कीरफ : रशियाच्या कीरफ प्रांताची राजधानी. लोकसंख्या ३,४०,००० (१९७१). हे व्ह्याट्‍का नदीच्या काठी, गॉर्कीच्या ईशान्येस ४१६ किमी. व मॉस्कोपासून ७६८ किमी. वर असून लोहमार्गाचे महत्त्वाचे प्रस्थानक व मोठे औद्योगिक केंद्र आहे. यंत्रहत्यारे, शेती अवजारे, काड्यापेट्या, चामड्याच्या वस्तू, दृकशिक्षणसाहित्य, फरवरील प्रक्रिया, लाकूड कापणे, दारू गाळणे, धान्य दळणे, मांसपरिवेष्टन वगैरे अनेक उत्पादने व व्यवसाय तसेच कृषी व पशुविज्ञानसंस्था, प्रादेशिक संग्रहालय इ. येथे आहेत. ह्याची पूर्वीची नावे ख्व्लायनॉफ व व्ह्याट्‍का अशी होती कीरफ हे नाव १९३४ मध्ये देण्यात आले. हे पूर्वीपासून भरभराटलेले व्यापारी केंद्र, व्ह्याट्‍का शासनाची राजधानी व क्रांतीपूर्वीचे हद्दपारीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते.

कुमठेकर, ज. ब.