ॲमारिलिडेसी : (मुसली कुल). फुलझाडांच्या एकदलिकित वर्गातील ⇨लिलिएलीझ गणापैकी एक कुल. यामध्ये सु. ८६ वंश व १,०५० जाती असून त्या उष्ण व उपोष्ण कटिबंधांत पसरल्या आहेत. काही थोड्याच समशीतोष्ण कटिबंधात आढळतात (उदा., नार्सिसस पँक्रॅशियम  इ.) काही जाती तृणसंघातात (स्टेप्समध्ये) व इतर काही आफ्रिकेतील रुक्ष प्रदेशांत आढळतात. या कुलाची अनेक लक्षणे ⇨ लिलिएसीप्रमाणे असून पुढील फरक मात्र आढळतात : खोड बहुधा कंद, क्वचित मूलक्षोड [→खोड] फुलोरा बहुधा महाछदाने वेढलेली चामरकल्प वल्लरी [→पुष्पबंध] पुष्पमुकुटावर बहुधा तोरण असते. किंजपुट अधेस्थ, परागकोश विलोल व अंतर्मुख [→फूल] बियांत मांसल पुष्क (बीजाच्या पोषणास मदत करणारा एक भाग). निशिगंध, झेफीर लिली, कुमूर, नार्सिसस, गडांबी कांदा (नागदवणा) इ. ⇨ ओषधी शोभेकरिता लावतात. घायपात, नाताल हेंप, धाग्याकरिता प्रसिद्ध व काळी मुसळी औषधी आहे.

पहा : लिलिएलीझ; लिलिएसी.

परांडेकर, शं. आ.