ॲलिस स्प्रिंग्ज: ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटरी राज्यातील शहर. लोकसंख्या ७,८१० (१९६८). पूर्वीचे नाव स्टुअर्ट. देशाच्या जवळजवळ मध्यभागी, सृष्टिसौंदर्यासाठी प्रसिद्ध अशा मॅकडॉनल पर्वतश्रेणीमध्ये, समुद्रसपाटीपासून ५७९ मी. उंचीवर, ॲडिलेडच्या वायव्येस १,६७८ किमी. व डार्विनच्या आग्नेयीस १,७७८ किमी. आहे.  मध्य ऑस्ट्रेलियाच्या ओसाड प्रदेशातील मरूद्यान-परिसरात सोने, तांबे, अभ्रक इत्यादींच्या खाणी आणि ॲडिलेड- डार्विन ह्यांना जोडणाऱ्या संदेशवहन-मार्गावरील स्थळ म्हणून याचे महत्त्व खूपच वाढले. ॲडिलेडशी हे लोहमार्गाने सांधलेले असून हा लोहमार्ग अफगाणिस्तानमधून आणलेले उंट आणि कामगार यांच्या साहाय्याने बनविला असल्याने अद्यापही तेथील रेल्वेस ‘घान’ रेल्वे म्हणतात. डार्विनशी हे सडकेने जोडलेले असून येथील विमानतळामुळे कोठेही संपर्क साधता येतो.

गद्रे, वि. रा..