ॲलाबॅमा : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी आग्नेयीकडील मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावरील एक राज्य. उ. अक्षांश ३०१३’ ते ३५ आणि प. रेखांश ८४५१’ ते ८८२८’. क्षेत्रफळ १,३३,६४७ चौ.किमी., लोकसंख्या ३४,४४,१६५ (१९७०). झाडेझुडपे काढून जमीन साफ करणारे ‘ॲलाबॅमा’ रेड इंडियन येथे राहत म्हणून या वसाहतीला गोऱ्या लोकांनी ‘ॲलाबॅमा’ हे नाव दिले. ॲलाबॅमाच्या दक्षिणेला मेक्सिकोचे आखात व फ्लॉरिडा राज्य असून पश्चिमेस मिसिसिपी, उत्तरेला टेनेसी आणि पूर्वेस जॉर्जिया ही राज्ये आहेत. लोकसंख्येपैकी ५८·४ प्रतिशत लोक नागरी वस्तीत असून निग्रोंची संख्या २६·४ प्रतिशत आहे. राज्याच्या उत्तर विभागातील ॲपालॅचिअन पर्वताच्या काही रांगा नैर्ऋत्येकडे उतरत आल्या आहेत. त्यांपैकी टॅलाडीगा रांगेत चीहॉ (७३४ मी.) हा सर्वांत उंच डोंगर आहे. अगदी उत्तरेकडील कंबर्लंड व पूर्वेकडील पीडमाँट या पठारांवर रेतीमिश्रित लाल माती आहे. काळ्या सुपीक मातीचा एक पट्टा (कॉटन वेल्ट) राज्याच्या मध्यभागातून पूर्वपश्चिम गेला आहे. त्याच्यावर कपाशीप्रमाणेच गवतचाराही भरपूर निघतो. मेक्सिको आखाताच्या किनाऱ्याला गाळरेतीची सपाट जमीन आणि तिच्यावरील भागात वनराया असून शेतीही मोठ्या प्रमाणात होते. या बाजूचे सौम्य हवामान भाजीपाला व फळफळावळ उत्पादनास अनुकूल आहे. राज्याच्या उत्तर भागात कोळसा, कच्चे लोह, डोलोमाइट, चुनखडी इ. लोखंड-पोलाद-कारखान्यांना लागणारी खनिजे विपुल प्रमाणात मिळतात यांशिवाय ग्राफाइट, बॉक्साइट, तेल ही खनिजे मिळतात. शुभ्र संगमरवराचा जगातील सर्वांत मोठा पट्टा येथेच आहे. अगदी उत्तरेकडे टेनेसी नदी पूर्व-पश्चिम गेली असून तिचे खोरे ‘टीव्हीए’ (टेनेसी व्हॅली ॲथॉरिटी) या विश्वविख्यात प्रकल्पाचा गाभा आहे. इतर नद्या उत्तर-दक्षिण वाहतात. त्यांच्यापैकी अनेक नद्या मिळून झालेली ॲलाबॅमा व टॉमबिग्बी यांच्या संगमाने होणारी मोबील नदी मेक्सिकोच्या आखाताच्या मोबील उपसागराला मिळते. टेनेसी, टॅलापूसा, कूसा इ. नद्यांवरील धरणांमुळे गंटर्झव्हिल, मार्टिन वगैरे अनेक तलाव बनलेले आहेत. ॲलाबॅमाचा समुद्रकिनारा फक्त ८५ किमी. आहे. येथील सरासरी तपमान १० ते २६·७ से. असून पाऊस वर्षभर थोडाथोडा मिळून सरासरी १२७ सेंमी. पडतो. उत्तर भागात हिवाळ्यात एकदोनदा हिमपात होतो दक्षिण भागात मात्र पाऊस उन्हाळ्यात पडतो आणि मधूनमधून गारांची वादळे होतात. राज्याची सु. २/३ जमीन पाईनचे प्रकार, ओक, हिकरी, पॉप्लर व डिंक देणारे वृक्ष इ. विविध जातींच्या वनस्पतींनी आच्छादित आहे. येथे मिंक, खोकड, रॅकून, ऑपोसम, ससा, हरिण, अस्वल, बीव्हर वगैरे वन्यप्राणी आढळतात. राज्यात मत्स्योत्पादन केंद्रे असून पक्ष्यांसाठी अभयारण्य आहे.

