अल्फिलस : (सु. ३११—सु. ३८३). गॉथिक बिशप. ३४१ मध्ये तो बिशप झाला. गॉथिक भाषेत त्याने अनुवादिलेले बायबल ही त्याची मुख्य कामगिरी. हे बायबल आज त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. लेखनासाठी त्याने वापरलेली वर्णमाला त्यानेच ग्रीक वर्णमालेच्या धर्तीवर तयार केली होती, असे सांगितले जाते. त्याचे हेबायबल म्हणजे जर्मानिक समूहाच्या भाषांतील अत्यंत प्राचीन हस्तलिखितांपैकी एक होय.

कुलकर्णी, अ. र.