अटलांटिक महासागर: विस्ताराने जगातील दुसऱ्‍या क्रमांकाचा महासागर. क्षेत्रफळ ८,१६,६२,३२५ चौ. किमी. आफ्रिकेमधील ॲटलास पर्वतावरून प्राचीन रोमन लोकांनी या महासागरास ‘अटलांटिक’हे नाव दिले असावे, असे काही लोकांचे मत आहे. सध्याच्या महासागराच्या मध्यावर पूर्वी अटलँटिस नावाचे खंड होते व त्यावरून या महासागरास हे नाव पडले असावे असेही एक मत आहे.ðमर्केटरचा १५६९ मधील जगाचा नकाशा व व्हेरेनियसचा जिऑग्राफिया जनरॅलिस हा ग्रंथ यांत सध्याच्या संपूर्ण अटलांटिक महासागरासाठी अटलांटिक हे नाव प्रथम वापरले गेले.

 

विस्तार व सीमा: या महासागराच्या पश्चिमेस उत्तर व दक्षिण अमेरिका, पूर्वेस यूरोप व आफ्रिका आणि दक्षिणेस अंटार्क्टिका ही खंडे आहेत. २० पू. रेखावृत्त ही अटलांटिक व हिंदी महासागरांमधील सीमा मानली जाते. उत्तरेचा आर्क्टिक महासागर हा काहींच्या मते अटलांटिकचाच एक उपसमुद्र आहे, तर उत्तरध्रुववृत्त व दक्षिणध्रुववृत्त या काहींच्या मते अटलांटिकच्या उत्तर व दक्षिण सीमा होत. यांच्या दरम्यान अटलांटिकची लांबी सु. १४,४५० किमी. आहे, तर अंटार्क्टिकापर्यंत ती सु. १६,००० किमी. आहे. सामान्यतः विषुववृत्ताच्या उत्तरेचा तो उत्तर अटलांटिक व दक्षिणेचा तो दक्षिण अटलांटिक असे असले तरी वारे, प्रवाह व तपमान यांच्या दृष्टीने दोहोंमधील सीमा ५ उ. अक्षवृत्त ही मानणे अधिक योग्य होय. दक्षिण अटलांटिकच्या मानाने उत्तर अटलांटिकमध्ये बेटे, उपसमुद्र आणि किनारे यांची विविधता अधिक आहे. कॅरिबियन समुद्र, मेक्सिकोचे आखात, सेंट लॉरेन्सचे आखात, हडसनचा उपसागर, बॅफिनचा उपसागर, भूमध्य समुद्र, काळा समुद्र, बाल्टिक समुद्र, बॅरेंट्‌स समुद्र, नॉर्वेजियन समुद्र हे अटलांटिकचे भाग होत. आर्क्टिक महासागरातून खुल्या अटलांटिकमध्ये बाहेर पडण्याच्या वाटा या सापेक्षतः अरूंद आहेत. हडसनची सामुद्रधुनी सु. १०३ किमी., डेव्हिस सामुद्रधुनी सु. ३२२ किमी., ग्रीनलंड व आइसलँड यांमधील डेन्मार्कची सामुद्रधुनी २५५ किमी. आणि आइसलँड व उत्तर स्कॉटलंड यांमधील अंतर सु. ८३४ किमी. आहे. दक्षिण अटलांटिकमध्ये मात्र केप हॉर्न व २० पूर्वरेखावृत्त यांच्या दरम्यानची अंटार्क्टिकाकडील अटलांटिकची फळी सु. ६,३८० किमी. लांब आहे. उत्तर अटलांटिकच्या मानाने येथे समुद्र पुष्कळच थंड व सतत खवळलेला असतो. अटलांटिकचा आकार सामान्यतः इंग्रजी एस् अक्षरासारखा असून लांबीच्या मानाने त्याची रुंदी कमी आहे. न्यू फाउंडलंड ते आयर्लंड येथे त्याची रुंदी सु. ३,३१४ किमी. असून ग्रीनलंड ते नॉर्वे ही रुंदी फक्त १,४९८ किमी. आहे. ब्राझीलचे केप सेंट रॉक ते आफ्रिकेचे केप पामास यांमधील अंतर सु. २,८४७ किमी. आहे. सर्वांत रुंद भाग फ्लॉरिडा व स्पेन यांमध्ये सु. ६,७०० किमी. व मेक्सिकोचे आखात धरून सु. ८,००० किमी. आहे. केप हॉर्न आणि दक्षिण शेटलंड बेटे यांमधील ड्रेक पॅसेज ही पॅसिफिकला जोडणारी सामुद्रधुनी सु. ८७१ किमी. रुंद आहे व रशियाचे अगदी पूर्वेकडील केप डेझनेव्ह आणि अमेरिकेचे अलास्कामधील अगदी पश्चिमेकडील केप प्रिन्स ऑफ वेल्स यांमधील बेरिंग सामुद्रधुनी फक्त सु. ९३ किमी. रुंद आहे. अटलांटिकमध्ये पाणी वाहून आणणाऱ्या प्रदेशाचे क्षेत्रफळ सु. ४३ कोटी २३ लक्ष चौ. किमी., पॅसिफिकच्या किंवा हिंदी महासागराच्या अशा क्षेत्राच्या चौपट आहे. जगातील बऱ्याच मोठमोठ्या नद्या याच महासागराला मिळतात. याचा पूर्व किनारा सु. ५१,५०० किमी. व पश्चिम किनारा सु. ८८,५०० किमी. आहे.

 

उत्तर अटलांटिकपेक्षा दक्षिण अटलांटिक मोठा असून त्यात उपसमुद्र नाहीत. बेटे थोडी आहेत. सेंट पॉल रॉक्स, फर्‌नँदो नरोन्या, असेन्शन, सेंट हेलीना, त्रिनिदाद, मार्टिन व्हास, ट्रिस्टन द कुना, गॉफ् व बूव्हे ही सागरी बेटे असून फरनँदो पो, साऊं टोमे, प्रिन्सिपे, आन्नबाँ, फॉकलंड, साउथ जॉर्जिया, साउथ सँडविच व साउथ ऑर्कनी ही खंडांशी संबद्ध आहेत. उत्तर अटलांटिकचे किनारे अधिक दंतुर व जटिल रचनेचे असून त्यांतील बेटे मोठी व पुष्कळ आहेत. फ्रान्झ जोझेफ, स्पिट्स्‌बर्गेन, बेअर आयलंड, यान मायेन, आइसलँड, फेअरो, अझोर्स, मादीरा, कानेरी, केप व्हर्द, न्यू फाउंडलंड, ब्रिटिश बेटे, वेस्ट इंडीज व बहामा ही त्यांतील काही बेटे आहेत. बर्म्यूडा ही जगातील सर्वांत अधिक उत्तरेकडील प्रवाळद्वीपे होत. ग्रीनलंड हा या संदर्भात उत्तर अमेरिकेचा भाग समजला जातो. अंटार्क्टिकाच्या भोवतीचे तिन्ही महासागरांचे पाणी सारख्याच वैशिष्ट्यांचे असल्यामुळे ४० द. च्या दक्षिणेचा अटलांटिकचा भाग दक्षिण महासागरात धरतात. किनाऱ्‍यांचा समांतरपणा, लांबट आकार, मध्यवर्ती डोंगराची रांग इ. गोष्टींवरून ðव्हेगेनरने आपल्या खंडविप्लव परिकल्पनेत अमेरिका खंड पश्चिमेकडे वाहत जाऊन हा महासागर इतरांपेक्षा कालदृष्ट्या अलीकडे तयार झाला असावा असे मत मांडले.

