ॲमॉय : चीनच्या आग्नेयीकडील फूक्येन प्रांतातील महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी शहर व बंदर. पूर्वीचे नाव ‘सूमिंग’ व सध्याचे चिनी भाषेतली ‘श्यामेन’. लोकसंख्या ३,०८,००० (१९६४). फॉर्मोसा सामुद्रधुनीमधील ॲमॉय उपसागरात, लुंग ज्यांग नदीच्या मुखापासून १६ किमी. अंतरावरील सु. ११६ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या बेटावर हे शहर वसले आहे. उन्हाळ्यातील वादळी वाऱ्यांपासून सुरक्षित, उत्तम नैसर्गिक बंदर, पृष्ठभागी फूक्येनचा प्रसिद्ध चहा व इतर उत्पन्ने असलेला समृद्ध प्रदेश व तैवान, मलाया, फिलिपीन्स यांना जवळचे केंद्र म्हणून ॲमॉयची झपाट्याने वाढ झाली. येथे रसायने, यंत्रे, कागद, मद्य आदींचे कारखाने असून चहा, तंबाखू, साखर, कापूर, कागद इत्यादींची निर्यात होते.
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पोर्तुगीज, डच, इंग्लिश व्यापारी येथून चीनशी व्यापार करण्याचा प्रयत्न करू लागले. १८४१ मध्ये ब्रिटिशांनी ॲमॉय काबीज केले. १८४२ च्या नानकिंगच्या तहानुसार पाश्चात्त्यांना व्यापार करण्यासाठी मुक्त केलेल्या पाच बंदरांत याचा समावेश होता. त्यानंतर मूळ बेटाच्या जवळील एका लहान बेटावर पाश्चात्त्यांची एक वसाहतच विकास पावली. १८९९ मध्ये जपाननेही ॲमॉयच्या दक्षिण भागातील टायगर टेकडीवर व्यापारी सवलती मिळविल्या. १९३९-४५ च्या दरम्यान ॲमॉय जपानच्या ताब्यात होते. १९४९ मध्ये ते चिनी कम्युनिस्टांच्या अमलाखाली गेले. मलायात स्थाईक झालेल्या रबराच्या मळ्याचा मालक के. के. टॅन याच्या देणगीवर ॲमॉयचे विद्यापीठ स्थापन झाले.
ओक, द. ह.