आइकमान, क्रिस्तीआन : (११ ऑगस्ट १८५८—५ नोव्हेंबर १९३०). डच वैद्य, जंतुशास्त्रज्ञ व आरोग्यशास्त्रज्ञ. १९२९ च्या वैद्यकाच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. नेदर्लंड्समधील नायकेर्क येथे त्यांचा जन्म झाला. १८७५—८३ या काळात ॲम्स्टरडॅम विद्यापीठात वैद्यकाचा अभ्यास केल्यानंतर त्याच संस्थेच्या शरीरविज्ञान शाखेत त्यांनी मदतनीस म्हणून काम केले. १८८३ मध्ये ते सैन्यात शस्त्रवैद्य म्हणून शिरले व डच ईस्ट इंडीजला गेले. पण प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते परत आले. काही काळ बर्लिन येथे त्यांनी रॉबर्ट कॉख याच्याजवळ सूक्ष्मजंतुशास्त्राचा अभ्यास केला. १८८६ मध्ये बेरीबेरी रोगाचा (ब१ या जीवनसत्वाच्या अभावामुळे होणाऱ्या एका रोगाचा) अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीबरोबर ते मलायात गेले. त्यांचे सहकारी परत आले, पण ते स्वत: जावातील बटेव्हिया येथील रोगविज्ञान संस्थेत बेरीबेरीच्या संशोधनासाठी राहिले. कोंबड्यांना जास्त सडलेले-कांडलेले तांदूळ खावयास घातले तर त्यांना जीवनाचे एक पोषक द्रव्य कमी पडते व त्यांना बहुतंत्रिकाशोथ (अनेक मज्जातंतूची दाहयुक्त सूज) हा रोग होतो असे त्यांना आढळून आले. तो मनुष्याला होणाऱ्या बेरीबेरीसारखाच आहे. त्यांचे हे संशोधन जीवनसत्त्वांच्या अभ्यासाला आधारभूत ठरले. हे जीवनसत्त्व ब१ शोधून काढल्याबद्दल त्यांना १९२९ मध्ये वैद्यकाचे नोबेल पारितोषिक फ्रेडरिक हॉफकिन्स यांच्याबरोबर विभागून मिळाले. ते नेदर्लंड्समधील उत्रेक्त येथे मृत्यू पावले.
कानिटकर, बा. मो.