 

तळरचना: १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोप ते अमेरिका समुद्री तार टाकण्याच्या निमित्ताने अटलांटिकच्या तळरचनेचा अभ्यास सुरू झाला. त्यामुळेच त्या भागातील अटलांटिकच्या तळावरील सु. २,७५० ते ३,००० मी. खोलीवरील पठारी भागाला ‘टेलिग्राफ’ पठार असे नाव पडले.


अटलांटिक महासागर


सुरूवातीला जरी टेलिग्राफ पठाराप्रमाणेच बहुतेक सर्वत्र अटलांटिकचा तळ बराचसा सपाट असावा असे वाटले, तरी लवकरच अटलांटिकच्या मध्यावर दक्षिणोत्तर गेलेली एक सागरी डोंगरांची रांग आहे हे समजून आले. २० व्या शतकाच्या सुरूवातीस अंटार्क्टिक व आर्क्टिक विषयक झालेल्या संशोधनामुळे अटलांटिकच्या त्या बाजूंची काही माहिती उपलब्ध झाली. १९२५ नंतर नवीन शोधांमुळे लक्षावधी ठिकाणी खोली मोजून तळरचनेविषयी अचूक माहिती मिळू लागली. किनाऱ्‍याजवळील सु. ४,००० मी. खोलीपर्यंतच्या भागाची पाहणी झाली, तरी आर्क्टिक व दक्षिण अटलांटिकमधील मोठमोठ्या क्षेत्रांची पाहणी मात्र नीटशी होऊ शकली नाही.

 

अटलांटिकच्या जवळजवळ मध्यावर आइसलँडपासून बूव्हे बेटांपर्यंत गेलेली अटलांटिक रिज् ही सागरी डोंगरांची दक्षिणोत्तर रांग सु. ३,००० मी. खोलीवर बहुतेककरून सलग आहे. तिची रुंदी काही ठिकाणी ८०० किमी, पर्यंत आहे. अझोर्स, सेंट पॉल रॉक्स, असेन्शन, ट्रिस्टन द कुना व बूव्हे बेट हे रांगेचे पाण्याबाहेर असलेले भाग होत. विषुववृत्ताच्या थोडे उत्तरेस सु. ४,५०० मी. खोलीवर या रांगेचा रोमान्शे फरो नावाचा खोलगट भाग सागरविज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ३७ द. अक्षवृत्तावरील ट्रिस्टन द कुनापासून आफ्रिकेकडे २० द. अक्षवृत्तापर्यंत सु. ३,००० मी. खोलीवर वॉलफिश रिज् ही एक सागरी डोगरांची रांग गेलेली आहे. तिच्यामुळे अटलांटिक रिज्‌च्या पूर्वेकडील खोलगट भागाचे दोनभाग झाले आहेत. ३० द. ते ३५ द. भागात अटलांटिक रिज्‌पासून दक्षिण अमेरिकेपर्यंत गेलेली ‘रीओ ग्रँड रिज्’ सु. ४,००० मी. पेक्षा अधिक खोलीवर सलग आहे. अटलांटिक रिज्‌च्या दोन्ही बाजूंस सु. ४,००० ते ५,००० मी. खोलीचे अनेक खोलगट भाग आहेत. ग्रीनलंडपासून दक्षिणेस अझोर्स व बर्म्यूडा यांचे दरम्यान लहान दऱ्‍याखोरी आढळली आहेत. मिसिसिपीसारखी नदी व तिच्या उपनद्या यांची ही खोरी असावीत व त्यांवर समुद्राचे आक्रमण झाले असावे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. प्वेर्त रीकोच्या उत्तरेस सु. ९,२१९ मी. इतकी खोली आढळली असून ही या महासागराची सर्वांत जास्त खोली होय. दक्षिण सँडविच बेटांजवळ सु. ८,२६३ मी. खोली आढळून आली आहे. ग्रीनलंड ते स्कॉटलंडपर्यंत गेलेल्या सागरी डोंगररांगेने उत्तरध्रुवीय व नॉर्वेजियन खोलगट भाग खुल्या अटलांटिकपासून वेगळे केलेले आहेत. या रांगेवरच आइसलँड व फेअरो बेटे आहेत. ग्रीनलंड व आइसलँड यांमधील डेन्मार्कची सामुद्रधुनी व फेअरो ते स्कॉटलंडमधील टॉम्‌सन वायव्हिल डोंगररांग या ठिकाणी खोली ५०० मी. पेक्षा कमीच आहे. १९३७-३८ नंतर आर्क्टिकची खोली बऱ्‍याच ठिकाणी मोजण्यात आली. ‘लोमानीसॉव्ह रिज्’ ने या दीर्घवर्तुळाकार ध्रुवीय खोलगट विभागाचे दोन भाग झाले आहेत. या रांगेचा माथा सु. १,५०० मी. खोलीवर आहे. अलास्काच्या बाजूच्या मोठ्या भागाची खोली ४,००० मी.पर्यंत व दुसऱ्या भागाची सु. ५,००० मी. आहे. मोठ्या भागात सागरी डोंगराचे दोन फाटे असून ‘लोमानीसॉव्ह रिज्’ ला समांतर आणखी एक रिज् असावी असे दिसते. ग्रीनलंड-स्पिट्‌स्‌बर्गेन रांगेचा माथा १,५०० मी. खोलीवर आहे. नॉर्वेजियन खोलगट भागाची सरासरी खोली सु. ३,६५० मी. आहे.

 

कॅरिबियन व भूमध्य समुद्रात ४,००० मी. पर्यंत खोली आढळते. भूमध्य समुद्राचा मुख्य अटलांटिकशी संबंध सु. २० किमी. रुंदीच्या ðजिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून येतो. या सामुद्रधुनीत समुद्रतळावरील भिंतीचा माथा सु. ३०० मी. खोलीवर आहे. कॅरिबियनमध्ये मिलवॉकी डोहाशिवाय बार्लेट हा सु. ७,२३८ मी. खोलीचा डोह क्यूबाच्या दक्षिणेस आहे. उपसमुद्र सोडून अटलांटिकची सरासरी खोली सु. ३,९२५ मी. व ते धरून सु. ३,३५३ मी. आहे. पॅसिफिक किंवा हिंदी महासागरापेक्षा ही खोली कमी आहे. परंतु अटलांटिकमध्ये, विशेषतः उत्तर अटलांटिकमध्ये व आर्क्टिक महासागरात समुद्रबूड जमिनीचा भाग मोठा आहे. तो अटलांटिकच्या एकूण विस्ताराच्या सु. १३.३ % आहे. पॅसिफिक किंवा हिंदी महासागरात हा भाग याच्या १/२ किंवा १/३ इतका आहे.

