अल्बुकर्क : अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या २,४३,७५१ (१९७०). हे रीओ ग्रँड या नदीकाठी वसले असून सांताफेच्या नैर्ऋत्येला ८८ किमी. आहे. १७०६ मध्ये स्पॅनिश वसाहतवाल्यांनी हे शहर स्थापून त्या वेळच्या राज्यप्रतिनिधीचे नाव शहराला दिले. याच्या आसमंतात होणारा शेतमाल, लाकूडफाटा आणि पशुधन यांसाठी हे व्यापाराचे, उद्योगाचे आणि दळणवळणाचे मोठे केंद्र समजले जाते. येथे अन्नपदार्थांवर प्रक्रिया करणे, फळे डबाबंद करणे, लाकूड कापणे व फर्निचर बनविणे, लोकरउद्योग, सिमेंटउद्योग, धातुकाम, रेल्वेवर्कशॉप वगैरे व्यवसाय आहेत. समुद्रसपाटीपासून १,५०८ मी. उंच असल्याने येथील हवा उत्तम आहे. त्यामुळे येथे काही प्रसिद्ध आरोग्यधामे व दवाखाने स्थापन झालेले आहेत. न्यू मेक्सिको विद्यापीठ, इंडियन लोकांसाठी असलेले विद्यालय, शिक्षक-महाविद्यालय, चर्च प्लाझा, सिबोला नैसर्गिक अरण्य वगैरे महत्त्वाची स्थळे येथे आहेत. अमेरिकेच्या हवाईदलाचा विमानतळ येथे असून दुसऱ्या महायुद्धानंतर आण्विक संशोधनप्रयोगशाळेची एक शाखाही येथे सुरू झाली आहे.

लिमये, दि. ह.