अगरतला : सध्याच्या केंद्रशासित त्रिपुरा प्रदेशाची व पूर्वीच्या टिपेरा संस्थानची राजधानी. लोकसंख्या ५९,६८२ (१९७१). येथील तपमान १०° ते ३० ° से. व सरासरी वार्षिक पर्जन्य २०० सेंमी आहे. आसामच्या काचार जिल्ह्यातील कलकालिघाट स्थानकापासून त्रिपुरा प्रदेशाच्या उत्तर भागातील धर्मनगरपर्यंत लोहमार्गाचा एक फाटा आहे. तेथून अगरतलापर्यंत मोटाररस्ता असून शिवाय आसाम—अगरतला हा २०१ किमी. लांबीचा त्रिपुरा प्रदेशाचा मर्मपथ तयार झाल्याने, हा भाग भारताच्या अतिपूर्वप्रदेशाशी पक्का निगडित झाला आहे. भूमिमार्गे जरी कलकत्त्याहून अगरतला १,६८० किमी. दूर असले, तरी आकाशमार्गे ते पूर्वेस केवळ ३१५ किमी. असल्यामुळे तासाच्या टप्प्यावर आले आहे. तेथील भाषा मुख्यत : बंगाली असून बहुसंख्य वस्ती हिंदू आहे. जुने नगर हाओरा नदीच्या पश्चिम तीरावर व नवी वसाहत पूर्व तीरावर आहे. १८७५ पासून येथे नगरपालिका असून शहरात प्राथमिक, माध्यमिक शाळा, तसेच हुन्नरशाळा, एक महाविद्यालय, संस्कृत पाठशाळा आणि शासकीय कार्यालये, दवाखाने व प्रादेशिक ठाण्याच्या इतर संस्था आहेत. शहरात प्रेक्षणीय अशा उज्जयंत नामक नव्या राजवाड्याखेरीज जुन्या राजवाड्यानजीकच्या एका देवळात पूर्वीच्या राजघराण्याच्या कुलदैवतांचे विविध धातूंनी मढवलेले १४ मुखवटे आहेत.
ओक, शा. नि.