 

तळावरील निक्षेप: उत्तरध्रुववृत्त व दक्षिणध्रुववृत्त यांच्या दरम्यानच्या अटलांटिकच्या बहुतेक सर्व तळभागावर ग्लॉबिजेरिना प्राण्याच्या बनलेल्या गाळाचा थर आहे. ५,००० मीटरपेक्षा जास्त खोलीवर गाळातील चुन्याचा अंश कमी होतो व चुनायुक्त निक्षेपाऐवजी तांबडी चिकणमाती दिसून येते. समुद्रांतर्गत डोंगरांवर टेरॉपॉड या मृदुकाय प्राण्याच्या अवशेषांपासून तयार झालेला गाळ आढळतो तर अगदी दक्षिणेकडे डायाटोम गाळ विशेष दिसून येतो. मात्र तो उत्तरेकडे आढळत नाही. उपसमुद्र धरून अटलांटिकच्या सु. ७३ %तळावर सागरी गाळ आढळतो. ग्लॉबिजेरिना व टेरॉपॉड गाळ ५०% भागावर, तांबडी चिकणमाती १९ % भागावर व डायाटोम गाळ ५% भागावर आहे. बाकीच्या २६% भागावर भूजन्य, भरड व खनिजयुक्त गाळ आहे. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्‍याजवळील भागात वाळवंटी प्रदेशावरून वाऱ्‍याने वाहून आणलेल्या पदार्थांचे थर आहेत. ध्रुवांकडील भागात बर्फाबरोबर आलेले डबर विशेषत्वाने दिसून येते. हिमनगांच्या भागात दगडगोटे व हिमनद्यांनी खरवडून काढलेले खडकांचे तुकडे यांचे थर तळावर साचलेले दिसतात. ब्राझीलच्या किनाऱ्‍याजवळ तांबूस, निळसर व हिरवट रंगांचा चिखल आढळतो. अग्निजन्य व प्रवाळ खडकांमुळे असे रंग येतात. अटलांटिकमधील सागरी गाळाचे थर दर हजार वर्षांत १ ते २ सेंमी. या वेगाने साचत गेले असावे.

 

वायुमान : उत्तर अटलांटिकमध्ये अझोर्सजवळचा उच्च वायुभारमानाचा व आझसलँडजवळचा नीचवायुभारमानाचा प्रदेश यांवर वारे अवलंबून असतात. अझोर्स उच्चभारमानाच्या प्रदेशाच्या विषुववृत्ताच्या बाजूने वारे ईशान्य किंवा पूर्व दिशेचे असतात यांना ‘ईशान्य व्यापारी वारे’ म्हणतात. अझोर्सचे उच्चवायुभारमान व आझसलँडचे नीचवायुभारमान यांमध्ये पश्चिमी वारे वाहतात. ते उन्हाळ्यात सौम्य व हिवाळ्यात जोरदार असतात. वायव्य यूरोपला पोचल्यावर ते आग्नेय दिशेचे होऊन यूरोपच्या त्या भागात उबदार व आर्द्र हवा देतात. आइसलँडच्या नीचवायुभारमानाच्या प्रदेशाच्या उत्तरेस ग्रीनलंडच्या पूर्वकिनाऱ्‍यावर व लॅब्रॅडॉर समुद्रात उत्तरेकडे वाहण्याची प्रंवृत्ती असलेले वारे अधिक वाहतात. आइसलँडजवळचा नीचवायुभारमानाचा प्रदेश विशेषतः हिवाळ्यात अधिक प्रभावी असतो खरा परंतु अझोर्सच्या उच्चवायुभारमानाच्या प्रदेशाइतका तो टिकाऊ नसतो. उत्तर अटलांटिकच्या मध्य अक्षवृत्तांजवळ सोम्य चक्रीवादळे (वातचक्रे) तयार होऊन ती पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतात. त्यांच्या पूर्वेस दक्षिणेकडून येणारे व पश्चिमेस उत्तरेकडून येणारे वारे असतात. यांतील काही वातचक्रे ईशान्येकडे व उत्तर नॉर्वेवरून जातात तर काही ब्रिटिश बेटे, नेदर्लंड्स व जर्मनी यांवरून जातात. उत्तर अटलांटिकच्या उष्णकटिबंधीय भागात पृष्ठभागावरील पाण्याचे तपमान त्यावरील हवेच्या तापमानापेक्षा वर्षभर किंचित अधिक असते. परंतु हा फरक सरासरी फक्त ०.८ से. इतकाच असतो. हिवाळ्यात पृष्ठपाणी व त्यालगतची हवा यांच्या तपमानातील हा फरक विशेषतः उष्णकटिबंधाबाहेर अधिक असतो व त्याचा संबंध वाऱ्‍यांच्या दिशेशी पोचतो. उत्तर ध्रुवाकडील अतिथंड हवा उत्तर अमेरिका खंडावरून अटलांटिकवर येते. उबदार पाण्यावरून जाताना तिचे तपमान झपाट्याने वाढते. तथापि किनाऱ्‍यापासून शेकडो किमी. अंतरापर्यंत पृष्ठपाणी व त्यावरील हवा यांच्या तपमानात ५ ते १० से. इतका फरक पडतो. थंड हवेत बाष्प कमी असल्यामुळे येथे बाष्पीभवन झपाट्याने होते. उलटपक्षी जेव्हा उबदार हवा थंड पाण्यावरून जाते तेव्हा बाष्पाचे सांद्रीभवन होऊन धुके पडते. यामुळेच न्यू फाउंडलंडवरील ग्रँड बँक्सवर वसंत ऋतूत व उन्हाळ्यात वारंवार धुके पडते.


 त्या वेळी दक्षिणेकडून येणाऱ्‍या वाऱ्‍यांबरोबरची उबदार हवा तेथील थंड पाण्यावरून जाते. जुलै ते सप्टेंबरपर्यंत हवा व पृष्ठपाणी यांच्या तपमानात फारसा फरक नसतो. दक्षिण अटलांटिकमध्ये २० ते ३० द. अक्षांशाच्या दरम्यान वायुभार अधिक असतो. तेथून विषुववृत्ताच्या बाजूला आग्नेय व्यापारी वारे वाहतात. आग्नेय व ईशान्य व्यापारी वाऱ्‍यांच्या दरम्यान विषववृत्ताजवळ शांतपट्टा असतो. हा निर्वात “डोल्ड्रम्स” चा पट्टा बहुधा २ उ. ते १० उ. यांच्या दरम्यान असतो. या पट्ट्यात वारा अगदी सौम्य परंतु पाऊस मात्र मुसळधार असतो. हा पट्टा दक्षिण अमेरिकेजवळ बहुधा नसतोच. तेथे दोन्ही व्यापारी वारे एकत्र येतात व ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्‍यावर जोराने वाहतात. दक्षिण अटलांटिकवर आइसलँडच्या नीचवायुभारमानाच्या प्रदेशासारखा भाग नाही. परंतु अंटार्क्टिकाभोवती कमी भारमानाचा पट्टा आहे. हा पट्टा व २० ते ३० द. यांच्या दरमान्यच्या अधिक वायुभारमानाचा प्रदेश यांच्या दरम्यान पश्चिमी वारे वाहतात. ते ३५ द. ते ४५ द. यांच्या दरम्यान जोराने गर्जना करीत वाहतात म्हणून या भागास व वाऱ्‍यांस ‘गरजणारे चाळीस’ हे नाव पडले आहे. नैऋत्य आफ्रिकेच्या बेंग्वेला किनाऱ्‍याजवळ धुके पडते, कारण किनाऱ्‍याकडे वाहणारे वारे उबदार असतात व तळचे पाणी वर येण्याच्या क्रियेमुळे किनाऱ्‍याजवळील पाणी थंड असते.

