आइन्स्टाइनियम : रासायनिक धातुरूप मूलद्रव्य. चिन्ह Es. आवर्त सारणीच्या (मूलद्रव्यांच्या कोष्टकरूपाने केलेल्या विशिष्ट मांडणीच्या) तिसऱ्या गटामधील ॲक्टिनाइड क्षेणीतील (आवर्त सारणीतील ८९ ते १०३ अणुक्रमांकांची मूलद्रव्ये असलेल्या श्रेणीतील) हे मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक (अणुकेंद्रावरील प्रोटॉनांची संख्या) ९९ आहे. ते निसर्गात आढळत नाही, पण सापेक्षत: अधिक हलक्या अशा मूलद्रव्यांच्या केंद्रांच्या कृत्रिम मूलद्रव्यांतरणाने (एका मूलद्रव्याचे दुसऱ्यात रूपांतर करण्याच्या क्रियेने) तयार होते किंवा करता येते. औष्णिक-अणुकेंद्रीय स्फोटामुळे [→ हायड्रोजन बाँब] पॅसिफिक महासागरातील एनीवेटॉक कंकणद्वीपातील प्रवाळांच्या खडकांचा जो चुरा झाला त्याचे अमेरिकेतील प्रयोगशाळेत परीक्षण करीत असताना घिओर्सो व त्यांचे सहकारी यांना ह्या मूलद्रव्याचा १९५२ मध्ये शोध लागला. आइन्स्टाइन यांच्या गौरवार्थ त्याला आइन्स्टाइनियम हे नाव दिले गेले.
अमेरिकेतील आर्को (आयडाहो) येथील परीक्षण-विक्रियात (अणुभट्टीत) प्लुटोनियम (२३९) वर न्यूट्रॉनांचा दीर्घ काल मारा करून या मूलद्रव्याचा उच्च आइन्स्टाइनियम (२५३) हा शुद्ध समस्थानिक (अणुक्रमांत तोच पण अणुभार भिन्न असलेला त्या मूलद्रव्याचा प्रकार) प्रथम तयार करण्यात आला. सायक्लोट्रॉनाच्या (उच्च ऊर्जायुक्त कणांची शलाका मिळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एका उपकरणाच्या) साहाय्याने भारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकावर हीलियम-आयनांचा (विद्युत् भारित अणूंचा) किंवा प्रवेगित ड्यूटेरॉनांचा (ड्यूटेरियम या हायड्रोजनाच्या समस्थानिकाच्या अणुकेंद्रांचा) मारा करून आइन्स्टाइनियमाचे अनेक समस्थानिक मिळविण्यात आलेले आहेत व ते सर्व किरणोत्सर्गी (किरण बाहेर टाकण्याचा गुण असलेले) आहेत. त्यांचे अर्धायुकाल (किरणोत्सर्गी पदार्थाची मूळची क्रियाशीलता विघटनामुळे निम्मी होण्यास लागणारा काल) काही थोडी मिनिटे तो सुमारे पाऊण वर्ष इतकेच असतात. त्यांपैकी सर्वांत स्थिर असणाऱ्या समस्थानिकाचा अर्धायुकाल २७० दिवस असून त्याचा द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन व न्यूट्रॉन यांची बेरीज) २५४ आहे. म्हणूनच आवर्त सारणीत आइन्स्टाइनियमाचा अणुभार २५४ हाच दाखविला जातो. या मूलद्रव्याचा उपलब्ध असा एकूण साठा अत्यल्प भरेल. पण आइन्स्टाइन (२५४) वापरून त्याच्या रासायनिक व भौतिक गुणधर्मांचे परीक्षण करता येईल, इतपत तो आहे. त्याचे रासायनिक गुणधर्म ॲक्टिनाइड श्रेणीतील इतर त्रि-संयुजी [→ संयुजा] मूलद्रव्यांच्या गुणधर्मांसारखे आहेत.
पहा : युरेनियमोत्तर मूलद्रव्ये.
ठाकूर, अ. ना.