अमरसिंह, पहिला : (१६ मार्च १५५६-१६ जानेवारी १६२०). राजपुतांच्या गुहिलोत वंशातील मेवाडचा एक राजा. आपला पिता राणा प्रतापसिंह ह्याच्या मृत्यूनंतर हा मेवाडच्या गादींवर (१५९७-१६२०) आला. ह्या वेळी अकबरासारखा बलाढ्य शत्रू दाराशी उभा होता. त्याने अमरसिंहावर सलीम (जहांगीर) ह्या आपल्या मुलास मोठ्या सेनेनिशी धाडले. तीत सलीमचा पराभव झाला आणि मोगलांनी मांडल, नागौर वगैरे ठाणी गमावली. १६०५ मध्ये अकबर मरण पावला आणि जहांगीर दिल्लीच्या गादीवर आला. त्याने मेवाडवर अनेक चढाया केल्या परंतु अमरसिंहाने प्रत्येक वेळी मोगल सैन्याचा पराभव केला एवढेच नव्हे, तर पूर्वी गमावलेला चितोडचा किल्लाही त्याने परत मिळविला. तथापि ह्या सर्व युद्धांत त्याची फार हानी झाली. तरुण पिढी नष्ट होण्याच्या मार्गास लागली. ह्यामुळे त्यास शाहजहानविरुद्धच्या १६१३ च्या लढाईत पराभव पतकरावा लागला. त्याने तह केला आणि कर्ण ह्या आपल्या मुलाकरिता पाच हजारांची मनसबदारी पतकरली. त्याच वेळी त्याने त्यास राज्याभिषेक करून राज्याची सर्व सूत्रे त्याच्या स्वाधीन केली आणि उदेपूरबाहेर नौचौकी वाड्यात तो राहू लागला. अखेर तेथेच तो मरण पावला.
शौर्याप्रमाणेच औदार्य व न्यायप्रियता यांत अमरसिंहाची ख्याती होती. त्याने आपल्या राज्यात अनेक जमीनविषयक सुधारणा केल्या. राज्यकारभारातील निरनिराळ्या बाबींची फेरतपासणी करून त्याने नवीन जमाबंदी केलीतसेच सरंजामांची पुन्हा वाटणी करून जहागिरदारांची कर्तव्ये व हक्क ठरविले. शिलास्तंभावर कोरून ठेवलेले त्याचे हे सर्व नियम अद्यापही दृष्टीस पडतात. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत आपण चितोडचे स्वातंत्र्य गमावले, म्हणून तो फार उदास असे. तो एकदाही मोगल दरबारात गेला नाही तरीही शाहजहानने त्यास नेहमी योग्य त्या मानसन्मानाने वागविले.
पहा : गुहिलोत वंश.
देशपांडे, सु. र.