 

अटलांटिकमधील पृष्ठप्रवाह: उत्तर अटलांटिकमध्ये विषुववृत्ताजवळ सततच्या व्यापारी वाऱ्‍यांमुळे व प्रवाहाच्या उत्तरेस उबदार पाण्याचा साठा कायम राहिल्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे एक प्रवाह वाहतो. या प्रवाहाचे बहुतेक पाणी कॅरिबियन समुद्रातून, यूकातानच्या सामुद्रधुनीतून, मेक्सिकोच्या आखातात जाते तेथून ते एक गरम व जलद वाहणारा म्हणून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडते. त्यात अँटिलीसच्या पूर्वेकडून आलेल्या पाण्याची भर पडून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्‍याजवळून जाणारा ‘गल्फ स्ट्रीम’ तयार होतो. तो किनाऱ्‍याकिनाऱ्‍याने हाट्‌टेरास भूशिरापर्यंत जातो. तेथून तो अधिकाधिक पूर्वेला जाऊन ४० उत्तर अक्षांशांजवळ, न्यू फाउंडलंडच्या ग्रँड बँक्सच्या दक्षिणेस थेट पूर्वेकडे वाहू लागतो. यानंतर त्याचे एक स्पष्ट व जोरदार प्रवाह हे स्वरूप नाहीसे होऊन पृष्ठभागावरील उबदार पाणी उजवीकडे वळून सारगॅसो समुद्राभोवती मोठा भोवरा तयार करते. त्यापेक्षा काहीसे कमी उबदार पाणी उत्तर अटलांटिक प्रवाह म्हणून यूरोपकडे जाते. त्याची एक शाखा दक्षिणेकडे जाते. ती आफ्रिकेच्या वायव्य किनाऱ्याजवळून कानेरी प्रवाह म्हणून जाऊन उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते. आफ्रिकेच्या किनाऱ्‍यावर तपमान कमी असते कारण एकतर हा प्रवाह येथे उत्तरेकडून आल्यामुळे सापेक्षतः थंड असतो आणि तो किनाऱ्‍यापासून दूर गेल्यावर तेथे थंड तळपाणी वर येते. उत्तरेकडे गेलेल्या शाखेस आणखी उपशाखा फुटतात. त्यांपैकी एक ‘इर्मिजर प्रवाह’ या नावाने वायव्येकडे जाते. ती आइसलँडच्या आग्नेय किनाऱ्‍यावरून ग्रीनलंडच्या दक्षिण भूशिराजवळून पुढे जाते. तिचे पाणी हळूहळू कमी क्षारतेच्या ध्रुवीय पाण्यात मिसळते. तथापि गल्फ प्रवाहाचे अंश ६५ उ.पर्यंत ग्रीनलंडच्या पश्चिम किनाऱ्‍यावर आढळतात. उत्तर अटलांटिक प्रवाहाची दुसरी एक शाखा स्कॉटलंडच्या उत्तरेस नॉर्वेजियन समुद्रात जाते. एक छोटी शाखा दक्षिणेकडे उत्तर समुद्रात जाते परंतु मुख्य शाखा नॉर्वेच्या किनाऱ्‍याकिनाऱ्‍याने उत्तर भूशिरापर्यंत व तेथून स्पिट्‌स्‌बर्गेनपर्यंत जाते. तिच्या लहान उपशाखा बॅरेंट्‌स समुद्रात जातात. स्पिट्‌स्‌बर्गेनच्या उत्तरेस कमी क्षारतेच्या आर्क्टिक पाण्याखाली हा प्रवाह जातो व पुढे पृष्ठभागाखालून सरळ ध्रुवसमुद्राच्या पलीकडे जातो. न्यू सायबीरियन बेटांच्या उत्तरेस ० से. पेक्षा किंचित अधिक तपमानाचा गल्फ प्रवाहाचा हा अंश आढळतो. ध्रुवसमुद्राच्या पृष्ठथराचे तपमान वर्षभर गोठणबिंदूच्या आसपास (१.६ से.) असते. तथापि सायबीरियातील मोठ्या नद्यांच्या पाण्यामुळे त्याची क्षारता व त्यामुळे घनता कमी होते. हे कमी क्षारतेचे थंड पाणी ग्रीनलंडच्या पूर्व किनाऱ्‍याने ध्रुवसमुद्रातून बाहेर पडते व हळूहळू अटलांटिकच्या पाण्यात मिसळते. ते ग्रीनलंडच्या दक्षिणेकडील फेअरवेल भूशिराभोवती जाऊन ग्रीनलंडच्या पश्चिम किनाऱ्‍याने उत्तरेकडे जाते. परंतु पुन्हा परत फिरून बॅफिन उपसागरातून आणखी थंड पाणी घेऊन थंड लॅब्रॅडॉर प्रवाह म्हणून दक्षिणेकडे वाहते. न्यू फाउंडलंडच्या दक्षिणेकडील ग्रॅड बँक्सजवळ ते गल्फ प्रवाहाच्या उबदार पाण्यात मिसळते. हिवाळ्यात सु. ४.९%. क्षारतेच्या या पाण्याचे तपमान ३ से. पर्यंत उतरते व ते जड होऊन खाली जाऊन दक्षिणेकडे पसरते. दर सेकंदास सु. ४० लक्ष घमी. पाणी खाली जाते. आइसलँडच्या उत्तरेस हिवाळ्यात असेच तळपाणी तयार होते. त्याचे तपमान -१ से. असते. ते नॉर्वेजियन समुद्राचा खोलगट तळभाग भरून टाकते, परंतु स्कॉटलंड-आइसलँड-ग्रीनलंड सागरी डोंगरांगेमुळे ते पाणी खुल्या अटलांटिकमध्ये येऊ शकत नाही. उत्तर अटलांटिकच्या आग्नेयीस पृष्ठपाणी जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून भूमध्य समुद्रात जाते व भूमध्य समुद्राचे अधिक क्षारतेचे पाणी सामुद्रधुनीच्या तळावरून अटलांटिकमध्ये येऊन पसरते.

