अंबर – १ : राजस्थान राज्यातील निसर्गरम्य प्राचीन नगरी. लोकसंख्या ९,७९५ (१९७१). ही जयपूरच्या ईशान्येस जयपूर-दिल्ली राजमार्गावर ११ किमी.वर आहे. पूर्वीच्या अंबर संस्थानची ती राजधानी होती. अंबर नावाची व्युत्पत्ती ‘अंबरीष’ यापासून सांगितली जाते. ‘अंबरचे’ प्राचीन नावही ‘अंबरीखनेर’ होते. टॉलेमीने या नगरीचा उल्लेख केला आहे. सुसावत मीना ह्या राजस्थानातील वन्य जमातीची ही राजधानी दहाव्या शतकात भरभराटीत असल्याचा उल्लेख मिळतो. बाराव्या शतकामध्ये कच्छवाह राजपुतांनी मीनांच्या राजांपासून ती जिंकून घेतली व पुढे सहा शतके आपली राजधानी तेथे ठेवली. १७२८ मध्ये जयसिंगाने राजधानी जयपूरला हलविल्यावर अंबरचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले.
अंबर हे अरवली पर्वतशाखांनी वेढलेले आहे. चारी बाजूंनी ग्रॅनाइटच्या रंगीत दगडांनी तसेच वृक्षांनी आच्छादिलेल्या टेकड्या, त्यांतील एका टेकडीवर बांधलेला अप्रतिम सौंदर्यशाली राजवाडा व त्या टेकडीच्याच पायथ्याशी असलेली निदरी आणि त्यामधील माओता नावाचे सरोवर ह्यांमुळे अंबर अतिशय प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.
पहिल्या मानसिंगाने सु. १६०० मध्ये तेथे राजवाडा बांधावयाला सुरवात केली मिर्झा राजा जयसिंगने तो पुरा केला. राजवाड्याची रचना व त्यातील आरसेमहाल उत्तम आहे. दिवाण इ-आमच्या खांबावरील नक्षीकाम जहांगीर सम्राटाच्या भीतीने मिर्झा राजाने बुजवून टाकले. तरीदेखील राजपूत शिल्पकलेचा भव्य नमुना म्हणून ग्वाल्हेरच्या राजवाड्याखालोखाल याचा क्रमांक लागतो. दिवान-इ-आमच्या उजव्या बाजूस कालीचे देऊळ आहे. गणेश दरवाजावरचे नक्षीकाम तसेच जगत सारोमानजी व अंबिकेश्वर मंदिर येथील खोदकाम प्रेक्षणीय आहे.
दातार, नीला
“