अन्नपूर्णा: हिमालयाची एक शाखा. नेपाळ-हिमालयाच्या मध्यभागात हिची गणना होते. अन्नपूर्णेचा प्रदेश गिरिपिंडात्मक असून ५९ किमी. पसरलेला आहे. या भागातून वाहणाऱ्‍या हिमनद्या या प्रदेशाच्या पश्चिमेकडील काली गंडकी, दक्षिणेकडील सेती गंडकी व उत्तरेकडील मर्स्यन्दी या नद्यांना मिळतात. या प्रदेशाच्या पश्चिम टोकास अन्नपूर्णा-१(उंची : ८,०७५मी.), पूर्वेस अन्नपूर्णा-२(७,९३७मी.) आणि दक्षिणेस अन्नपूर्णा-३(७,५७७मी.) व अन्नपूर्णा-४(७५२५मी.) अशी चार शिखरे आहेत. अन्नपूर्णेस संस्कृतमध्ये ‘हिमाल’ म्हटलेले आढळते नेपाळमध्ये तिला ‘सुगीचा देवता’ म्हणतात. जगातील अत्युच्च शिखरांमध्ये अन्नपूर्णा-१ शिखराचा अकरावा क्रमांक लागतो. १९२५ पर्यंत अन्नपूर्णेविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध होती. १९२५ मध्ये भारतीय भूमापन-तज्‍ज्ञांना या प्रदेशाचे स्थान व उंची मोजण्याची नेपाळ सरकारने परवानगी दिली. दुसऱ्‍या महायुद्धानंतर मात्र हा प्रदेश अवलोकनासाठी मोकळा करण्यात आला. १९५० मध्ये फ्रेंच गिर्यारोहक मॉरिस हेरझोक व त्याच्या सहकाऱ्‍यांनी आणि मे १९७० मध्ये डोलाल्ड विल्यम्स आणि डुग्गल हॅस्टन या ब्रिटिश गिर्यारोहकांनी अन्नपूर्णा-१ हे शिखर जिंकले. १९५५ मध्ये बिलर, स्टाइनमेट्स व वेलेनकँप या जर्मन गिर्यारोहकांनी आणि १९७० मध्ये ताकेओ व कुरूतानी या जपानी गिर्यारोहकांनी अन्नपूर्णा-४ हे शिखर चढून जाण्याचा विक्रम केला. अन्नपूर्णा-२ हे शिखर १९६० मध्ये रॉबर्ट्‌सच्या नेतृत्वाखाली गेलेल्या ब्रिटिश, भारतीय व नेपाळी गिर्यारोहकांनी सर केले. मे १९७० मध्ये जपानच्या अकरा महिलांनी अन्नपूर्णा-३ हे शिखर सर केले. हिमालयातील उंच शिखर गाठणाऱ्‍या या पहिल्याच महिला होत.

खातु, कृ. का.