 

दक्षिण अटलांटिकमधील प्रवाह उत्तर अटलांटिकसारखेच आहेत. आग्नेय व्यापारी वाऱ्‍यांमुळे दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह सतत चालू राहतो. त्याचे पश्चिमेकडे गेल्यावर दोन फाटे होतात एक उत्तरेकडे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्‍याकिनाऱ्‍याने जाऊन उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाबरोबर कॅरिबियनमध्ये व तेथून मेक्सिकोच्या आखातात जाऊन पुढे गल्फ प्रवाहाचा भाग बनतो व दुसरा ब्राझील प्रवाह म्हणून दक्षिणेकडे जातो. मात्र तो गल्फ प्रवाहाइतका मोठा नाही. दोन्ही विषुववृत्तीय प्रवाहांच्या दरम्यान विषुववृत्तीय प्रतिप्रवाह वाहतो व तो घानाजवळ गिनीप्रवाह म्हणून ओळखला जातो. दक्षिण अटलांटिकमधील जास्त वायुभाराच्या प्रदेशाच्या दक्षिणेस ब्राझील प्रवाह पूर्वेकडे वळतो. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळून ते पाणी बेंग्वेला थंडप्रवाह म्हणून उत्तरेकडे विषुववृत्तीय प्रवाहाला जाऊन मिळते. बेंग्वेला प्रवाह हा उत्तरेकडील कानेरी प्रवाहापेक्षा जास्त प्रभावी आहे. किनाऱ्‍याजवळ तपमान कमी असते कारण तळपाणी वर येणे हे येथे अधिक प्रमाणात घडते. ब्राझील प्रवाहाच्या आणखी दक्षिणेस अंटार्क्टिकचा परिध्रुव प्रवाह ड्रेक पॅसेजमधून अटलांटिकमध्ये येतो. त्याची एक शाखा फॉकलंड प्रवाह अर्जेटिनाच्या पूर्व किनाऱ्‍याने जाते. ही उत्तर अटलांटिकमधील लॅब्रॅडॉर प्रवाहाप्रमाणेच आहे. अंटार्क्टिक परिध्रुव प्रवाहाची मुख्य शाखा पूर्वेस हिंदी महासागारात जाते व तिची एक शाखा वेडेल समुद्रात जाऊन तेथील घड्याळकाटादिशेच्या मोठ्या भोवऱ्‍यात समाविष्ट होते. अंटार्क्टिक परिध्रुव प्रवाह हा अटलांटिक, हिंदी व पॅसिफिक या तिन्ही महासागरांच्या दक्षिण भागात जमिनीचा अडथळा कोठेही न येता पश्चिमेकडून पूर्वेकडे अखंड वाहणारा प्रवाह आहे. त्याला ‘पश्चिमी वारे-प्रवाह’ असेही म्हणतात.

 

खोल समुद्रातील प्रवाह: आइसलँड व ग्रीनलंड यांच्या दरम्यानचे व लॅब्रॅडॉरच्या समुद्राचे पृष्ठपाणी खाली जाते व उत्तर अटलांटिकमधून हे खोलवरचे व अगदी तळचे पाणी मग दक्षिणेकडे पसरते. सु. ९०० ते २,००० मी. खोलीवर भूमध्य समुद्रातून येणारे पाणी पसरते. ते त्या पाण्याच्या तेथील सर्वाधिक क्षारतेमुळे ओळखता येते. भूमध्य समुद्रापासून दूरदूर जावे तसतसे इतर पाणी मिसळल्यामुळे त्याची क्षारता कमी होते तथापि ४०द. पर्यंतही भूमध्य समुद्राच्या पाण्याचे अंश आढळतात. अंटार्क्टिकमध्ये समुद्रबूड जमिनीपासून खाली गेलेल्या पाण्यामुळे -०.६ से. तपमानाचे व ३४.६५%. क्षारतेचे तळपाणी आढळते. कमी तपमानामुळे त्याचे गुरूत्व उत्तर अटलांटिकच्या खोल पाण्याच्या गुरुत्वापेक्षा अधिक असते. हे पाणी उत्तरेकडे वाहत जाते व ४०उ.पर्यंत तळपाणी म्हणून आढळू शकते. अंटार्क्टिक कॉन्व्हर्जन्सजवळ सु. ५०द. जवळ पृष्ठपाणी खाली जाते व ते कमी क्षारतेचे म्हणून उत्तरेकडे पसरते. हे अंटार्क्टिकचे मध्यपाणी विषुववृत्त ओलांडून २० उ. पर्यंत आढळते.


अंटार्क्टिकचे पुष्कळसे तळपाणी व मध्यपाणी उत्तर अटलांटिकच्या खोल पाण्यात मिसळून दक्षिणेकडे पसरते व ५० द. ते ६०द. यांच्या दरम्यान पृष्ठभागावर येते. त्याबरोबर वनस्पतींना पोषक अशी फॉस्फेटे व नायट्रेटे पृष्ठावर येतात. त्यामुळे अंटार्क्टिकच्या पाण्याच्या उच्च उत्पादकतेचा उलगडा होतो. अटलांटिकच्या तळच्या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ऑक्सिजनचे अधिक प्रमाण. पृष्ठभागावर हवेशी संपर्क होऊन ते पाणी ऑक्सिजनसंपृक्त होते व मग खाली जाते.

 

