डॅलस : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी टेक्सस राज्यातील कापड उद्योगधंद्यातील एक अग्रेसर शहर व टेक्ससच्या राजधानीचे स्थळ. लोकसंख्या ८,४४,४०१ (१९७०). ट्रिनिटी नदीकाठी फोर्टवर्थ गावाच्या पूर्वेस ४८ किमी.वर वसले आहे. राज्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर दळणवळण, व्यापार, आर्थिक, औद्योगिक क्षेत्रांतील उलाढाली व विमा व्यवसाय यांचे जणू आगरच आहे. हे जगातील सर्वांत मोठे कापूस विनिमय केंद्र असून येथे तेल कंपन्यांची मोठमोठी कार्यालये आहेत. कापसाच्या गासड्या बांधणे, कापड तयार करणे, मांस डबाबंद करणे, विमाने, मोटारी, चामड्याच्या वस्तू, खनिज तेलासंबंधीची यंत्रे, रसायने, लाकडी सामान वगैरे हरतऱ्हेची उत्पादने येथे होतात. स्त्रियांचे कपडे व टोप्या यांसंबंधीच्या संशोधनाचे येथे मोठे केंद्र असून येथील विभागीय वस्तुभांडारे जगात ख्यातनाम आहेत. सदर्न मेथडिस्ट विद्यापीठ (१९११), बेलर दंत विद्यालयाचे काही वर्ग, डॅलस विद्यापीठ व धर्मपीठ, उद्याने, लिटल थिएटर, हेंझ्लीफील्ड येथील आंतराष्ट्रीय विमानतळ तसेच नाविक तळ, सु. चार राजमार्ग व इतर लोहमार्ग यांनी ते देशातील विविध शहरांची तसेच परदेशांशी जोडले गेले आहे.

डॅलस येथे १८४१ पासून वसाहत होण्यास सुरुवात झाली व प्रथम जॉन ब्रायन याने तेथे नदीकाठी घर बांधले. तिला त्या वेळच्या उपाध्यक्षाचे जॉर्ज डॅलस हे नाव देण्यात आले. पुढे ब्रायनने शहराचा एकंदर आराखडा तयार केला. १८५५ मध्ये फ्रेंच वसाहतवाल्यांनी तेथे जवळच वस्ती केली. १८६० मध्ये डॅलस अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले पण त्यानंतर त्याची झपाट्याने वाढ झाली व यादवी युद्धाच्या काळात ते युद्धसामग्री पुरवठ्याचे प्रमुख केंद्र बनले. त्याला १८७१ मध्ये शहराचा दर्जा प्राप्त झाला आणि त्याच्या उत्कर्षास सुरुवात झाली. अमेरिकेच्या प्रसिद्ध नीमन-मार्कस कंपनीने तेथे उद्योगधंद्यास सुरुवात केली व १९४० च्या सुमारास ते गजबजलेले आधुनिक शहर झाले.

आज अमेरिकेतील एक व्यापारी पेठ व अत्याधुनिक फॅशनचे केंद्र म्हणून ते प्रसिद्ध आहे. दरवर्षी टेक्सस राज्यातील विविध वस्तूंचे प्रदर्शन येथे भरते. तसेच मत्स्यालय, सहा मोठे सरोवरे, उद्याने, भव्य क्रीडांगण इ. प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत.

लिमये, दि. ह.