ॲप्लाइट : बारीक, समकणी, निराकार कणी, व सारखेच्या राशीसारखी संरचना असणारे व लहान भित्तींच्या, शिलापट्टांच्या (थरांना समांतर घुसलेल्या अग्निज राशींच्या) किंवा शिरांच्या स्वरूपात आढळणारे खडक. त्यांचा व पातालिक (भूपृष्ठाखाली खोल जागी तयार झालेल्या) खडकांचा संबंध असतो व पातालिक खडकांइतकेच त्यांचे प्रकार असतात. संबंधी पातालिक खडकांच्या नावाला ‘ॲप्लाइट’ हे नाव जोडून (उदा., ग्रॅनाइट-ॲप्लाइट, डायोराइट-ॲप्लाइट) त्यांचा प्रकार दर्शविला जातो. ॲप्लाइटांचे संघटन संबंधी पातालिक खडकांपेक्षा अधिक सिकत (सिलिकेचे प्रमाण अधिक असलेले) असते व संबंधी पातालिक खडकातील काळसर खनिजे त्यांच्यात जवळजवळ नसतात. ॲप्लाइटांपैकी सर्वांत विपुल म्हणजे ग्रॅनाइट ॲप्लाइट होत. इतर विशेषतः अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) पातालिक खडकांचे ॲप्लाइट विरळाच आढळतात. म्हणून ग्रॅनाइट-ॲप्लाइटाला सामान्यतः नुसते ‘ॲप्लाइट‘ म्हणतात. ते जवळजवळ सर्वस्वी फेल्स्पार व क्वॉर्ट्झ या खनिजांचे बनलेले असतात. त्यांच्या भित्ती, शिलापट्ट व शिरा ग्रॅनाइटात व ग्रॅनाइटालगतच्या देशीय खडकांत आढळतात.
केळकर, क. वा.