अमेरिका, मध्य : उत्तर अमेरिकेतील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया यांना जोडणारा संयोगभूमिस्वरूपी चिंचोळा भूप्रदेश. अक्षांश ७ १५’ ते १८३०’ उ. व रेखांश ७७ ते ९२ १५’ प. क्षेत्रफळ ५,४१,५५९ चौ. किमी. लोकसंख्या सु. १·६६ कोटी. हा प्रदेश वायव्य-आग्नेय दिशेने वेडावाकडा पसरलेला असून पनामात त्याची किमान रुंदी ४८ किमी. तर हाँडुरस-निकाराग्वा सीमेवर ५६० किमी. आहे. त्याचा दक्षिणोत्तर विस्तार सु. १,२५० किमी. व पूर्वपश्चिम विस्तार सु. १,५९३ किमी. आहे. मेक्सिको ते कोलंबिया- पर्यंत त्याची लांबी ३,३५० किमी. आहे. या भूप्रदेशात ग्वातेमाला, हाँडुरस, एल् साल्वादोर, निकाराग्वा, कोस्टारीका आणि पनामा ही स्वतंत्र लोकसत्ताक राष्ट्रे, ब्रिटिश हाँडुरस हा ब्रिटिशांच्या आणि पनामा कालवा विभाग हा अमेरिकेच्या सत्तेखालील प्रदेश यांचा समावेश होतो.

मध्य अमेरिकेचे ढोबळ मानाने तीन स्वाभाविक विभाग पडतात.एक, उत्तरेकडील विस्तीर्ण उंचसखल भाग यात ब्रिटिश हाँडुरस, ग्वातेमाला, हाँडुरस, एल् साल्वादोर व निकाराग्वाचा बराच प्रदेश येतो. दुसरा निकाराग्वाचा सखल प्रदेश हा निकाराग्वा आणि कोस्टारीका यांच्या सीमेपासून सुरू होऊन आग्नेय-वायव्य दिशेने फॉन्सेकाच्या आखातापर्यंत जातो. या लहानशा सखल प्रदेशाच्या दक्षिणेकडील प्रदेश हा तिसरा विभाग होय, पहिल्या विभागातील पर्वत सामान्यतः पूर्वपश्चिम असून त्यांचा गाभा आर्कियन किंवा पूर्वपुराजीव-महाकल्पातील खडकांचा आहे. त्यांवर ज्वालामुखी द्रव्यांचा थर आहे. या भागात वलीकरण व विभंग यांमुळे मोठमोठ्या द्रोणी बनलेल्या आहेत. हे पर्वत पश्चिमेकडे अधिक उंच असून पूर्वेकडे कमी उंच होत गेले आहेत. ते पुढे कॅरिबियन समुद्राखालून वेस्ट इंडीज बेटांत गेले आहेत. पॅसिफिकच्या बाजूस ज्वालामुखी द्रव्यांच्या थरावर ज्वालामुखी शिखरांची एक रांगच्या रांग उभी आहे. त्यांत ताहुमुल्को (४,१११ मी.), तकाना (४,०६४ मी.) यांशिवाय ३,५०० ते ३,९०० मी. उंचीची अनेक शिखरे आहेत. त्यांपैकी पुष्कळ जागृत आहेत. एल् साल्वादोरमधील इझाल्को हे सु. १,८८५ मी. उंचीचे शिखर मधून मधून जागृत असते. ते पॅसिफिकमधील दीपस्तंभ म्हणून प्रसिद्ध आहे. ज्वालामुखी प्रदेशातील खोलगट भागातील माती सुपीक असून तेथे अनेक सरोवरे आहेत. प्राचीन काळापासून या भागात वस्ती झालेली आहे. या विभागातील प्रदेशाची उंची सामान्यतः १,५०० ते २,५०० मी. आहे. पश्चिम भागात त्याचे स्वरूप काहीसे पठारी असून त्यात प्रवाहांमुळे खोल घळ्या तयार झालेल्या आहेत. पूर्व भागात टोकदार कड्याकपारींचे डोंगर व खोल दर्‍या आहेत. तेथे ग्रॅनाइट, नाइस व शिस्ट प्रकारचे खडक आढळतात. ग्वातेमालाचा व ब्रिटिश हाँडुरसचा उत्तरभाग मेक्सिकोतील यूकातानच्या चुनखडकयुक्त पठाराशी संलग्न आहे. पॅसिफिक किनारपट्टी मेक्सिकोपासून फॉन्सेकाच्या आखातापर्यंत जेमतेम ४० किमी. रुंद असून किनारा सरळ आहे. येथे नैसर्गिक बंदरे नाहीत. याच्या दक्षिणेकडील पॅसिफिक किनारा आखाते, उपसागर, भूशिरे व द्वीपकल्पे यांनी युक्त आहे. ब्रिटिश हाँडुरसचा दक्षिणभाग व ग्वातेमाला- चा पूर्वकिनारा हे सखल व दलदलीचे प्रदेश आहेत. हाँडुरसचा उत्तरकिनारा म्हणजे सु. २५ किमी. रुंदीची सखल पट्टी असून तिच्यामागे ४५० ते १,५०० मी. उंचीचे डोंगर भिंतीसारखे उभे आहेत. हाँडुरसचा व निकाराग्वाचा पूर्वकिनारा बऱ्याच ठिकाणी खारकच्छयुक्त असून त्याच्या जवळपास बरीच लहानमोठी बेटे आहेत. येथील किनारपट्टी काही ठिकाणी १६० किमी. रुंद असून आर्द्र व सखल आहे.

