तिंबक्तू : (तोंबूक्तू). पश्चिम आफ्रिकेतील माली प्रजासत्ताकाचे एक कारभाराचे ठाणे. लोकसंख्या १०,४४५. हे सहाराच्या दक्षिण सीमेवर नायजर नदीपासून सु. १३ किमी. वसले असून इ. स. १४०० ते १६०० पर्यंत मुस्लिम संस्कृतीचे व सहारातून जाणाऱ्या कारवान मार्गाचे केंद्र होते. हे सोने, मीठ व गुलाम यांच्या व्यापारामुळे भरभराटीस आले. ते इ. स. ११०० च्या सुमारास त्वारेग या भटक्या जमातीने बसविले असावे. इब्न बतूता तेथे १५५३ मध्ये गेला होता, तेव्हा ते त्या वेळच्या माली साम्राज्यात होते. मन्स मूसा या सुलतानाने तेथील मोठ्या मशिदीचा मनोरा बांधला. १४६८ ते १५९१ पर्यंत ते साँग्गाई सुलतानांकडे होते. त्या वेळी तेथे कापड व घोडे यांचाही व्यापार चाले व अनेक मुस्लिम विद्वान तेथे राहत. १५९१ मध्ये मोरोक्कोच्या सुलतानाने ते जिंकून घेतल्यावर मात्र त्याचा ऱ्हास झाला. नंतर बांबारी, फूलानी, त्वारेग इत्यादिकांच्याही स्वाऱ्या झाल्या. अखेर १८९३ मध्ये ते फ्रेंचांनी घेतले व फ्रेंच प. आफ्रिकेच्या एका प्रांताचे ठाणे केले. १९६० मध्ये ते माली प्रजासत्ताकात समाविष्ट झाले. येथे विमानतळ असला तरी लोहमार्ग किंवा पक्की सडक नाही. उंटावरून अथवा नदीमार्गेच येथे जावे लागते. येथे अनेक प्राचीन किल्ले व मशिदी यांचे अवशेष आहेत.

लिमये, दि. ह.