इतिहास व राज्यव्यवस्था : दे सोटोच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश मोहिमेच्या वेळी १५३९ मध्ये यूरोपीय लोकांचा या प्रदेशातील आदिवासी रेड इंडियनांशी पहिला संघर्ष झाला. स्पॅनिश लोक येथे वसाहत करू शकले नाहीत. पण फ्रेंचांनी मात्र १७०२ नंतर मोबील येथे पहिली कायम वसाहत केली. इंग्‍लंड-फ्रान्सच्या लढाईनंतर १७६३ मध्ये हा मुलूख इंग्रजांकडे आला व अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धानंतर १७८३ मध्ये याचा बहुतेक भाग अमेरिकेला मिळाला उरलेला स्पेनच्या ताब्यातील किनारी प्रदेश १८१२ मध्ये अमेरिकेने जिंकल्यावर राज्याचे संपूर्ण क्षेत्र अमेरिकेकडे आले व १८१९ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत २२ वे राज्य म्हणून ॲलाबॅमाला प्रवेश मिळाला. १८१४ मध्येच स्थानिक रेड इंडियनांचा निर्णायक पराभव झाला होता १८३६ पर्यंत ते लोक राज्य सोडून तरी गेले किंवा राखीव प्रदेशात स्थायिक होण्यास कबूल झाले. राज्याला स्थैर्य आल्यावर कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली व शेतमजुरीसाठी आफ्रिकेहून निग्रो गुलामांची आयात प्रचंड संख्येने होऊ लागली. १८६१ च्या यादवी युद्धात गुलाम-पद्धतीला अनुकूल असलेले ॲलाबॅमा राज्य राष्ट्रातून फुटून निघाले. ‘कॉन्फेडरेट स्टेट्‌स’ या दक्षिणेच्या बंडखोर राज्यांचे सरकार या राज्यातील मंगमरी येथेच स्थापन झाले तथापि थोड्याच वर्षांत बंडखोरांचा पाडाव करून केंद्रसत्तेने लष्करी अंमल बसविला. १८६८ मध्ये ॲलाबॅमात मुलकी कारभार चालू झाला पण गैरव्यवहार, दिवाळखोरी अशा अनेक अनुभवानंतर जबाबदार व व्यवस्थित शासन सुरू होण्यास १८७५ साल यावे लागले. १८८० मध्ये बर्मिंगहॅमच्या परिसरात कारखानदारी चालू झाल्यानंतर मात्र राज्याची औद्योगिक प्रगती होऊ लागली. दोन जागतिक महायुद्धांमुळे उद्योगधंद्यांना चांगलीच भरभराट आली. दुसऱ्या महायुद्धानंतर शेतीवरची ग्रामीण लोकसंख्या घटत जाऊन औद्योगिक कामगारांच्या नागरी वस्तीत सारखी वाढ होत आहे. १९०१ च्या दुरुस्त संविधानानुसार चालणारी ॲलाबॅमाची अंतर्गत शासनव्यवस्था सामान्यत: देशातील इतर राज्यांसारखीच आहे. राष्ट्राच्या विधिमंडळावर ८ प्रतिनिधी व २ सेनेटर या राज्यातून निवडून जातात. १९६२-६३ मधील घटनांवरून या राज्यात वर्णभेदाची तीव्र जाणीव असल्याचे जगजाहीर झाले. गोऱ्यांच्या शिक्षणसंस्थांतून काळ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तेव्हा केंद्रसत्तेने हस्तक्षेप केला व नागरी अधिकारविधेयकही पास केले. वर्णभेदाचे कायद्याने उच्चाटन झाले, तरी स्वतंत्र धोरण चालू ठेवण्याच्या हट्टाने ॲलाबॅमा राज्याने सर्व शिक्षणक्षेत्रच खाजगी संस्थांकडे सोपवून गोर्‍याकाळ्यांच्या पृथक शिक्षणासाठी पळवाट काढली.

आर्थिक व सामाजिक स्थिती : कृषि-उत्पादनात सर्वांत महत्त्वाचे पीक कपाशी असून त्याच्या खालोखाल मका व भुईमूग महत्त्वाची आहेत. त्याशिवाय बटाटे, सोयाबीन, गवतचारा, फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. मांसासाठी पोसलेली गुरे व डुकरे आणि कोंबड्या व अंडी यांची पैदासही भरपूर असून मच्छीमारी मोठ्या प्रमाणात चालते. उद्योगधंद्यांत लोखंड-पोलादाच्या भट्ट्या, कापड-गिरण्या, लाकूड कापण्याचे, कागदाचे, लगद्याचे, सिमेंटचे, अन्नपदार्थांच्या डबाबंदीचे आणि धातूंचे विविध भाग व आकार बनविण्याचे कारखाने प्रामुख्याने दिसतात. बर्मिंगहॅम हे अमेरिकेचे एक मुख्य औद्योगिक केंद्र आहे. दळणवळणाच्या साधनांत ३,६०० किमी. नदी-जलमार्ग, सु. ८,००० किमी. लोहमार्ग, सु. १,०९,००० किमी. पक्के रस्ते आणि बहुतेक मोठ्या शहरांचे १७४ वर विमानतळ यांचा समावेश होतो. मोबील या पहिल्या प्रतीच्या बंदरातून सागरी व अंतर्भागातील जलमार्गांनी दूरपर्यंत वाहतूक सुलभ होते. ॲलाबॅमात एकूण १३३ नभोवाणी व १५ दूरचित्रवाणी-केंद्रे, १५,०१,४०० चे वर दूरध्वनियंत्रे, २० दैनिके व ११६ इतर नियतकालिके आहेत. राज्यातील लोक ख्रिस्ती धर्माच्या कॅथलिक, बॅप्टिस्ट व सदर्न मेथडिस्ट या पंथांचे अनुयायी आहेत. येथे शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. विद्यापीठे, महाविद्यालये, स्त्रियांसाठी व कलाशिक्षणासाठी संस्था, निग्रोंसाठी विख्यात टस्केजी इन्स्टिट्यूट, कृषी व धंदेशिक्षणाच्या शाळा या विद्यार्जनाच्या सोयींखेरीज कला व इतिहास-वस्तुसंग्रहालये, ग्रंथालये अशा सुविधा राज्यात आहेत. मूळ वसाहत करणाऱ्या फ्रेंचांची सांस्कृतिक परंपरा काही उत्सवांद्वारे चालू ठेवली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत राष्ट्रीय उद्याने व सरोवरे आहेत. ⇨मंगमरी ही ॲलाबॅमाची राजधानी आहे.

ओक, शा. नि.