आंतरराष्ट्रीय व्यापार-दर : एखाद्या देशाच्या निर्यातीचे आयातीशी असलेले प्रमाण. आंतरराष्ट्रीय व्यापार एखाद्या देशास अनुकूल आहे की नाही, हे आंतरराष्ट्रीय व्यापार-दर पाहून समजते. निर्यातीच्या तुलनेने आयातीची किंमत वाढली, तर व्यापार-दर त्या देशाला प्रतिकूल निर्यातीचे प्रमाण कायम ठेवून एखाद्या देशास अधिक आयात करता आली, तर व्यापार-दर त्या देशाला अनुकूल, असे म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी व पुरवठा यांवर म्हणजे ‘परस्पर मागणी’ वर व्यापार-दर अवलंबून असतो. व्यापार-दर ठरविताना एखाद्या देशाची आयातविषयक मागणी व त्या देशाच्या निर्यातीस बाहेरील देशांची मागणी यांची लवचिकता, त्याचप्रमाणे त्या देशाचा निर्यात-पुरवठा व बाहेरील देशांकडून होणार आयात-पुरवठा यांची लवचिकता, या बाबी विचारात घ्याव्या लागतात. आंतरराष्ट्रीय देवघेवींपासून होणारा लाभ परिस्थितीप्रमाणे बदलत असतो. निर्देशांकांचा वापर करून हा बदलता कल मोजता येतो. वेगवेगळे निर्देशांक वापरल्यामुळे व्यापार-दराचेही निरनिराळे प्रकार संभवतात. त्यांतच निव्वळ व्यापार-दर, स्थूल व्यापार-दर, एकघटकीय व द्विघटकीय व्यापार-दर आणि उत्पन्न-व्यापार-दर या प्रकारांचा समावेश होतो.

एखाद्या राष्ट्राचा १९७० सालाचा वस्तु-अधिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यापार-दर काढावयाचा असल्यास, कोणतेतरी एखादे त्यापूर्वीचे वर्ष पाया कल्पून, त्या राष्ट्राने १९७० मध्ये निर्यात केलेल्या वस्तूंच्या किंमतींच्या निर्देशांकाशी, त्याने त्याच वर्षी आयात केलेल्या वस्तूंच्या किंमतींच्या निर्देशांकाचे प्रमाण शेकडेवारीत काढावे लागते. उदा., निर्यात-किंमतीचा १९७० चा निर्देशांक ‘न’ असेल व आयातकिंमतीचा ‘आ’ असेल, तर त्या वर्षी वस्तु-अधिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यापार-दर ( /X१००) येईल. यालाच टाउसिग या अर्थशास्त्रज्ञाने ‘निव्वळ वस्तु-विनिमय-आंतरराष्ट्रीय-व्यापार-दर’ असे म्हटले आहे. आयात वस्तूंचे एकूण परिमाण दर्शविणाऱ्या निर्देशांकास, निर्यात वस्तूंचे एकूण परिमाण दाखविणाऱ्या निर्देशाकाने भागले व येणारे प्रमाण शेकडेवारीत मांडले तर जो दर येतो, त्याला टाउसिगने ‘स्थूल वस्तु-विनिमय-आंतरराष्ट्रीय-व्यापार-दर’ ही संज्ञा दिली आहे. काही वेळा व्यापार-दर काढताना उत्पादनासाठी वापरलेल्या घटकांच्या उत्पादनक्षमतेवर लक्ष केंद्रित करावे लागते. निर्यातवस्तुनिर्मितीसाठी वापरलेल्या घटकांच्या प्रत्येक परिमाणांच्या उत्पादनक्षमतेमुळे किती आयात करता आली, हे दर्शविणारा व्यापार-दर काढता येतो. वस्तुनिष्ठ आंतरराष्ट्रीय व्यापार-दराला निर्यातनिर्मितीच्या उत्पादनक्षमतेतील फरक दर्शविणाऱ्या निर्देशांकाने गुणून हा व्यापार-दर काढता येतो. अशा व्यापार-दरास ‘एकघटकीय आंतरराष्ट्रीय व्यापार-दर’ असे म्हणतात. जर एकाऐवजी दोन्ही देशांतील घटकांच्या उत्पादनक्षमतेतील फरक विचारात घेऊन व्यापार-दराचे प्रमाण काढले, आणि आपल्या देशातील घटकसेवेच्या प्रत्येक परिमाणाच्या मोबदल्यात विदेशीय घटकसेवेची किती परिमाणे मिळू शकतात हे दाखविणारा व्यापार-दर काढला, तर त्याला ‘द्विघटकीय आंतरराष्ट्रीय व्यापार-दर’ असे म्हणतात. वस्तुनिष्ठ आंतरराष्ट्रीय व्यापार-दराला निर्यातपरिमाणातील बदल दर्शविणाऱ्या निर्देशांकाने गुणले, म्हणजे जो व्यापार-दर येतो, त्याला ‘उत्पन्न-व्यापार-दर’ असे नाव आहे.