निकाराग्वाचा सखल प्रदेश हा एक सांरचनिक द्रोणी-प्रदेश आहे. त्याच्यामुळे उत्तरेकडील व दक्षिणे- कडील उंच प्रदेशात खंड पडलेला आहे. यात निकाराग्वा हे सु. १६० किमी. लांब व ७२ किमी. रुंद सरोवर आहे. त्यात सु. १,५०० मी. उंचीची तीन ज्वालामुखी शिखरे आहेत. या सरोवराच्या वायव्येस मानाग्वा हे सु. ६० किमी. लांब व २५ किमी. रुंद दुसरे सरोवर आहे. तीपितापा नदीमार्गे त्यातील पाणी निकाराग्वा सरोवरात येते व तेथील पाणी सॅन वॉन नदीमार्गे कॅरिबियन समुद्रात जाते. मानाग्वा सरोवराची समुद्रसपाटीपासून उंची सु. ४० मी. तर निकाराग्वा सरोवराची ३२ मी. आहे. मानाग्वापासून फॉन्सेका आखातापर्यंत ज्वालामुखींची एक रांग गेलेली आहे.

या सखल प्रदेशाच्या दक्षिणेस वायव्य-आग्नेय दिशेने डोंगरांच्या रांगा गेलेल्या आहेत. पनामाच्या सीमेपर्यंत त्यांची उंची ३,८०० मी. इतकी वाढत जाते. कोस्टारीकामध्ये या पर्वतराजीला समांतर रांगेत चार ज्वालामुखी शिखरे २,७८५ ते ३,४५० मी. उंचीची आहेत. ही शिखरे आणि पर्वतराजी यांच्या दरम्यान कोस्टारीकामध्ये ९०० ते १,२०० मी. उंचीवर मेसेटा सेंट्रल हा महत्त्वाचा पर्वतांतर्गत खोलगट प्रदेश आहे. कोस्टारीकातील पर्वतराजी पनामा शहराच्या नैर्ऋत्येस ९०० मी. पर्यंत उतरत गेली आहे. कोलोन शहराच्या पूर्वेस दुसरी एक ९०० मी. उंचीची डोंगराची रांग सुरू होऊन कोलंबियात जाते. या दोन रांगांच्या दरम्यान पॅसिफिक व कॅरिबियन यांमधील प्रदेश फक्त ४८ किमी. रुंद व सु. ८७ मी. उंच आहे त्यात गाटून सरोवर आहे. पनामा कालव्याचा सुमारे १/३ भाग या सरोवरात आहे. तिसऱ्या विभागाच्या दोन्ही किनाऱ्यांवरही सखल किनारपट्ट्या आहेत. उत्तरेकडील पर्वतांच्या मानाने हे दक्षिण विभागातील पर्वत बरेच अर्वाचीन आहेत.

