सूर्यबिंबमापक : हा एक प्रकारचा प्रणमनकारी दूरदर्शक (वक्रीभवनावर आधारलेली दुर्बिण) असून याच्या साहाय्याने सूर्याच्या बिंबाचा भासमान व्यास, तारकायुग्मातील घटक ताऱ्यांमधील कोनीय अंतर, पराशय (दृक्च्युती ) आणि २० पेक्षा कमी कोनीय अंतर असलेल्या खस्थ पदार्थांमधील किंवा ताऱ्यांमधील कोनीय अंतर अचूकपणे मोजता येते. सूर्यबिंबमापकातील वस्तुभिंगाचे व्यासाला अनुसरुन दोन सारखे भाग केलेले असतात. हे वस्तुभिंग दूरदर्शकाच्या प्रकाशकीय अक्षाभोवती वर्तुळाकार फिरविण्याची सोय केलेली असते. तसेच भिंगाचे हे दोन अर्धे भाग व्यासाच्या रेषेतच सरकविता येतात आणि त्यांची सरक सूक्ष्ममापक स्क्रूने मोजता येते.
सूर्यबिंबमापक वापरताना प्रथम विभाजक व्यासाची रेषा भिंग वर्तुळाकार फिरवून दोन खस्थ पदार्थांच्या रेषेत आणतात. ही फिरक मोजण्याची सोयही यात असते. नंतर भिंगाचा एक अर्धा भाग सरकवून त्याच्यामुळे मिळणारे प्रतिबिंब दुसऱ्या अर्ध्या भागाने मिळणाऱ्या प्रतिबिंबाशी बरोबर जुळवितात आणि सरक मोजतात. ही सरक रेडियन या कोनीय एककात मोजतात. यावरुन दोन खस्थ पदार्थांतील कोनीय अंतर समजते. सूर्यबिंबाचा व्यास काढताना सूर्याची एक कड विरुद्घकडेवर सरकवून सूर्यबिंबाचा व्यास काढतात.
रोमर ओलाउस यांनी सूर्यबिंबमापकाचे तत्त्व शोधून काढले (१६७५). विल्यम सेव्हरी यांनी १७४३ मध्ये या उपकरणात अधिक स्पष्टता आणली, तर १७५४ मध्ये जॉन डॉलंड यांनी आधुनिक सूर्यबिंबमापक तयार केले. कोनिंग्झबर्ग येथील वेधशाळेतील सूर्य-बिंबमापक योझेफ फोन फ्राउनहोफर यांनी तयार केले होते. त्यांच्या मदतीने फ्रीड्रिख विल्हेल्म बेसेल यांनी ६१ सिग्नी या हंस (सिग्नस) तारकासमूहातील ताऱ्याचा पराशय मोजला होता (१९३८). सूर्यबिंब-मापकाच्या मदतीने सदर मापने बिनचूकपणे घेता येत असली, तरी त्याला फार वेळ लागत असे. तसेच हा मापनाचा प्रयोग किचकट होता, त्यामुळे अठराव्या व एकोणिसाव्या शतकांमध्ये महत्त्वाचे असलेले हे उपकरण या मापनांसाठीची छायाचित्रीय पद्घती पुढे आल्यावर कालबाह्य झाले.
पहा : सूर्य.
ठाकूर, अ. ना.