एखाद्या राष्ट्राची निर्यात वाढली व इतर काही बदल झाले नाहीत, तर परिणामत: त्याचे राष्ट्रीय उत्पन्न वाढते. राष्ट्रीय उत्पन्नात होणारी ही वाढ सुरुवातीच्या निर्यातवाढीच्या कितीपट आहे, हे दाखविणाऱ्या गुणकास ‘विदेशव्यापारगुणक’ असे म्हणतात. ज्या प्रमाणात सीमांत बचत-प्रवृत्ती व सीमांत आयात-प्रवृत्ती कमी, त्या प्रमाणात निर्यातवाढीमुळे होणाऱ्या जादा उत्पन्नाचा अधिकतर भाग स्वदेशी उपभोग्य वस्तूंची खरेदी करण्यासाठी वापरला जाऊन राष्ट्रीय उत्पन्नात आणखी भर पडेल. अर्थात ज्या देशांतून अधिक वस्तू आयात होतील, त्यांचेही राष्ट्रीय उत्पन्न वाढेल. ते किती वाढेल, हे दर्शविणारा त्याचा निराळा विदेश-व्यापारगुणक काढावा लागेल.

कच्चा माल व अन्नधान्ये निर्यात करून, पक्का माल आयात करणाऱ्या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय व्यापार-दर प्रतिकूल असतात की नाहीत, आणि अर्धविकसित राष्ट्रे व विकसित राष्ट्रे यांच्यातील व्यापार-दर अर्धविकसित राष्ट्रांना प्रतिकूलच असतात का, या प्रश्नांवर अर्थशास्त्रज्ञांनी बरेच वाद केले आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय व्यापार-दराचा राष्ट्राच्या कल्याणावर काय व किती परिणाम होतो, हे मोजण्याचेही प्रयत्न संशोधकांनी केले आहेत. व्यापार-दर अनुकूल आहे की प्रतिकूल, यावरून देशाला फायदा होत आहे की तोटा, हे निश्चितपणे ठरविणे कठीण. आयातीची किंमत स्थिर राहिली व उत्पादनखर्च वाढल्यामुळे निर्यातीची किंमत वाढली, म्हणून हा झालेला अनुकूल व्यापार-दर परिणामी त्या देशास हितावह आहे, असे म्हणता येणार नाही. उलटपक्षी, तांत्रिक प्रगतीमुळे उत्पादन-खर्चात घट होऊन निर्यातीची किंमत कमी झाल्यास, व्यापार-दर त्या देशाला प्रतिकूल होऊनही, उत्पादनक्षमता वाढल्याने त्या देशातील राष्ट्रीय उत्पादन व जीवनमान निश्चितपणे सुधारते. हे प्रश्न बऱ्याच गुंतागुंतीचे आहेत व त्यांचे विश्लेषण करताना बऱ्याच तात्त्विक स्वरूपाच्या आणि सांख्यिकीय अडचणी उद्भवतात.

पहा : खुला व्यापार राज्यव्यापार व्यापारसंरक्षण व्यापारी करार सामायिक बाजारपेठा.

संदर्भ : 1. Harris, S. E. International and Interregional Economics, New York, 1957.

           2. Kindleberger, C. P. International Economics, Homewood, 1963.

           3. Meade, J. E. The Theory of International Economic Policy, London, 1960.

          4. Mundell, R. A. International  Economics, New York, 1968.

          5. Ohlin, Bertil, Interregional and International Trade, Cambridge, 1957.

          6. Viner, Jacob, Studies in The Theory of International Trade, New York, 1937.

          7. Young J. P. The International Economy, New York, 1963.

धोंगडे, ए.रा.