उत्तर व दक्षिण पर्वतविभागातील उंच शिखरे व ज्वालामुखी प्लिस्टोसीन ते अर्वाचीन काळातील असून ती कॅरिबियनपेक्षा पॅसिफिकला अधिक जवळ आहेत. या ज्वालामुखीयुक्त भागात वारंवार तीव्र स्वरूपाचे विनाशकारी भूकंप होतात. काहींच्या बरोबर स्फोट तर काहींच्या बरोबर विभंग होतो. पुष्कळ शहरांना यामुळे धोका पोचलेला आहे. डिसेंबर १९७२ च्या भूकंपाने मानाग्वा शहर जवळजवळ संपूर्ण उद्‌ध्वस्त झाले होते.

प्रदेशाच्या डोंगराळ व अरुंद स्वरूपामुळे येथील नद्या वेगाने वाहणाऱ्या, आखूड आणि मार्गात खोल दऱ्या कोरणाऱ्या आहेत. विशेषतः पॅसिफिककडे वाहणारे प्रवाह फारच आखूड आहेत. जलमार्ग म्हणून कोणतीच नदी उपयोगी पडत नाही. कॅरिबियनकडे जाणाऱ्या नद्यांना वर्षभर पाणी असते. पॅसिफिककडील नद्यांना पावसाळ्यात विध्वंसक पूर येतात. निकाराग्वाच्या सखल प्रदेशातून पॅसिफिक व कॅरिबियन यांना जोडणारा जलमार्ग काढण्याची योजना होती.

पॅसिफिक किनाऱ्यावरील सखल प्रदेशात तपमान सामान्यतः १० ते १५से. असते. ते २६ते २७से. च्या वर कधी जात नाही. कॅरिबियन किनाऱ्यावरील सखल प्रदेशात २० ते २७ से. पर्यंत तपमान असते. ते ३२से. पर्यंतही सहसा जात नाही. वार्षिक सरासरी तपमानकक्षा बहुधा २ ते ३ से. पर्यंत असते. दैनिक कक्षा मात्र सु. ८ ते ९  से. असते. पॅसिफिक किनाऱ्यावर मुख्यतः मार्च ते सप्टेंबर या काळात पॅसिफिकवरून दक्षिण व नैर्ऋत्य वाऱ्यांमुळे सु. १२५ ते १५० सेंमी. पाऊस पडतो. तो २०० सेंमी. पेक्षा अधिक सहसा होत नाही. कॅरिबियन किनाऱ्यावर व्यापारी वाऱ्यांमुळे वर्षभर सु. २०० सेंमी.पेक्षा अधिक पाऊस पडतो. निकाराग्वा-कोस्टारीका सीमेवर तो सर्वांत जास्त–सु. ६०० ते ६५० सेंमी. इतका–पडतो. सर्वांत कमी पावसाच्या मार्च महिन्यातही तो १६ ते १७ सेंमी. पडतो. डोंगराळ भागात उंचीबरोबर तपमान कमी होत जाते. पाऊस बहुधा मार्च ते सप्टेंबर या काळात पडतो. तथापि डोंगरांच्या उतारांची दिशा, त्यांवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा कोन इत्यादींचा हवामानावर परिणाम होतो. कॅरिबियनकडे तोंड असलेल्या उतारांवर अधिक व वर्षभर पाऊस पडतो. खोल दऱ्यांत कमी पाऊस पडतो. ग्वातेमाला या डोंगराळ भागातील प्रातिनिधिक शहराची उंची १,४९४ मी., मे महिन्याचे सरासरी तपमान २०·६ सें., डिसेंबरमधील १६·१सें., वार्षिक पाऊस १३० सेंमी. असून नोव्हेंबर ते मार्च प्रत्येक महिन्यात २·५ सेंमी. पेक्षा कमी पाऊस पडतो.

