सामेरिया : आधुनिक सबॅस्टिया. मध्य पॅलेस्टाइनमधील एक प्राचीन ऐतिहासिक नगर. ते नॅब्लसच्या (शीकम) वायव्येस सु. १० किमी. असून एका टेकडीवर वसले आहे. सांप्रतचे ते जॉर्डनमधील सबॅस्टिया होय. या जागेचा मूळ मालक शेमर होता. त्याच्या नावाचा अपभंश होऊन या गावास सामेरिया हे नाव पडले असावे. ऑमराय ( कार. इ.स. पू. ८८७–८७५ ?) या राजाने इझ्राएलच्या तत्कालीन उत्तर हिब्रू राज्याची ही राजधानी केली व तिला सामेरिया हे नाव दिले. त्याचा मुलगा एहॅब ( कार. इ. स. पू. सु. ८७५–८५३) व त्याची राणी जेझबेल यांनी सु. बावीस वर्षे राज्य करून राज्याचा विस्तार केला. ॲसिरियाचा राजा दुसरा सारगॉन याने सामेरिया जिंकून इझ्राएलचे उत्तर हिब्रू राज्य नष्ट केले आणि तेथील मूळ रहिवाशांना हाकून देऊन तेथे आपल्या लोकांना, विशेषतः बॅबिलोनियन व सिरियन यांना, वसाहत करण्यास उद्युक्त केले. समॅरिटन असा त्यांचा पुढे उल्लेख करण्यात येऊ लागला. अलेक्झांडर द ग्रेटने सामेरिया काबीज केले होते. त्यानंतर जॉन हरकॅनस (कार. इ. स. पू. १३४–१०४) याने सामेरियावर स्वारी करून ते उद्ध्वस्त केले (इ. स. पू. १२०). नव्या कराराच्या वेळी हेरड द ग्रेट (कार. इ. स. पू. ३७–४) या राजाने सामेरियाची पुनर्बांधणी करून त्याचा विस्तार केला. त्याने रोमन सम्राट ऑगस्टस ( गीक सबॅस्टोस ) याच्या सन्मानार्थ या शहराचे नामकरण सबॅस्टी किंवा सबॅस्टिया असे केले. त्याने शहराभोवती भक्कम तटबंदी बांधून शहरात ऑगस्टसचे एक भव्य व आकर्षक मंदिर बांधले. शहरात अन्य ग्री कांश नगराची वैशिष्ट्ये दृग्गोचर होऊ लागली. या ठिकाणी फिलिप द इव्हँजेलिस्ट याने प्रवचने दिली होती आणि सामेरियनांना इव्हँजेलिस्ट केले होते. या नगरातच सायमन मेगस या चेटक्याचे फिलिपने धर्मांतर घडवून आणल्याचे प्रकरण घडले (बायबल, ८, ९–२४). धार्मिक परंपरेनुसार सेंट जॉन द बॅप्टिस्टचे दफन या नगरात करण्यात आले.

या नगरात इ. स. १९०८–१० आणि १९३१–३५ दरम्यान अनेक उत्खनने झाली. त्यांत या नगरातील ख्रिस्ती धर्मयोद्ध्याचे चर्च, तटबंदी, ऑमराय राजाचा प्रासाद तसेच इ. स. पू. आठव्या शतकातील मृत्पात्रांचे तुकडे आणि बहुधा फिनिशियन कलाकारांनी बनविलेल्या हस्तिदंती वस्तू (त्या एहॅबच्या राजवाड्यातील असाव्यात असे तज्ज्ञांचे मत आहे) यांचे अवशेष उपलब्ध झाले. याशिवाय काही रोमन संस्कृतीशी साधर्म्य दर्शविणाऱ्या वस्तूही तेथे मिळाल्या आहेत.

कुंभारगावकर, य. रा.