अभ्यंजन : ‘अभ्यंजन’ म्हणजे तेल, तूप, चरबी, दूध, दही, मध वा अन्य द्रव्य अंगास चोळणे वा चोपडणे.’अभ्यंग’ हा याचा पर्यायी शब्द. अभ्यंजन धार्मिक व अन्य प्रकारचेही असते. तेलासारख्या द्रवद्रव्यात एक प्रकारची जादूमय किंवा पवित्र शक्ती वसत असते किंवा मंत्राने तशी शक्ती त्यात निर्माण करता येते, अशी समजूत आदिम लोक व धार्मिक लोक यांच्यामध्ये असते.

जादू, धर्मदीक्षा, विशिष्ट धार्मिक समारंभ, राज्याभिषेक, धार्मिक रीतीने करावयाचे अधिकारग्रहण इ. विधींमध्ये अभ्यंजन हा संस्कार करतात. उपनयन, विवाह व राज्याभिषेक यांसारख्या हिंदूंच्या धार्मिक विधींमध्ये  अनुक्रमे बटू, वधूवर व राजा यांचे अभ्यंजन करतात. देवमूर्तीच्या प्रतिष्ठाविधीमध्ये मूर्तीचे अभ्यंजन करावयाचे असते.  ख्रिस्ती धर्मात धर्मसुधारणेच्या आंदोलनापूर्वी अभ्यंजन-संस्काराचे महत्त्व फारच मोठे होते. यहुद्यांकडून-म्हणजे ज्यूंकडून-हा संस्कार ख्रिस्त्यांकडे आला. खुद्द यहुद्यांनी मात्र तो संस्कार पूर्वीच्या समाजातील रूढ चालीचे अनुकरण करून स्वीकारला. धर्मदीक्षा देताना ख्रिस्ती गुरू शिष्याचे अभ्यंजन करतो. धर्माचार्यपदावर प्रथमच स्थापना करण्याच्या वेळी संबंधित धर्माचार्याचे अभ्यंजन करीत.

आरोग्यरक्षणासाठी, शक्ती वाढविण्यासाठी अथवा रोगाचे निवारण करण्याकरिता वैद्यकात अभ्यंजन सांगितले आहे. 

जोशी, लक्ष्मणशास्त्री