मध्य अमेरिकेच्या कॅरिबियन किनाऱ्यावरील व त्या बाजूच्या डोंगरउतारांवरही, उष्ण, आर्द्र, सखल प्रदेशात उष्णकटिबंधीय वर्षावने आढळतात. त्यात मॉहॉगनी, सीडार, रोजवुड, सिंकोना, बालसा, रबर इ. उपयुक्त झाडे मुबलक आहेत. पॅसिफिककडील कमी पावसाच्या भागात विरळ अरण्ये व पानझडी वृक्ष आढळतात. ग्वातेमालाचा पॅसिफिक किनारा किंवा एल् साल्वादोरचा पूर्वेकडील सखल प्रदेश येथे सॅव्हाना प्रकारचे गवत आढळते. अगदी रूक्ष भागात कॅक्टसच्या जाती आढळतात. डोंगराळ भागात उंचीप्रमाणे वनस्पती बदलतात. उष्णकटिबंधीय वनस्पतींऐवजी ओकसारखे समशीतोष्ण कटिबंधीय वृक्ष दिसू लागतात. त्याहीपेक्षा जास्त उंचीवर पाइनसारख्या सूचिपर्णी वृक्षांची जंगले आढळतात. सु. ३,००० मी. उंचीपलीकडे आल्प्स प्रकारचे गवत व रंगीबेरंगी फुलझाडे उगवतात. दिवसा ढग आणि रात्री पाऊस अशा प्रकारच्या १,३०० ते १,४०० मी. उंचीवरील प्रदेशात शेवाळे, नेचे इत्यादींनी आवृतरुंदपर्णी वृक्ष आढळतात. उंच प्रदेशात शेतीमुळे व सखल प्रदेशात मळ्यांमुळे तसेच लोणारी कोळसा तयार करणे आणि चराई यांमुळे मूळच्या नैसर्गिक वनस्पतींचा नाश बऱ्याच प्रमाणात झालेला आहे.

येथील अरण्यात जग्वार, तापीर, प्यूमा इ. प्राणी काही प्रमाणात आढळतात. हरिण, माकड, अस्वल, चित्ता, रॅकून, साळिंदर हेही काही भागांत आहेत. नद्यांतून सुसरी, कासवे, मॅनाटी आहेत. वन्य टर्की, बदके, कबुतरे, महोका, सुंदर पिसाऱ्यांचा केटझल् यांसारखे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे, पतंग, माश्या, कोळी, मुंग्या, डास इ. कीटक विपुल आहेत. समुद्रात अनेक प्रकारचे मासे, कालवे, कोळंबी वगैरे सापडतात.


मध्य अमेरिकेत खनिज संपत्ती फारशी नाही. ग्वातेमालात थोडी चांदी सापडते. एल् साल्वादोरच्या वायव्य भागात सोने, चांदी, पारा व शिसे, हाँडुरसमध्ये सोने व चांदी आणि निकाराग्वाच्या नद्यांत थोडे सोने सापडते. जागतिक व्यापाराच्या दृष्टीने ही सर्व उपेक्षणीय आहेत.

