अतिशायितावाद : (ट्रॅन्सेंडेंटॅलिझम). तत्त्वज्ञानातील एक विचारसरणी. अतिशायितावादाचा स्थूल अर्थ असा सांगता येईल : इंद्रियगोचर विश्वापलीकडचे असे अस्तित्व आहे आणि तार्किक अनुमानाहून अन्य मार्गांनी ह्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला होऊ शकते किंवा त्याचा अनुभव आपल्याला प्राप्त होऊ शकतो, ही अतिशायितावादाची सारभूत भूमिका. आधुनिक काळात अतिशायितावादाचा उगम मुख्यत: इमॅन्युएल कांटच्या तत्त्वज्ञानात आहे. परंतु कांटपूर्वी व कांटपासून स्फूर्ती न घेतलेल्या नंतरच्या विचारवंतांतही अतिशायितावादी विचारसरणी आढळते. उदा., मध्ययुगीन स्कोलॅस्टिक तत्त्ववेत्ते ‘सत्’, ‘एक’, ‘शिव’ इ. संकल्पना एरवीच्या तार्किक संकल्पनांपलीकडच्या व म्हणून तार्किक विचारापलीकडच्या आहेत असे मानीत ह्या संकल्पना त्याच्या दृष्टीने ‘अतिशायी’ आहेत. स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञानात ह्याच स्वरूपाचा दुसरा विचार आढळतो. तो हा, की ईश्वराचे अस्तित्व आणि स्वरूप अतिशायी आहे. ईश्वराचे स्वरूप परिपूर्ण असल्यामुळे मानवी अनुभवाचे विषय असलेल्या अपूर्ण वस्तूंना, व्यक्तींना उद्देशून जी विधेये वापरता येतात—उदा., अस्तित्व, ज्ञान, चांगुलपणा इ.—ती त्याच अर्थाने ईश्वरावर आरोपित करता येत नाहीत ईश्वराचे स्वरूप अनाकलनीय व अवर्णनीय आहे. कांटच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला अतिशायितावाद : कांट मानवी ज्ञानाची व्याप्ती इंद्रियगोचर विश्वापुरतीच मर्यादित आहे असे मानतो. परंतु त्याच्या दृष्टीने इंद्रियवेदने मानवी ज्ञानाला केवळ आशय पुरवितात. उलट मानवी ज्ञानाला त्याचा अर्थपूर्ण तार्किक आकार कित्येक मूलभूत संकल्पनांकडून वेदनांचे संश्लेषण, सुव्यवस्थित एकत्रीकरण झाल्यामुळे प्राप्त होतो. मानवी ज्ञानाला त्याचा तार्किक आकार देणाऱ्या ह्या संकल्पना कांटच्या मते मानवी बुद्धीतच अनुस्यूत असतात. वेदनांपासून आपण त्या प्राप्त करून घेतलेल्या नसतात तर त्या पूर्वप्राप्त असतात. स्वत:च्या बुद्धीतच अंतर्भूत असलेल्या ह्या पूर्वप्राप्त संकल्पनांच्या साहाय्याने वेदनांचे संश्लेषण करणारा आणि अशा रीतीने ज्ञान प्राप्त करून घेणारा हा ज्ञाता किंवा विषयी हा वेदनांहून भिन्न असून त्यांच्या पलीकडचे असे त्याचे अस्तित्व असते. तेव्हा हा शुद्ध ज्ञाता आणि त्याच्या ज्ञानशक्तीत अंतर्भूत असलेल्या पूर्वप्राप्त संकल्पना ही मानवी अनुभवातील आणि मानवी अनुभवाला प्रतीत होणाऱ्या विश्वातील अतिशायी, वेदनांपलीकडली तत्त्वे होत. कांटच्या ह्या ज्ञानमीमांसेचा एक परिणाम असा, की अस्तित्वाचे जे स्वत:चे, खरेखुरे स्वरूप आहे त्याचे ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही, ही भूमिका स्वीकारावी लागते. आपल्याला प्राप्त झालेली वेदने पूर्वप्राप्त संकल्पनांकडून संश्लेषित झाल्यामुळे इंद्रियगोचर वस्तू सिद्ध होतात आणि त्याच केवळ मानवी ज्ञानाचे विषय होत. मूळच्या वस्तूंचे, त्या जशा आहेत, त्या स्वरूपातले साक्षात दर्शन आपल्याला होऊ शकत नाही. परंतु ह्या वस्तूंच्या स्वरूपाचे ज्ञान जरी आपल्याला होऊ शकले नसले, तरी त्यांच्या अस्तित्वाचे, त्या वस्तू आहेत, हे ज्ञान आपल्याला असते. इंद्रियानुभवापलीकडच्या ह्या अस्तित्वाला कांट अतिवर्ती वस्तू म्हणतो आणि इंद्रियसंवेदनांहून भिन्न असलेल्या, पण त्यांना तार्किक आकार आणि अर्थपूर्णता प्राप्त करून देणाऱ्या तत्त्वांना (ज्ञाता आणि पूर्वप्राप्त संकल्पना ह्यांना) कांट अतिशायी, तत्त्वे म्हणतो.कांटची ज्ञानमीमांसा तार्किक दृष्ट्या अस्थिर वाटावी अशी आहे. अतिवर्ती वस्तूंच्या स्वरूपाचे ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही परंतु त्यांच्या अस्तित्वाचे आपल्याला ज्ञान असते, असे म्हणण्यात अडचण आहे. एखाद्या वस्तूच्या स्वरूपाचे जर आपल्याला काहीच ज्ञान नसेल, तर ती आहे हे तरी आपल्याला कसे कळते? शिवाय कांटने मानवी अनुभवाचे स्वरूप दुहेरी कल्पिले आहे. वेदने आणि अतिशायी तत्त्वे हे दोन भिन्न घटक एकत्रित होऊन मानवी अनुभव सिद्ध होतो. कांटनंतरच्या काही जर्मन विचारवंतांनी मानवी अनुभवापलीकडची अज्ञेय अशी अतिवर्ती वस्तू आणि इंद्रियगोचर वस्तू ह्या द्वंद्वाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. मानवी अनुभवाचे कांटने जे दुहेरी स्वरूप कल्पिले होते, त्याऐवजी त्याचे स्वरूप त्यांनी एकात्म मानले आणि ह्या एकात्म स्वरूपाचा आधार कांटने ज्यांना अतिशायी किंवा अतिवर्ती मानले होते, अशा तत्त्वांत शोधला. ह्या विचारवंतांचे, विशेषत: फिक्टे, शेलिंग व हेगल यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे तत्त्वज्ञान ‘जर्मन अतिशायितावाद’ ह्या नावाने ओळखले जाते. उदा., फिक्टे हा अतिशायी असा ज्ञाता आपल्या जाणण्याच्या निर्मितिशील अशा कृतीतून ज्ञेय विषय (वस्तूंचे जग) ‘स्थापित’ करतो, निर्माण करतो असे मानतो. शेलिंग हा ज्ञाता आणि विषय ह्या द्वंद्वाच्या दोन्ही कोटींपलीकडे असलेली अपक्ष अशी सत्ता आहे आणि अंत:प्रज्ञेवर आधारलेल्या साक्षात दर्शनाने ह्या सत्तेशी आपला परिचय होतो, असे मानतो. हेगेलच्या मताप्रमाणे शुद्धस्वरूप ज्ञाता स्वत:हून भिन्न, स्वत:ला ‘पर’ अशा विषयाची स्थापना करतो आणि ह्या बाह्य, ‘पर’ अशा विषयात स्वत:ला क्रमश: आधिकाधिक पर्याप्त प्रमाणात मूर्त करतो. ज्ञात्याचे बाह्य विषयात असे क्रमाने अधिकाधिक पर्याप्त प्रमाणात मूर्त होत जाणे ही प्रक्रिया म्हणजे विश्वाचा आणि मानवाचा इतिहास. हेगेलच्या मताप्रमाणे केवळ ज्ञाता किंवा केवळ विषय हे एकांगी अस्तित्व किंवा अस्तित्वाचे केवळ एक अंग होय. विषयात स्वत:ला मूर्त करून राहिलेला, विषयाला स्वत:चा आकार देऊन राहिलेला ज्ञाता, असेच मूर्त अस्तित्वाचे स्वरूप असते. 

