ॲक्रन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ओहायओ संस्थानातील मोठे औद्योगिक केंद्र. लोकसंख्या २,७५,४२५ (१९७०). हे क्लीव्हलँडच्या दक्षिणेस ५६ किमी. कायहोगा नदीकाठी वसले आहे. जगातील हे सर्वांत मोठे रबर-वस्तू (प्रामुख्याने टायर्स)-उत्पादनकेंद्र समजले जाते. याशिवाय येथे यंत्रे, मोटारी व विमानांचे सुटे भाग, बलून, दोरखंड, रसायने, कापड, पीठ, शल्यकर्म-यंत्रे, फर्निचर, काड्याच्या पेट्या वगैरे अनेक उद्योग आहेत. पिट्सबर्ग ह्या औद्योगिक केंद्राशी कालव्याने व ईअरी सरोवराशी नदीमार्गे हे जोडलेले असून हवाई मार्ग, लोहमार्ग व सडकांनी हे सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. ॲक्रन विद्यापीठ, गुडइयर इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट अशा शैक्षणिक संस्था येथे आहेत.

लिमये, हि. ह.