तपमान : पृष्ठपाण्याचे तपमान प्रवाहांच्या स्वरूपाशी संबद्ध असते. उत्तर व दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहांचे पाणी अमेरिकांच्या पूर्व किनाऱ्‍यावर पोचले म्हणजे ते उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाते. यामुळे अमेरिकांच्या किनाऱ्‍याजवळ उबदार पाण्याचा बराच रुंद पट्टा आढळतो. परंतु आफ्रिकेच्या किनाऱ्‍याजवळ कानेरी व बेंग्वेला हे थंड प्रवाह आल्यावर तेथे कमी तपमानांचा एक अरुंद पट्टा दिसतो. यामुळे १० उ. ते ३०उ व १०द. ते ३० द. या भागांत खंडांच्या पूर्व किनाऱ्‍याजवळील समुद्रपृष्ठाचे पाणी पश्चिम किनाऱ्‍याजवळील पाण्यापेक्षा उबदार असते. परंतु ३० च्या ध्रुवांकडील बाजूस याच्या उलट पश्चिम किनाऱ्यांजवळ उबदार व पूर्व किनाऱ्याजवळ थंड पाणी आढळते. दक्षिण अमेरिकेबाबत ही गोष्ट विशेष दिसत नाही. कारण फॉकलंड प्रवाहाचे थंड पाणी उत्तरेकडे ३०द. पर्यंत येते. उत्तर अटालांटिकमध्ये मात्र लॅब्रॅडॉर प्रवाहाचे पाणी ४० उ. अक्षांशापर्यंत येते आणि गल्फ प्रवाह व त्याच्या शाखा नॉर्वेच्या किनाऱ्‍यापर्यंतही उबदार पाणी पोचवितात. तेथे ७१ उ. पर्यंतही बंदरे बर्फमुक्त राहतात. लॅब्रॅडॉरगल्फ व ब्राझील-फॉकलंड प्रवाह जेथे मिळतात तेथे पृष्ठपाण्याचे तपमान थोड्याच अंतरावर बदलते. हा बदल गल्फ प्रवाहाकडून लॅब्रॅडॉर प्रवाहाकडे जाताना विशेष जाणवतो. तेथे जणू काही थंड पाण्याची भिंत ओलांडून जावे लागते. उष्ण कटिबंधाच्या बाहेर पृष्ठभागाचे तपमान बरेचसे पृष्ठप्रवाहावर अवलंबून असते आणि प्रवाह, वारे व किनाऱ्याची रचना यांवर अवलंबून असतात. उष्ण कटिबंधात पृष्ठपाण्याचे तपमान वायुमानावर अवलंबून असते व ते सगळीकडे सारखेच असते. तेथे प्रवाहामुळे होणारे तपमानातील फरक दिसून येत नाहीत. परंतु सु. २०० मी. खोलीवर तपमानातील हे फरक स्पष्टपणे दिसून येतात. तेथे ६-७ उ. अक्षांशात तपमान १०से. तर २० उ. अक्षांशात ते २० से. आढळते. विषुववृत्ताच्या उत्तरेस उथळ भागात तपमान कमी आढळते ते तळपाणी पृष्ठभागावर आल्यामुळे नव्हे विषुववृत्तीय प्रवाहांमुळेच हे तपमानवितरण होते. या प्रवाहात पाणी पश्चिमेकडे जात असते आणि गरम पाणी उत्तर गोलार्धात उजवीकडे व व दक्षिण गोलार्धात डावीकडे असते. उत्तर अटलांटिकमध्ये तळाकडे जाताना ९०० मी. वरील ५ से. पासून तळावरील २.५ से. पर्यंत तपमान हळूहळू कमी होत जाते. दक्षिण अटलांटिकमध्ये ९०० ते १,२०० मी. च्या दरम्यान ४० द. अक्षांशांपर्यंत तपमान प्रथम सर्वांत कमी होते व सु. १,८५० मी. खोलीवर जास्तीत जास्त ते २ से. ते ४ से. होते. यावरून उत्तर अटलांटिकमधील खोल पाणी वाहते आहे असे दिसून येते. नंतर तळाशी तपमान १ से. च्याही खाली जाते. तेथे अंटार्क्टिकच्या तळपाण्याची गाठ पडते. ४० दक्षिणेस ३ से. च्या खालील तपमान आढळते. अंटार्क्टिकाजवळ पाण्याच्या मोठ्या भागाचे तपमान ० से. पेक्षा कमी असते.

 

क्षारता: उत्तर अटलांटिकच्या पृष्ठपाण्याची क्षारता दुसऱ्‍या कोणत्याही महासागराच्या पृष्ठपाण्याच्या क्षारतेपेक्षा अधिक आहे. २०ते ३० उ. अक्षांशात ती ३७%. होते. क्षारतेचाही संबंध प्रवाहाशी असतो परंतु बाष्पीभवन व वृष्टी यांवर ती विशेषतः अवलंबून असते. विषुववृत्ताजवळ पृष्ठाक्षारता ३५%. असते, तेथे वृष्ठी अधिक असते. २० उ. ते २५ उ. व २० द. येथे वृष्टीपेक्षा बाष्पीभवन जास्त असते व पृष्ठक्षारता ३७ %. पेक्षा जास्त होते. तेथून ध्रुवाकडे जाताना पुन्हा बाष्पीभवनापेक्षा वृष्टीचे प्रमाण अधिक असते व पृष्ठक्षारता ३४%. पेक्षा कमी होते. यावर प्रवाहांचाही परिणाम होतो. तो उत्तर अटलांटिकमध्ये विशेष दिसून येतो. तेथे ३५%. पेक्षा जास्त क्षारतेचे पाणी ७८ उ. अक्षांशात स्पिट्सबरर्गेनपर्यंत जाते. आर्क्टिकमधील ३४%. पेक्षा कमी क्षारतेचे पाणी ४५ उ. पर्यंत न्यू फाउंडलंडपर्यंत येते. ४० उ. च्या उत्तरेस समक्षाररेषा दक्षिणोत्तर जातात तर दक्षिणेस त्या पूर्वपश्चिम जातात. उपसमुद्रातील क्षारता नद्यांनी आणलेल्या पाण्यावरही अवलंबून असते. भूमध्य समुद्रात नद्यांचे पाणी कमी व बाष्पीभवन जास्त म्हणून क्षारता जास्त असते तर काळा समुद्र व बाल्टिक समुद्र येथे मोठमोठ्या नद्या येऊन मिळत असल्यामुळे क्षारता कमी असते. स्वीडन व फिनलंड यांच्या दरम्यान बॉथनियाच्या आखाताच्या आतील बाजूस पाणी जवळ जवळ गोडेच (क्षारता २%.) असते. ध्रुवीय समुद्रात सायबीरियाच्या मोठमोठ्या नद्यांच्या पाण्यामुळे पृष्ठक्षारता ३० ते ३३%. इतकीच असते.

 

बर्फ : हिवाळ्यात बहुतेक सर्व ध्रुवीय समुद्र सागरी बर्फाने आच्छादलेला असतो. वाऱ्‍याच्या जोराने बर्फाचे थर भंग पावून त्यांचे लांबट रांगेमध्ये ढीग बनतात. उन्हाळ्यात जून ते ऑगस्ट हवेचे तपमान ० से. होते. तेव्हा पाण्याचे विभाग पुष्कळ दिसतात. उन्हाळ्यात सु. एक मी. जाडीचे बर्फ वितळते. परंतु नंतरच्या हिवाळ्यात बर्फाची जाडी ३ मी. पर्यंत झालेली असते. जेथे बाजूने दाब पडून सामान्य पातळीच्या वर ५ मी. पर्यंतच्या उंचीच्या बर्फाच्या रांगा तयार झालेल्या असतात, तेथे त्या रांगांखाली बर्फाची जाडी २० मी. पर्यंतही असते. ध्रुवसमुद्राच्या मध्याभोवती वाऱ्‍याबरोबर हिमखंड घड्याळकाट्याच्या दिशेने फिरत असणे शक्य आहे. ह्या भोवऱ्‍यापासून एक शाखा दक्षिणेकडे ग्रीनलंडच्या पूर्व किनाऱ्‍याकडे येते व तिच्या बरोबर मोठेमोठे हिमखंड वाहून येतात. या प्रवाहाचे अस्तित्व प्रथम फ्रित्यॉफ नान्सेन याने १८९३-९६ मध्ये दाखवून दिले. त्यानंतर मे १९३७ मध्ये ध्रुवाजवळ विमानाने उतरलेल्या रशियन पथकाची व रशियन जहाजांची सुटका फेब्रुवारी १९३८ मध्ये ग्रीनलंडच्या पूर्व किनाऱ्‍याजवळ केली गेली, त्यावरूनही ते दिसून आले. उत्तर अटलांटिकचे हिमनग ग्रीनलंडच्या हिमनद्यांतून सुटतात, ध्रुवसमुद्रात फ्रित्यॉफ नान्सेनलँडजवळ व स्पिट्‌स्‌बर्गेनजवळ हिमनग आढळतात. सु. ६० मी. जाडीची व २८-२९ किमी. लांबीची बर्फाची बेटे उत्तर एल्झमीअर बेटाजवळ तयार होतात. आर्क्टिक व कॅनेडियन द्वीपसमूहांत अशी पुष्कळ बेटे दिसून येतात. पूर्व ग्रीनलंडचे हिमनग प्रवाहाबरोबर दक्षिणेकडे जातात व मग ग्रीनलंडच्या पश्चिम किनाऱ्‍याने पुन्हा उत्तरेकडे जाऊ लागतात. तेथे आणखी हिमनगांची भर पडते व मग ते लॅब्रॅडॉरच्या किनाऱ्‍याने दक्षिणेकडे येतात. न्यू फाउंडलंडच्या ग्रँड बँक्सजवळ ते मे-जूनमध्ये ४२-४३ उ. पर्यंत येतात व नौकानयनास त्यांच्यामुळे मोठा धोका उत्पन्न होतो. १९१२ मधील ‘टायटॅनिक’ बोटीच्या अपघातानंतर हिमनगांवर लक्ष ठेवून त्यांची पूर्वसूचना देण्यासाठी एक आंतराष्ट्रीय पहारापथक सुरू केले आहे.