जर्मन अतिशायितावादाचा प्रभाव इंग्लंडवर आणि अमेरिकेवर पडल्यावाचून राहिला नाही. कोलरिज आणि कार्लाइल ह्यांना त्यावेळी प्रचलित असलेल्या जडवादी, नास्तिक व उपयुक्ततावादी विचारसरणींचे खंडन करण्याचे हत्यार अतिशायितावादामध्ये सापडले. मानवी जीवनाचा, प्रेरणांचा व अनुभवांचा आध्यात्मिक व उदात्त अर्थ लावण्याला तात्त्विक आधार त्यांना लाभला. इंद्रियानुभव आणि तार्किक बुद्धी ह्या ज्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या शक्ती आहेत, त्याचप्रमाणे विवेक आणि कल्पनाशक्ती ह्याही मानवी मनाच्या ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या शक्ती आहेत आणि ह्या शक्ती मानवी मनाचा अतिशायी अस्तित्वाशी साक्षात संबंध जोडू शकतात, हे अतिशायितावादाचे मध्यवर्ती तत्त्व त्यांनी स्वीकारले होते आणि त्यावर आपला विचार आधारला होता. एमर्सन व थोरो हे प्रमुख अमेरिकन अतिशायितावादी होत. संकुचित धार्मिक मते आणि त्यांवर आधारलेली संकुचित नीती ह्यांच्यामुळे तत्कालीन अमेरिकन संस्कृतीत जो एक प्रकारचा कोंदटपणा आला होता, त्यापासून अतिशायितावादाच्या साहाय्याने ह्या विचारवंतांनी आपली सुटका करून घेतली. एक अधिक मोकळा, प्रसन्न, मानवी संस्कृतीत कुठेही जे जे चांगले असेल त्याच्यात आध्यात्मिकता पाहू शकणारा, उदार पण काहीसा भाबडा आणि संदिग्ध असा आध्यात्मिक दृष्टीकोन त्यांनी अतिशायितावादावर आधारला. 

संदर्भ : 1. Forthingham, O. B. Transcendentalism in New England A History, New York, 1876.

           2. Royce, Josiah, The spirit of Modern Philosophy Boston, 1892.

रेगे, मे. पुं.