे होतात.

मालव जमातीचा उल्लेख रामायण, महाभारतात असून विष्णु पुराणात मालव लोक पारियात्र पर्वतावर म्हणजे पश्चिम विंध्य पर्वतावर राहत असल्याचे म्हटले असले तरी इ. स. पू. दुसऱ्या शतकापर्यंत मालव भूमीचा कोठेही उल्लेख नाही. यानंतरच्या कालातही मालव भूमीचे उल्लेख येतात ते हल्लीच्या माळव्याचे नसून राजस्थान, गुजरात, पंजाबमधील काही भागांचे निदर्शक आहेत. काही संशोधकांच्या मते ग्रीक लेखकांनी वर्णिलेले पंजाबातील रावी व चिनाब नद्यांच्या दुआबात राहणारे सिथियन वंशी मॅलाय म्हणजेच मालव जमात होय. एकंदरीत मालव जमात भटकी असून कालांतराने हल्लीच्या माळव्यात स्थायिक झाली असे दिसते. याच लोकांनी इ. स. पू. ५७ मध्ये सुरू केलेल्या कालगणनेस पुढे विक्रम संवत हे नाव मिळाले असावे.

गौतम बुद्धाच्या वेळी भारतातील सोळा राज्यांपैकी माळवा एक असून त्यात अवंती (उज्‍जैन), माहिष्मती (महेश्वर) व विदिशा ही शहरे होती. मौर्यकाळात माळवा मौर्य साम्राज्याचा पश्चिम प्रांत असून अशोक येथील राज्यपाल होता. पहिल्या ख्रिस्ती शतकात माळव्यावर क्षत्रपांची सत्ता स्थापन झाली व ती सु. तीन शतके टिकली. या क्षेत्रापांपैकी चाष्टनाचा उल्लेख टॉलेमीच्या ग्रंथात आढळतो. रूद्रदामन हा या वंशापैकी प्रसिद्ध सम्राट होता. जुनागढच्या शिलालेखात पूर्व आणि पश्चिम माळवा याच्या साम्राज्यात असून उज्‍जैन ही त्याची राजधानी होती असे म्हटले आहे. शक क्षत्रपानंतर माळव्यावर गुप्त सत्ता स्थापन झाली. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील प्रशस्ती लेखात ‘सरहद्दीवरील जमात’ असा माळव्यातील लोकांचा उल्लेख आहे. समुद्रगुप्ताचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त याने क्षत्रपांची हकालपट्टी करून ३९० मध्ये माळवा गुप्त साम्राज्यास जोडला. पुढे हूणांच्या हल्ल्यांमुळे गुप्तांची येथील सत्ता मोडकळीस येऊन माळवा मिहिरकुल व इतर हूणांच्या ताब्यात गेला. हूणांच्या क्रौर्यामुळे प्रजेत बेदिली माजली. तेव्हा मंदसोरचा पराक्रमी राजा यशोधर्मन याने मगधचा राजा नरसिंह गुप्त बालादित्य याच्या साहय्याने  हूणांना माळव्यातून हुसकावून लावले. या पराक्रमामुळे यशोधर्मनला प्रति विक्रमादित्य म्हणू लागले. यशोधर्मनंतर माळव्यात अनेक लहान लहान राज्ये निर्माण झाली. सातव्या शतकात गुप्त घराण्याच्या एका शाखेचे माळव्याच्या काही भागावर राज्य होते. त्यांचा पराभव करून सम्राट हर्षाने आपल्या साम्राज्यात माळव्यांचा समावेश केला व पुढे या साम्राज्याच्या विघटनानंतर निरनिराळी रजपूत राज्ये माळव्यात स्थापन झाली. त्यांपैकी परमारांचे राज्य महत्त्वाचे होय. परमार वंशीय राजा दुसरा भोज (१०१०–१०५०) साहित्यकलादींचा आश्रयदाता म्हणून विख्यात आहे. माळव्यावर स्वारी करणारा पहिला इस्लामी राजा गुलामवंशीय अल्तमश होय. त्याने १२३५ मध्ये उज्‍जैन शहरातील महाकाळ मंदिर व अनेक भव्य इमारती उद्‌ध्वस्त केल्या. गुलामवंशानंतर माळव्यावर खलजी व नंतर घोरी या घराण्यांची सत्ता स्थापन झाली. सोळाव्या शतकाच्या अखेरीस अकबराने माळवा मोगल साम्राज्यास जोडला. अठराव्या शतकातील मोगल-मराठा संघर्षात दिल्लीच्या मार्गावरचा नर्मदेच्या उत्तरेकडील हा पहिलाच मोगली सुभा असल्याने माळव्यावर मराठ्यांच्या अनेक स्वाऱ्या झाल्या व उज्‍जैनला शिंदे इंदूर व महेश्वरला होळकर आणि धार व देवासला पवार या घराण्यांची मराठी संस्थाने उदयास आली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात माळव्यावर ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. तेथील मराठा, राजपूत, मुसलमान संस्थानिकांनी त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. १८५७ च्या उठावात महू, इंदूर, नीमच, अगार, मंदसोर, सिहोर इ. ठिकाणी शिपायांनी उठाव करून ब्रिटिशांना शह देण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्योत्तर काळात माळवा मध्य भारत संघात आणि राज्य पुनर्रचनेनंतर मध्य प्रदेशात अंतर्भूत करण्यात आला.

(२) पंजाबातील उत्तर अंक्षांश २९° ३१ व पूर्व रेखांश ७४° ३० ते ७७° मधील प्रदेशालाही माळवा म्हणतात. त्यात फिरोजपूर, लुधियाना जिल्हे व पूर्वीची पतियाळा, जींद, नाभा, मालेर कोटला संस्थानांचा मुलूख येतो. शीख योद्धा बंदा बैरागी याने या भागातील शीख भूमीला हे नाव देऊन हा मुलूख माळव्याइतकाच समृद्ध होईल असा आशिर्वाद दिल्यापासून या भागाला माळवा नाव पडले.

पंडित, अविनाश देशपांडे, चं. धुं.