 

अंटार्क्टिकाभोवती जाड व मोठ्या हिमखंडांचे वलयच आहे. ते ऑक्टोबरमध्ये अटलांटिकमध्ये ५५ द. पर्यंत येते. दक्षिणेकडील उन्हाळ्याच्या शेवटी मार्चमध्ये वेडेल समुद्राचे पूर्व व पश्चिम भाग पुष्कळदा बर्फमुक्त असतात. परंतु तो समुद्र मात्र घड्याळकाट्याच्या दिशेने फिरणाऱ्‍या मोठ्या हिमखंडांनी भरून जातो. अंटार्क्टिक बर्फथरांपासून हिमनग सुटून पूर्वेकडे व उत्तरेकडे जातात. सपाट माथ्याचे सु. १०० किमी. लांबीचे हिमनग आढळलेले आहेत. तसेच १५ ते ३० किमी. लांबीचे व ९० मी. पर्यंत उंचीचेही हिमनग आढळले आहेत. येथील हिमनगांची उत्तरेकडील सरासरी सीमा ४२ द. पर्यंत असते.

 

अटलांटिकचा शोध : ख्रिस्तपूर्व ८०० पासून फिनिशियन व्यापारी अटलांटिकवरून संचार करीत होते. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून पलीकडे जाऊन त्यांनी स्पेन व मोरोक्को यांच्या किनाऱ्‍यावर व्यापार सुरू केला. त्यानंतर २०० वर्षांनी ईजिप्शियन प्रवासी तांबड्या समुद्रातून दक्षिणेकडे  जाऊन आफ्रिकेला वळसा घालून अटलांटिकमध्ये आले होते.


 त्यानंतर दोन हजार वर्ष त्या मार्गाने कोणीही गेले नाही. इ.स.पू. ३०० मध्ये फिनिशियन व्यापारी स्कँडिनेव्हियापर्यंत गेलेले होते. ब्रिटिश बेटांवरील त्या वेळच्या लोकांशी त्यांचा कथिलाचा व्यापार होता. ग्रीक साहित्यावरून प्राचीन खलाशी सारगॅसो समुद्रापर्यंत गेले होते असे दिसते. ८०० मध्ये व्हायकिंग्ज उत्तरेकडे जाऊ लागले. त्यांच्या आधी आयरिश धर्मगुरू फेअरो बेटास ७५० मध्ये व कदाचित ७९० मध्ये आइसलँडलाही पोचले असावेत, नॉर्समेन ८५० मध्ये नॉर्थ केपला, ८६५ मध्ये आइसलँडमध्ये, ९८२ मध्ये ग्रीनलंडला व नंतर अमेरिकेला गेले. १००१ मध्ये लेव्ह एरिकसन अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्‍यावर उतरला. त्याच्यानंतर इतरांनी न्यू फाउंडलंड, हडसन हे भाग पाहिले.आइसलँडिक सागा मध्ये वरील समन्वेषणांची माहिती मिळते. नॉर्समेननंतर यूरोपच्या दक्षिणेकडून अटलांटिकवरील संचार पुन्हा सुरू झाला. आता जहाजांना दुसरी डोलकाठी आणि अचल सुकाणू यांची जोड मिळाली होती. कानेरी १२५० मध्ये, मादीरा १३५०, अझोस १४२७, केप व्हर्द १४४१ किंवा १४५६ मध्ये ज्ञात झाली. १४८७ मध्ये पोर्तुगीज खलाशी बार्थोलोम्यू डीअश याने आफ्रिकेच्या किनाऱ्‍याचा शोध लावून केप ऑफ गुड होपलाही वळसा घातला होता. याच मार्गाने १४९८ मध्ये वास्को द गामा याने हिदुस्थानला जाण्याचा जलमार्ग शोधून काढला. विषुववृत्तीय प्रवाहाच्या व आग्नेय व्यापारी वाऱ्‍याच्या जोराने १५०० मध्ये काब्राल ब्राझीलला पोचला. त्याआधी कोलंबसने १४९२ मध्ये मुद्दाम पश्चिमेकडे प्रवास केला होता. परंतु तो वेस्ट इंडीजमध्ये उतरला. १४९७ मध्ये कॅबट हा प्रत्यक्ष अमेरिका खंडावर नोव्हास्कोशाजवळ उतरला. त्यानंतर अमेरिकेच्या किनाऱ्‍याचा शोध झपाट्याने लागला. १४९८ मध्ये कॅबट बहुधा चेसापीक उपसागरापर्यंत गेला असावा. १५०२ पर्यंत व्हेसपूची, काब्राल व कोलंबस यांनी यूकातान ते रीओ दे जानेरोपर्यंतचा किनारा शोधला. १५२० मध्ये मॅगेलन दक्षिण अमेरिकेस वळसा घालून पॅसिफिकमध्ये गेला. तो ज्या सामुद्रधुनीतून गेला तिला त्याचेच नाव दिले गेले. स्पॅनियर्डस्‌नी मेक्सिकोचे आखात शोधले होते. आलामीनोसला ईशान्य व्यापारी वाऱ्‍यांविरूद्ध नेणारा फ्लॉरिडा प्रवाह सापडला होता. १५३४ ते ४४ पर्यंत सेंट लॉरेन्सचे आखात आणि ‘नॉर्थ वेस्ट पॅसेज’ च्या शोधात १५७६ ते १६११ पर्यंत कॅनडाचा उत्तर किनारा माहीत झाला होता. अगदी दक्षिणेकडील सोडून सर्व सागरी बेटे १५०६ पर्यंत माहीत झालेली होती.