इतिहास: स्पॅनिश लोकांच्या आगमनापूर्वी अनेक शतके या भागात उच्च व विकसित माया संस्कृती नांदत होती. १५०१ मध्ये स्पॅनिश येथे आले व १५२०–२५ च्या सुमारास मेक्सिको ते पनामा हा प्रदेश त्यांनी आक्रमिला. कोलंबसने १५०२ मध्ये हाँडुरस ते पनामा हा किनारा संशोधिला होता. मेक्सिकोच्या व्हाइसरॉय- च्या अधिकारकक्षेतील ग्वातेमालाच्या कॅप्टन्सी-जनरलच्या अंमलाखाली पनामाखेरीज मध्य अमेरिकेचा सर्व प्रदेश आणला गेला. प्रथम प्रथम जेत्या स्पॅनिश लोकांना येथे बरेच सोने मिळाले परंतु लवकरच स्थानिक इंडियन मजुरांच्या बळावर ग्वातेमाला, हाँडुरस, निकाराग्वा व एल् साल्वादोर येथील वसाहतवाल्यांनी शेती सुरू केली. वसाहतीच्या काळात खनिजसंपन्न पेरूचे राजप्रतिनिधी व स्पेन यांमधीन यांमधील दुवा हे पनामाचे स्वरूप होते. १८२१ मध्ये ग्वातेमालाच्या कॅप्टन्सीने युद्धाचा अवलंब न करता स्पेनपासून स्वातंत्र्य मिळविले. ऑगूसतीन दे इतूरबीदे याचे साम्राज्य मध्य अमेरिकेवर १८२२-२३ मध्ये काही महिनेच टिकले. इतूरबीदेच्या पाडावानंतर मध्य अमेरिकेचे संघराज्य स्थापन झाले परंतु जुनी भांडणे, अलगतेची भावना व परस्परविरोधी राजकीय मते यांमुळे मे १८३९ मध्ये ते विस्कळित झाले आणि ग्वातेमाला, एल् साल्वादोर, निकाराग्वा, हाँडुरस व कोस्टारीका ही स्वतंत्र लोकसत्ताक राज्ये झाली. पनामा हा १९०३ पर्यंत कोलंबियाचा भाग होता. ब्रिटिश हाँडुरस ही या प्रदेशातील १६३८ पासूनची एकमेव यूरोपीय वसाहत आहे. तिला ‘बेलीझ’ असे दुसरे नाव असून ग्वातेमाला त्या भागावर आपला हक्क सांगत असतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळजवळ शंभर वर्षे येथील राष्ट्रे आपापसांत झगडत राहिली. नंतर संयुक्त संस्थानांच्या साहाय्याने विसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास आपसांतील तंटे मिटविण्याकडे त्यांचा कल होऊ लागला आहे. संघराज्यस्थापनेचे प्रयत्‍न अनेक वेळा झाले परंतु ते अखेर फसले. दुसऱ्या महायुद्धानंतर राजकीय कारणांपेक्षा आर्थिक कारणांसाठी एकत्र येणे, या राष्ट्रांना आवश्यक वाटू लागले आहे. त्यामुळे प्रवास, शैक्षणिक सवलती, जकात व सामायिक बाजारपेठ या दृष्टींनी भरीव प्रगती होत आहे.

