अनंत कंदली : (१६ वे शतक). असमिया भाषेत रचना करणारा एक कवी. गौहातीपासून सु. २५ किमी. वरील होजो या वैष्णवांचे केंन्द्र असलेल्या गावी सोळाव्या शतकाच्या मध्यावर अनंत कंदलीचा जन्म झाला. होजो येथील माधवमंदीरात त्याचे वडील एक भगवती(भागवतपठण करणारे) होते. अनंत कंदलीचे खरे नाव हरिचरण असे होते परंतु त्याच्या काव्यगुणांवर व पांडित्यावर मोहित होऊन त्याच्या चाहत्यांनी त्याला ‘अनंत कंदली’, ‘भागवत भट्टाचार्य’, ‘चंद्रभारती’ अशी बहुमानाची नावे बहाल केली. ह्या नावांतील अनंत कंदली हे नावच पुढे रूढ झाले. न्याय-मीमांसा व वैष्णवांचे सांप्रदायिक साहित्य यांत त्याची असामान्य गती होती आणि त्यामुळे त्याला अनेक बहुमान प्राप्त झाले.
शंकरदेवांच्या सान्निध्यात येताच तो कट्टर वैष्णव बनला आणि त्याने स्वत:स वैष्णवधर्मप्रसारासाठी वाहून घेतले. ⇨शंकरदेवांच्या अनुज्ञेने त्याने भागवताच्या दशम स्कंधाचा बराच मोठा भाग भाषांतर करण्यासाठी घेतला. हे गद्य भाषांतर मध्यम दशम आणि शेष दशम या नावांनी असमिया भाषेत विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय त्याने आपल्या ओघवत्या शैलीत रामायणाचा उत्कृष्ट अनुवाद केला आहे. त्याचे इतर उल्लेखनीय काव्यग्रंथ म्हणजे कुमार-हरण काव्य, महिरावणवध, वृत्रासुरवध, जीव-स्तुति, भरत-सावित्री हे होत. या ग्रंथांत त्याचे पांडित्य आणि काव्यगुण विशेषत्वाने आढळतात.
सर्मा, सत्येंन्द्रनाथ (इं.) शिरोढकर, द.स. (म.)