 

महासागरांचे संपूर्ण ज्ञान अलीकडचे व तुटक आहे. तथापि अटलांटिकविषयी सर्वांत अधिक माहिती मिळालेली आहे. १६५० च्या सुमारास सागरी घडामोडींविषयी शास्त्रीय संशोधन सुरू झाले. १६७८ मध्ये प्रवाहाचा पहिला नकाशा आटानाझिडस किर्खरने तयार केला. १६८८ मध्ये एडमंड हॅलीने अटलांटिकच्या वाऱ्‍यांचा पहिला नकाशा तयार केला. सागरी समोच्चरेषांच्या साह्याने फिलिप बॉशेने १७३७ मध्ये इंग्लिश खाडीचा खोलीदर्शक नकाशा तयार केला. १७७० मध्ये बेंजामिन फ्रँक्‌लिनने गल्फ प्रवाहचा नकाशा तयार केला. १८५५ मध्ये सागराचा प्राकृतिक भूगोल वर्णन करून अमेरिकन शास्त्रज्ञ मॉरी याने महासागरविज्ञानाची स्थापना केली. त्यात त्याने उत्तर अटलांटिकचा पहिला खोलीदर्शक नकाशा, त्याचे वारे व प्रवाह यांचे नकाशे व नौकानयन-सूचना देऊन १८४९ ते १८६० या काळात या विषयाची लोकप्रियता वाढविली अाणि तो सुप्रतिष्ठित केला. त्यानंतर ब्रिटिश, जर्मन, अमेरिकन इ. अनेक पाहण्या झाल्या. परंतु १८६७ च्या समुद्रीतार घालण्याच्या प्रकल्पामुळे अधिक चांगली माहिती मिळाली. ब्रिटिश, जर्मन, नॉर्वेजियन मोहिमा व आंतरराष्ट्रीय हिमपहारा यांनीही महत्वाची कामगिरी केली. १९५७-५८ मधील आंतरराष्ट्रीय भूभौतिक वर्षामध्ये अटलांटिकचे समन्वेषण करून नकाशे व माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

अटलांटिकमधील बहुतेक सर्व प्राणिजीवन किनाऱ्‍याजवळील उथळ भागांतच केंद्रित झाले आहे. सारगॅसो समुद्रासारखे काही भाग सोडले तर खोल भागात प्राणी बहुधा नाहीतच. न्यू फाउंडलंडजवळचे ग्रँड बँक्स, अमेरिकेच्या किनाऱ्याजवळचे जॉर्ज बँक्स,उत्तर समुद्रातील डॉगर बँक्स या ठिकाणी कॉड, हॅलिबट, हेरिंग व इतर अनेक प्रकारचे मासे भरपूर सापडतात. भूमध्य समुद्रात व फ्लॉरिडाजवळ स्पंज मिळतात.

 

मानवीदृष्टीनेमहत्व: मानवी इतिहासात या महासागराचे स्थान मोठे आहे. मन्रो सिद्धांत, अटलांटिक सनद इ. राजकीय घडामोडींशी त्याचा संबंध आहे, परंतु त्यापेक्षा यूरोप व अमेरिका यांमधील व्यापारी उलाढालींच्या दृष्टीने तो अधिकच महत्त्वाचा आहे. पूर्वी सागरी मार्ग वाऱ्‍यांच्या अनुरोधाने ठरत. हिंदुस्थानकडे येण्याचा मार्ग मादीरा, कानेरी, कदाचित रीओ दे जानेरो, ट्रिस्टन द कुना यांवरून असे आणि परतीच्या वेळी सेंट हेलीना, असेन्शन, अझोर्स यांवरून तो जाई. यामुळे पुष्कळदा मादीराहून ब्रिटनला जावयाची दारू हिदुस्थानमार्गे जात असे. केप ऑफ गुड होपशिवाय इतर ठिकाणाहून पोचणे दुरापास्त म्हणून नेपोलियनला सेंट हेलीना बेटावर ठेवले होते. जहाजे खंडांच्या जवळचा धोक्याचा मार्ग टाळीत. परंतु पुरवठ्याच्या दृष्टीने काही सागरी बेटे महत्त्वाची असत. आता त्यांचे महत्व गेले आहे. १८३८ नंतर उत्तर अटलांटिकवर आगबोटी येऊ लागल्या. तेव्हा जलद जाणारी शिडांची ‘क्लिपर्स’ त्यांच्याशी स्पर्धा करीत. कॅबटला अटलांटिक ओलांडण्यास ५४ दिवस लागले. क्लिपर्स इंग्लंडच्या नैऋत्य किनाऱ्‍यावरील लिझर्डपासून न्यूयॉर्कपर्यंतचा प्रवास ४० दिवसांत करीत. पुढे लांबच्या मार्गांऐवजी बृहद्‌वृत्तीय मार्ग अस्तित्वात आले वेग व निर्भयता वाढली. आधुनिक आगबोट ताशी २० नॉट्‌च्या वेगाने फक्त ६ दिवसांत अटलांटिक ओलांडते. आता यूरोप ते अमेरिका एकच आधुनिक जलमार्ग असा आहे, की न्यू फाउंडलंडच्या दक्षिणेचे धुके व हिमनग यांचा धोका टाळण्यासाठी बृहद्‌वृत्त-मार्गापासून ऋतुपरत्वे सु. ८४ ते ३२० किमी. बाजूने जावे लागते. ð सुएझ वðपनामा या कालव्यांमुळे एक महत्वाचा जलमार्ग म्हणून दक्षिण अटलांटिकचे असलेले महत्त्व कमी झाले. त्यातील बेटे अधिकच एकाकी पडली. उलट कॅरिबियन व भूमध्य समुद्रांचे महत्व वाढले आहे. जगातील एकूण सागरी वाहतुकीपैकी २/३ अटलांटिकवरून व १/४ उत्तर अटलांटिकवरून होत असावी असा अंदाज आहे. तळांसाठी सोयीची बेटे नसल्यामुळे अटलांटिक ओलांडून जाणारे हवाई मार्ग पॅसिफिकपेक्षा उशिरा सुरू झाले व अडचणी अधिक आल्या. दुसऱ्‍या महायुद्धापूर्वी आयर्लंड-न्यू फाउंडलंड मार्गाने नियमित हवाई वाहतूक सुरू झाली. युद्धानंतर याबाबत वेगाने प्रगती झाली. १९५० मध्ये बहुतेक विमानोड्डाणे आयर्लंड-न्यू फाउंडलंड मार्गे झाली. लांब टप्प्यांच्या उड्डाणांमुळे मधला टप्पा म्हणून असलेल बेटांचे महत्व कमी झाले. आता विमानाने काय किंवा आगबोटीने काय, अटलांटिक ओलांडून जाणे ही एक सामान्य बाब झाली आहे. तरीही अटलांटिकचा सर्वच्या सर्व भाग संपूर्णपणे संशोधित झाला आहे असे अजूनही म्हणता येत नाही [→महासागर व महासागर विज्ञान].

 

संदर्भ : Sverdrup H. U. Johnson, M. W. Fleming, R. H. The Oceans, Their physics, Chemistry and General Biology, Bombay, 1961.

कुमठेकर, ज. ब.