 आर्थिक स्थिती : मध्य अमेरिकेतील ७५% लोक शेती करतात. जंगल तोडून केलेल्या तात्पुरत्या फिरत्या शेतीपासून अत्याधुनिक पद्धतीने चालविलेल्या मळ्यांपर्यंत शेतीचे सर्व प्रकार दिसून येतात. येथील लोकांचे अन्न म्हणजे मका. त्याच्या जोडीला भात, कडधान्ये, बटाटा, घेवडा इ. पिके काढतात. डोंगरउतारांवर कॉफीच्या लागवडी आणि उत्तर हाँडुरस, पूर्व ग्वातेमाला, कोस्टारीका येथील केळीच्या बागा आर्थिक दृष्ट्या फार महत्त्वाच्या आहेत. कापूस, ऊस, घायपात, तंबाखू, कोको यांचेही उत्पन्न होते. निर्वाहा- पुरती शेती करणाऱ्यांची शेते लहान–एक ते दोन हेक्टरांची–असून त्यांतील उत्पन्न कुटुंबपोषणापुरतेच असते काही उरलेच तर ते जवळच्या बाजारात विकले जाते. केळीच्या बागा परकीयांच्याहाती आहेत. नीळ, ताडाचे तेल, नारळ, आबका यांचेही स्थानिक महत्त्वाचे उत्पन्न होते. ब्रिटिश हाँडुरस व ग्वातेमाला येथे लाकूड, चिकल वगैरे जंगल-उत्पन्ने महत्त्वाची आहेत. चिकल हे ‘च्युइंग गम’चे आधारद्रव्य असते. एल् साल्वादोरचा पूर्व भाग व हाँडुरस – मधील डोंगराळ चराऊ राने येथे पशुपालनाचा व्यवसाय चालतो. गुरे, शेळ्यामेंढ्या, डुकरे, गाढवे, कोंबड्या–बदके इ. प्राणी पाळतात. त्यांचाही उपयोग स्थानिक महत्त्वाचाच आहे. खाणकाम हा व्यवसाय काही भागांत चालतो. पनामा कालवा विभागात पुष्कळ स्थानिक लोकांना चांगला कामधंदा मिळतो. मातीची भांडी बनविणे, कापड विणणे, टोपल्या विणणे, कौले तयार करणे, सुतारकाम, कातडी कमविणे इ. स्थानिक उद्योग ठिकठिकाणी चालतात. मध्य अमेरिकेत नैसर्गिक जलसंपत्ती पुष्कळ आहे परंतु जलविद्युत्-उत्पादन करण्यासाठी तिचा अद्याप मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेलेला नाही. कोस्टारीका व एल् साल्वादोरमध्ये याबाबत काही प्रगती झालेली आहे. इतर देशांत काही ठिकाणी औष्णिक वीज-उत्पादन होते. तथापि एकंदरीत विजेचे उत्पादन कमी आहे.

मध्य अमेरिकेतून बालसा लाकूड, केळी, कोको, कॉफी, चिकल, कातडी, मॉहॉगनी, रबर, तंबाखू वगैरे पदार्थ मुख्यतः  संयुक्त संस्थानांना व काही अंशी कॅनडा, पश्चिम यूरोपीय देश व इतर लॅटिन-अमेरिकन देशांना निर्यात होतात. डबाबंद अन्नपदार्थ, रासायनिक पदार्थ, विजेची व शेतीची उपकरणे, कागद, कापड, मालमोटारी इ. वस्तू आयात होतात.

मध्य अमेरिकेत एकूण सु. २,७५० किमी. लांबीचे कच्चे रस्ते आहेत. येथील सर्व देशांना जोडणारा सु. १,६०० किमी. लांबीचा पक्का हमरस्ता (‘इटर-अमेरिकन हायवे’) ‘पॅन-अमेरिकन हायवे’चा भाग आहे. हा प्रदेश मोटारीने पूर्वपश्चिम ओलांडणे फक्त पनामातच शक्य आहे. दोन्ही किनाऱ्यांना जोडणारे फक्त तीनच लोहमार्ग आहेत. प्रमुख शहरांना जोडणारे सु. ४,८०० किमी. लांबीचे लोहमार्ग आहेत. प्रदेशाच्या डोंगराळ स्वरूपामुळे विमानमार्ग दळणवळणास चांगले उपयोगी पडतात. या प्रदेशात ५०हून अधिक दैनिके असून १५० हून अधिक नभोवाणीकेंद्रे आहेत. ग्वातेमाला सिटी व पनामा सिटी येथे दुरचित्रवाणीकेंद्रे आहेत.

