अल्बेनियन भाषा व साहित्य : अल्बेनियन ही एक इंडो-यूरोपियन भाषा आहे. ती मुख्यत: अल्बेनिया, दक्षिण इटली, सिसिली, यूगोस्लाव्हिया, ग्रीस, अमेरिका इ. प्रदेशांत बोलली जाते. १९२०च्या सुमारास तिच्या भाषिकांची संख्या यूरोपात जवळजवळ पंधरा लक्ष होती. आज सर्व जगात मिळून ती बोलणारे सु. पंचवीस लक्ष असावेत. अल्बेनियन लोक स्वत:ला ‘श्किपेतार’ म्हणजे ‘गरुडदेशीय’ म्हणवितात.

इंडो-यूरोपियन भाषा म्हणून अल्बेनियन ही सर्वांत शेवटी माहिती झाली. या भाषेतील पहिले हस्तलिखित (१४६२) रोमन विधीनुसार होणाऱ्या नामकरण-संस्काराचे आहे. त्यानंतर आर्नोल्ट फोन हार्फने १४९६ मध्ये केलेला एक छोटा शब्दसंग्रहही उपलब्ध आहे. पहिले मुद्रित साहित्य १५५५ मधील आहे. १६३५ मध्ये एक लॅटिन—अल्बेनियन शब्दकोशही प्रसिद्ध झाला.

या भाषेच्या दोन महत्त्वाच्या पोटभाषा आहेत : उत्तरेकडे गेग व दक्षिणेकडे तोस्क. तोस्क बोली बोलणारे अनेक लोक इटलीत आढळतात.

अल्बेनियन ही सांस्कृतिक द‌ृष्ट्या महत्त्वाची भाषा कधीच नव्हती. त्यामुळे सांस्कृतिक श्रेष्ठत्व असणाऱ्या आजूबाजूच्या लॅटिन, इटालियन (इतालियन), ग्रीक व स्लाव्हिक भाषांचा तिच्यावर फार मोठा प्रभाव पडलेला आहे. त्यात लॅटिनचा प्रभाव सर्वांत अधिक आहे. १९१४च्या आरंभाला जेव्हा अल्बेनिया हे राज्य निर्माण केले गेले, तेव्हा तेथील अधिपतीला ‘म्ब्रेत’ ही पदवी दिली गेली. हा शब्द लॅटिन ‘इंपेरातोर’ या शब्दाचा अपभ्रंश आहे.

अल्बेनियनची ध्वनिपद्धती पुढीलप्रमाणे आहे :

स्वर: इ,इ‍ॅ,उ

          ए,ऍ,ओ

          आ

व्यंजने:स्फोटक—प,त,क,ब,द,ग

              घर्षक —फ़,थ़,व़,ध़

              ऊष्म —स,श,झ, भ्फ

              तालव्य—क,ॻ

              अनुनासिक—म,न,ङ

             द्रव —र,ल,ळ,य

             महाप्राण —ह

खुलासा – (१) इ‍ॅ, ऍ यांवरील अर्धचंद्र हे ध्वनी उच्चारताना ओठ गोल होतात असे दर्शवतात. (२) झ, भ्फ हे स, श यांचे सघोष मिळते वर्ण आहेत. (३) तालव्य वर्ण मृदुतालूला जिभेचा शक्य तितका पुढे स्पर्श होऊन मिळतात. (४) ळ चा उच्चार दंतमूलीय असून तो होताना जिभेचा संकोच होतो.

अल्बेनियनमध्ये दोन लिंगे आहेत : पुल्लिंग व स्त्रीलिंग. नपुंसकलिंगाचे काही अनेकवचनी अवशेष आढळतात. प्रथमा, चतुर्थी-षष्ठी व द्वितीया या विभक्ती आहेत. (उदा., मिक्=मित्र, मिकु=मित्राला, मिंकुत्=मित्राला, मित्राचा).

विशेषणाला विकार होत नाही पण क्रियापदाची रूपे मात्र विपुल व गुंतागुंतीची आहेत‍.

एक ते दहा अंकांची संख्यावाचक रूपे केवळ तुलनेसाठी पुढे दिली आहेत : १ न्ये‍ ‍ , २ दी‍ ‍, ३ त्रे, ४ काते‍ ‍ र्‌,५ पेसे‍ ‍, ६ ग्याश्ते‍ ‍, ७ श्ताते ते‍‍‍‍ ‍, ८ तेते‍ ‍, ९ ने‍ ‍न्ते‍ ‍ आणि १० ध्येते‍.

कालेलकर, ना. गो.

साहित्य : ऑटोमन साम्राज्यात अल्बेनियन भाषेवर बंदी घालण्यात आली. पुढे झोग राजांच्या काळात मात्र तिचा शिक्षणसंस्थांमधून अभ्यास होऊ लागला. सोळाव्या व सतराव्या शतकांपासूनच अल्बेनियन साहित्य मुख्यत: निर्माण झालेले दिसते. लोकसाहित्यातील गीते, पोवाडे व कथा एवढेच पारंपारिक साहित्य या भाषेत आहे. ऑस्ट्रियाचे राजकीय महत्त्व वाढविण्यासाठी प्रयत्‍न करणाऱ्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांनीही धार्मिक स्वरूपाचे साहित्य लिहिले.

आधुनिक काळातील अल्बेनियन साहित्यिकांत नाइम फ्रेशेरी (१८४६-१९००) या श्रेष्ठ भावकवीची गणना होते. त्याचा ‘पशुधन व मायदेश’ या शीर्षकार्थाचा Bageti Bujqesi हा काव्यग्रंथ प्रसिद्ध आहे. ग्येर्गी फिश्ता (१८७१-१९४१) हा महाकवी असून, Lahuta e Malcis हे त्याचे महाकाव्य होय. ‘रानातील बासरी’ असा त्याच्या शीर्षकाचा अर्थ. फन नोली (१८८२ —   ) याने शेक्सपिअर व इतर यूरोपियन लेखक यांच्या साहित्याचे अल्बेनियन भाषेत भाषांतर केले आहे.

पांडे. वि. गो.

 संदर्भ : Newmark, L. Structural Grammar of Albanian, Bloomington, Indiana, 1957.