अंबेलेलीझ : (चामर-गण लॅ. अंबेलिफ्लोरी ). चवरी (चामर) सारखे फुलोरे असणाऱ्या फुलझाडांचा एक गण. ह्यामध्ये पाच कुले असून अंबेलिफेरी (चामर-कुल) व ॲरेलिएसी (तापमारी-कुल) ही प्रमुख आहेत. याशिवाय यात अलॅँजिएसी, कॉर्नेसी व गॅरिएसी या कुलांचा समावेश आहे. ⇨रोझेलीझ (गुलाब-गण) व ⇨मिर्टेलीझ (जंबुल- गण) यांच्याशी चामर-गणाचे बरेच साम्य असून बहुधा गुलाब-गणापासून इतर दोन्ही गण अवतरले असावे. सुट्या पाकळ्या असणाऱ्या द्विदलिकित फुलझाडांमध्ये या गणाचा दर्जा बराच वरचा आहे. ह्यातल्या वनस्पती ओषधी, क्षुपे किंवा वृक्ष असून त्यांचा प्रसार सर्वत्र (विशेषतः समशीतोष्ण प्रदेशात) आहे. पाने विविध, तळाशी खोबणीसारखी बहुतेक जातींत तैल किंवा राळ-नलिका आढळतात. फुले नियमित, लहान, बहुधा द्विलिंगी, अपिकिंज परिदले ४-५ व भिन्नस्वरूप संवर्त अखंड किंवा संदले फार लहान प्रदले सुटी, बहुधा पाच केसरदलांचे एकच मंडल किंजदले दोन, जुळलेली किंजपुट अधःस्थ व दोन कप्प्यांचा प्रत्येकात एकच बीजक [→फूल]. फळ अश्मगर्भी, मृदू किंवा शुष्क (पालिभेदी) [→ फळ]. सामान्य उपयुक्त वनस्पती : गाजर, कोथिंबीर, बडिशेप, शेपू, ओवा, हिंग ब्राह्मी, पार्स्ले, पार्स्निप, ॲरेलिया, गिसेंग, राइस-पेपर प्लँट इ.

परांडेकर, शं. आ.