मध्य अमेरिकेतील आयातनिर्यात-व्यापार मुख्यतः संयुक्त संस्थानांशीच होतो. येथील परकीय कंपन्या बहुतेक संयुक्त संस्थानांतील असून त्यांच्या मळ्यांतील व्यवहार व व्यापार यांबद्दल येथील देशांत असमाधान आहे. परकीय मळेवाल्यांच्या हितसंबंधरक्षणासाठी त्यांना व पर्यायाने त्यांच्या राष्ट्रांना म्हणजे संयुक्त

संस्थानांना स्थानिक राजकारणात रस घेणे अपरिहार्य होते व याचे परिणाम येथील राजकीय जीवनावर होतात. अर्थकारण व राजकारण यांच्या अविभाज्यतेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

लोक व समाजजीवन: एकूण मध्य अमेरिकेतील लोकांत इंडियन (४१%) व मेस्टिझो–इंडियन व यूरोपीय यांच्या संकराने झालेले–(४५%) यांची संख्या फार मोठी आहे. त्याखालोखाल यूरोपीय (१०%) व नीग्रो (४%) लोकांची संख्या आहे. त्यांचे प्रमाण येथील सर्व देशांत सारखे नाही. ग्वातेमाला ६७% लोक इंडियन आहेत. निकाराग्वात ७७% लोक मेस्टिझो आहेत. कोस्टारीकामध्ये यूरोपीय लोक ४८% आहेत. ब्रिटिश हाँडुरसमध्ये नीग्रो ४८% आहेत. जुने माया साम्राज्य ग्वातेमालाच्या सखल प्रदेशात व शेजारच्या मेक्सिकोत होते. यूरोपीयांनी हा भाग जिंकला तेव्हा तेथे इंडियन लोकांची मोठी वस्ती होती. नीग्रो हे ब्रिटिश हाँडुरस, हाँडुरस व निकाराग्वा येथील मळ्यांत काम करणारे मजूर म्हणून सर्वांत शेवटी आणले गेले. ग्वातेमालातील इंडियन माया लोकांचे वंशज आहेत परंतु पूर्व हाँडुरस व पूर्व निकाराग्वा येथील इंडियन तसे नाहीत. पूर्व पनामातही इंडियन आढळतात. लोकसंख्येची वाटणी सर्वत्र समप्रमाणात नाही. काही भागांत ती डोंगराळ विभागात जास्त तर काही भागांत सखल विभागात जास्त आहे. मोठ्या शहरांतील लोकांच्या राहणीवर यूरोपीय संस्कृतीची छाप असली, तरी सामान्य लोक गवती किंवा कौलारू छपरांच्या, दगडमाती- च्या जुन्या पद्धतीच्या घरांतराहणारे, रंगीबेरंगी भडक कपडे व दागिने (उत्सवाच्या वेळी ) वापरणारे, अशिक्षित व मागासलेले आहेत. अतिशय वेगाने लोकसंख्या वाढणाऱ्या जगातील प्रदेशांत मध्य अमेरिकेची गणना आहे. पुरुष सुती कापडाची विजार व सदरा वापरतात आणि डोक्यास रुंद, गवती टोप्या घालतात. स्त्रिया सुती कापडाची पोलकी व पायघोळ झगे वापरतात आणि डोक्यावर किंवा खांद्यावर रंगीबेरंगी शाल घेतात. मका, घेवड़ा, तांदूळ, भाजीपाला, फळे व मांस हे येथील लोकांचे अन्न होय.

या प्रदेशात धर्मस्वातंत्र्य आहे. तथापि बहुतेक लोक कॅथलिक ख्रिस्ती आहेत. काही प्रॉटेस्टंट आहेत. इंडियन व नीग्रो यांच्या मूळ धर्मकल्पनांचा भागही काही ठिकाणी ख्रिस्ती धर्माचारात मिसळलेला दिसतो.

लोकांची भाषा मुख्यतः स्पॅनिश आहे. काही लोक मूळच्या इंडियन बोलीभाषाही बोलतात. ब्रिटिश हाँडुरसमध्ये इंग्रजी भाषा आहे.

संदर्भ : 1. Cole, J. P. Latin America, London, 1965.

           2. James, P. E. Latin America, New York, 1959.

कुमठेकर, ज. ब.